वाय फा (Y'faa) ..कलाकारांचे संघटन
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
6 जुलै 2020
----------------------------------------
कालच गुरू पौर्णिमा झाली.
दोन दिवस अगोदर लोकमत मधून अतिशय अभ्यासू पत्रकाराचा फोन आला. तुम्ही प्राध्यापक म्हणून खुप कमी वर्षात तुमच्या विद्यार्थ्यांचा आदर मिळवला आहे. तुमच्याबद्दल 'गुरू' म्हणून भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांचे नंबर द्या.लोकमत गुरूपौर्णिमा निमित्त एक स्वतंत्र पेज तयार करत आहे . थोडा विचार केला आणि फोन नंबर दिले... पहिला विद्यार्थी होता... श्रीकांत (रत्नागिरीत वकील म्हणून विश्वासाचं नांव कमावलं आहे )...
माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी.. मी 1999 ला दिवाळी सुट्टीनंतर गोगटे कॉलेजमध्ये जॉईन झालो.. त्यापूर्वी "आठल्ये सप्रे कॉलेज" देवरुख येथे होतो. FYBA च्या वर्गात श्रीकांत होता ...पण खरी ओळख सांस्कृतिक मध्ये झाली ..योगेश चव्हाण ..संतोष सुतार आणि इतर मंडळी थिएटर करायचे...श्रीकांत अतिशय स्पष्टव्यक्ता असल्याने लगेजच जुळलं.. त्यामुळे SYला असताना त्याला सांस्कृतिकचा CR केला. त्यावेळी कॉलेजमध्ये डेज व्हायचे.. पण ते युथफेस्टिव्हल साठी काहीच उपयोगी नव्हते. मग मी स्किट स्पर्धा घ्यायचं ठरवलं तर प्रायोजक म्हणून श्रीकांतनी स्वतः तयारी दर्शवली ...आणि 'भाटवडेकर चषक' सुरू झाला ...सांस्कृतिक मंडळाची सुरुवात झाली ..आणि आजही माजी विद्यार्थी संघटना मध्ये कार्यरत आहे.
दुसरं नांव होत ते योगेश कुंभारचं (झी टीव्ही मराठी मध्ये कार्यकारी निर्माता )ज्याला मी.. तो 12 वी ला असताना 'शामराव करंडक' एकांकिका स्पर्धेत परीक्षक असताना पाहिलं होतं....जबरदस्त काम करण्याची आग होती म्हणूनच कॉलेजसाठी अनेक किर्तीमान निर्माण केले ...महाराष्ट्राचा गोल्डन बॉय झाला ...कोंकणात प्रथमच थिएटर ट्रॉफी मिळून देण्यात त्याचं विद्यार्थी नेतृत्व होतं ...म्हणूनच तो 'झी' च्या बॅनर मध्ये मोठ्या पडद्यावर काम करत आहे.
सायली सुर्वे (इंटरनॅशनल स्कुलची जनसंपर्क अधिकारी म्हणून मुंबईत काम करते ) घरची अतिशय बेताची परिस्थिती ...पण टॅलेंट जबरदस्त ...पण इतरांना जुळवून घेताना कठीण यायचं ... पण ती सांस्कृतिक टीम मध्ये काम करण्याचा अनुभव घेतल्याने आज ती जनसंपर्क अधिकारी होऊन टीम सांभाळायच करीयर करत आहे हे बघून आनंद होतो.
विदीशा म्हसकर (यशस्वी tv अभिनेत्री) SYBsc च्या वर्गात FC च्या क्लास मध्ये आळस देऊन बसलेली विदिशा अजून आठवते ..भिऊ(आसामी लोकनृत्य) डान्स साठी परफेक्ट मुलगी होती म्हणून क्लास झाल्यावर भेटायला बोलावलं ...आणि कलाकार म्हणून प्रवास सुरु झाला.
शैलेश इंगळे(डबिंग आर्टिस्ट आणि साउंड रेकॉर्डिस्ट) भेटला तेव्हा अतिशय बुजरा मुलगा म्हणून भेटला ...त्याच्या मित्राने चुगली केली.. सर हा .....सरांची जबरदस्त नक्कल करतो ..घाबरतच करून दाखवली ... आणि त्याचा प्रवास सुरु झाला.
या सर्वांवर स्वतंत्र ब्लॉग लिहायचा आहे म्हणून थोडक्यात लिहीत आहे.
गुरूपौर्णिमेला विद्यार्थ्यांच्या भावना वाचून आनंद झाला ...
पण का कुणास ठाऊक मनात एक अस्वस्थता होती .
मी ज्या विद्यार्थ्यांचे नंबर दिले ते एक सक्सेस विद्यार्थी होते. ...त्यांनी माझ्या सहकार्याबद्दल खूप आदरपूर्वक विचार मांडले ...पण गेली 21 वर्ष माझे अनेक विद्यार्थी क्लोज झाले ते केवळ कलाकार म्हणून झाले ...परंतु काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या सक्सेसवर मी समाधान मानने योग्य आहे का ? ..असा प्रश्न भेडसावत होता ..आणि महत्वाचे.. त्यांचा सक्सेस केवळ माझ्यामुळेच नाही तर ...त्यांची गुणवत्ता ...त्यांची मेहनत ...त्यांच्या सपोर्ट सिस्टीम वर आहे.
आणि ते विद्यार्थी आपल्याला का आदर देतात तर आपण सपोर्ट दिला म्हणून ...पण तो सपोर्ट आपण किती वर्षे देतो तर 3 ते 5 वर्ष . पण खरी लढाई नंतरच होते .
यामुळेच पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी आवडतील अश्या भावना व्यक्त केल्यातरी... अस्वस्थ आहे.
आज कलाकार म्हणून व्यवसाय अनेक आहेत पण सपोर्ट सिस्टीम नसल्याने अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आपण एक संघटन उभं केलं पाहिजे असं सतत वाटत होतं.
अनेकांशी गेली 5 ते 6 वर्ष याबद्दल बोलत आहे त्यांना ही कल्पना आवडली...कायम प्रोत्साहन दिले... 'तुम्ही करा आम्ही या चळवळीत सोबत आहोत'. परंतु सुरूवातच होत नव्हती. काल म्हणजे गुरुपौर्णिमेलाच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ....कलाकारांसाठी एक अनोखे संघटन सुरू करावे म्हणून Y'faa नांवाने फेसबुक पेज तयार केले आणि बघता बघता 90 मेम्बर झाले.
Y'faa (वाय फा) म्हणजे Youth Festival Artists Association
हे संघटन सर्वच कलाकारांना प्रोत्साहन ...प्रेरणा.. सहकार्य देणार आहे..... युथ फेस्टिव्हल कलाकार संघटन करण्याची मुख्य दोन कारणे.. एक म्हणजे मोठ्या स्पर्धेत कसून तयारी करण्याचा अनुभव गाठीशी असणार आहे आणि दुसरं म्हणजे या कलाकारांशी वेगळंच भावनिक नातं आहे. 3 ते 5 वर्ष 'कलाकार' म्हणून युथ फेस्टिव्हल मध्ये काम केल्यानंतर सर्वांनाच 'कलाकार' म्हणून करियर करता येत नाही.. परंतु त्यांच्या अंतर्मनात असलेल्या कलाकाराला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी Y'faa नक्की आपले योगदान देईल. त्यामुळे अगदी शालेय विद्यार्थी ते रिटायर्ड व्यक्ती कलाकार म्हणून जगत असेल तर या Y'faa च्या क्वालिटी मार्गदर्शनाचा ...दर्दी लोकांचा सहवास वाढेल... अजून काही शिकता येईल ... याच अपेक्षेने हे नवीन संघटन सुरू करत आहे.
तर मग चला आयुष्यभर कलाकार म्हणून एकत्र राहू.....