शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला 

डॉ. आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी

दिनांक - ३० डिसेंबर २०२३

_____________________________________________

सुनील दादा एक आगळं वेगळं रसायन….    

 पुढचा माणूस जसा येईल तसा दादा त्याच्यासोबत वागायचा …थोरा मोठ्या लोकांसमोर आज्ञाधारक ..मित्रांसोबत दंगेखोर मित्र …लहानांसोबत अल्लडपणे वागणारा दादा .. अगदी गेल्याच वर्षीच्या महापुरुष प्रीमियर लीग मध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू म्हणून दादा लहान मुलांसारखा वावरत होता आणि  कोणालाच दादाबद्दल अवघडल्यासारखे वाटत नव्हते .57 वर्षाचा दादा 17 वर्षाच्या मुलांसोबत खेळकरपणे खेळत होता. म्हणूनच दादाची एक्झीट  चटका लावून गेली.

    चार दिवसापूर्वी मुलाचे थाटामाटात लग्न केलं जबाबदारीचा बाप म्हणून वागत असताना… अनिल दादासोबत बालमित्रासारखा ताशाचा ठेका घेत होता …तेवढ्यात जबाबदारीने येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होता …कसं काय सगळं विसरता येईल.

  मैत्री कशी जपावी हे त्यानेच शिकवलं ...

      आंबेडमध्ये असताना अनिल सुनील अशी मैत्री आम्ही कायमच बघत होतो अनुभवत होतो. रत्नागिरीत आल्यावर साळवी भाऊ आणि दादा मैत्रीमध्ये रमणारा बघत होतो. दादा वयाने मोठा असल्याने सतत त्याच्याकडे बघून मैत्री जपण्याचा छंद लागला. 

      अगदी लहानपणी मी 10 ..12 वर्षाचा असताना नवरात्र उत्सव आला की चोगल्यांच्या  घरात म्हणजे  राजारामआजोबांच्या घरात कोणीच नसायचं मग वाडीतील सगळी तरुण मंडळी त्यांच्या घरात नऊ दिवस ठाण मांडून असायची.मोठ्या पोरांची मोठी पार्टी म्हणजे शिरा करणे आणि आम्ही लहान  पोरं त्यांच्या पाठीमागून फिरायचं ..रात्रीच्या वेळी कलिंगडच्या फडात जाणं मनसोक्त कलिंगड खाणं ..दुपारच्या वेळेला नदीच्या डोहात डुबकी मारणं …याची कमालीची भीती असायची पण सुनील दादा आहे ना मग बिंदास त्याच्यासोबत जायचं आणि घरातले लोक सुद्धा निर्धास्त असायचे.

    कोणताही मजेचा प्रसंग असू दे सुनील दादा असायचा..कोणताही वाईट प्रसंग असला सुनील दादा असायचा ..कोणत्याही खेळाचा कार्यक्रम असला की सुनील दादा असायचा ..अशी वारंवार सवय झालेला दादा आता कुठे भेटणार.. कोणावर विश्वास ठेऊन निर्धारस्थपणे पाठीमागे जायचं …असं मलाच नव्हे तर सर्व आंबेकरवाडीतील पोरांना प्रश्न पडला आहे.

    कामातील एकनिष्ठता काय असते हे त्याच्याकडून शिकायचे...

      दादा आंबेड मध्ये रोजगार हमी योजने च्या प्रोजेक्टवर कामाला लागला मुकादम म्हणून काम करत असताना लमानी लोकांकडून काम करून घेणे जिक्रीचे असायचे. पण दादा अतिशय खुबीने काम करून घ्यायचा ..इतकच काय तर रात्री तेच कामगार भल्या मोठ्या भाकऱ्या आणि मटणाचा बेत करून  जंगी पार्टी असायचा आम्ही बऱ्याच वेळेला त्या पार्टीत सामील व्हायचो .. दादा नंतर जॉबला लागला तो कर्ला मच्छीमार सोसायटीमध्ये त्यामुळे आंबेड आणि संगमेश्वर याच्या पलीकडे रत्नागिरीमध्ये कर्ला गाव दादा मुळेच आपुलकीचे वाटायचे  तिथल्या मच्छीमार बांधवांची अतिशय घनिष्ठ संबंध सुरू झाले.. जिकडे जाईल तिकडे मैत्री करायचा.  त्यानंतर एस टीमध्ये  जॉब लावल्यावर तो कमी भेटायला लागला ..पण सणासुदीला कायमच तो असायचा एस टीच्या मित्रांचे मुळे दादा ने लहानपणीच अक्षत आणि सिद्धीला नवोदय स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवले उच्च शिक्षण घेतले म्हणूनच त्या दोघांमध्ये कमालीची शिस्त आलेली दिसते.दादा कधी बाबा सारखा वागताना दिसलाच नाही  मित्रा सारखा वागलाचा म्हणूनच पोरं जबाबदार झालीत. लता म्हणजे त्यांची बायको माझ्या सख्ख्या मावशीची मुलगी परंतु दादाच्या आपुलकीमुळे ती सख्खी मावस बहीण असूनही बऱ्याच वेळेला परकी वाटायची

बालपणीचा आदर्श दादा ...

     आम्ही लहान असताना दादा क्वचितच स्वतःच्या घरी झोपायचा नाही तर कायमच आमच्या सोबत असायचा इतकं सख्य नातं बघायला मिळणे सुदैवाचे आम्ही ...दादा आईला मावशी आणि अण्णाना दादा म्हणायचा.महेश आणि मी कायमच त्याच्या प्रभावाखाली असायचो ..दादा जसं करायचं तसं करण्याचा प्रयत्न करायचो .पण त्याचे धाडस त्याची मैत्री करण्याचा कमालीचा प्रामाणिकपणा आम्ही थोडाफार कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. काही गाव आणि तिथली माणसं केवळ सुनील दादामुळे आपुलकीची झाली ..  केळ्ये माजगांवातील मावशी .. ते सर्व केळकर बंधू ..त्यात शशी दादा फेवरेट .. जयगड म्हटल की शरद चव्हाण फेवरेट..नात्यातील इतके सारे मित्र त्याच्यामुळे निर्माण झाले .. त्याच्या नंतर माझेच नव्हेत तर त्याचा पुतण्या सनी आणि राजेश ही सर्व नाती जपणाना दिसतात .. मैत्री जपताना दिसतात.

     आज दादा वर लिहिताना असा दुर्दैवी प्रसंग यावा  असे वाटले नव्हते .

 काही माणसं त्याच्या सहवासाने लक्षात राहतात 

...तर दादा सारखी माणसं त्यांच्या मैत्री जपण्याच्या कलेने लक्षात राहतील. 

   कधीही नभरणारी पोकळी ठेऊन गेलास दादा …

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...