सोमवार, ३१ मे, २०२१

GJC 95 ऑनलाईन स्नेहसंमेलन 2021

GJC 95 ऑनलाईन स्नेहसंमेलन 2021

उल्हास सप्रे
मुख्याध्यापक
माने इंटरनॅशनल स्कुल, रत्नागिरी
--------------------------------

GJC95चे पहिले ऑनलाईन स्नेहसंमेलन

       काल रविवारी ( ३० मे२०२१) संध्याकाळी साडेचार वाजता मी एका उद्घोषणेने वेगळ्याच विश्वात गेलो -  सोनालीच्या सुरेल आवाजातील ती  उद्घोषणा होती, " १००.१ मीटर्स आणि  सतराशे साठ किलोहर्टझ् वर आपण जमलो आहोत....." 
         काही दिवसांपूर्वी आनंदने  ग्रुपवर एक मेसेज पोस्ट केला  आणि त्याच्या सवयीनुसार मला तोच पर्सनल मेसेजही  टाकला - " आपण ऑनलाइन स्नेहसंमेलन घेतोय..." मी फक्त 👍👍 केलं. तसा  आनंदचा चिवटपणे ( हा नेतृत्वाचा अत्यावश्यक गुण)  पुन्हा मेसेज: " तू काय सादर करशील?"  माझ्या अंगात कोणतीही कला नाही ,मग मी त्यातल्या त्यात विचार केला, आपण शीळ  वाजवू शकतो.  खरं तर आपल्याकडे शीळ वाजवण्याला फारशी प्रतिष्ठा नाही . जणू शीळ  वाजवणारी लोक रिकामटेकडेपणे, रोडरोमियोसारखे सतत मुलींकडे पाहून शिट्या वाजवत असणार असा एक लुक देतात हो ! 😰

           संघटनाबांधणी याबाबत आनंदने अनौपचारिकपणे एमबीए केले आहे. गांधीजींबाबत असं म्हटलं जायचं की त्यांनी सर्व लोकांना प्रेरित करता येईल अशा छोट्या, साध्या कल्पना राबवल्या-  जसे मूठभर मीठ हातात घेऊन सत्याग्रह असेल किंवा चरखा चालवणे, खादी घालणे इ. यातून , sense of participation तयार होतो आणि उपक्रमांमुळे संघटना टिकून राहते. ( अनेक ग्रूपवर गुड मॉर्निंग / HBD/ कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा यापलीकडे काही घडत नाही.😌) तसेच आनंद  नावाचा उत्साहाचा झरा हा दर महिन्या-दोन महिन्यांनी नवनवीन कल्पना घेऊन मिशनरी उत्साहाने समोर येतो... मग ते मंथएन्ड गेट- टुगेदर असो की परिचारिकांसाठी कार्यक्रम.  चेष्टा- टिंगल-टवाळी -अनुत्साह  त्याला रोखू शकत नाही. पुलंच्या नारायणच्या अंगात जसं लग्न संचारायचं तस्सं !😀 एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार !!   विविध व्हाट्सअप ग्रुप बनवणं, विविध ऑनलाईन- ऑफलाइन कार्यक्रम, त्याच्यासाठी पुन्हा फोन करणे ,मेसेज करणे , गैरसमज दूर करणे ..... ( कधी तर मला वाटतं की आनंद पंतप्रधान असता तर लोकांनी जीएसटी, नोटाबंदी , गेल्यावर्षीचा अचानक लॉकडाऊन या  सा-याला  विनातक्रार सहकार्य केलं असतं ! 😂 )   हे सारं तो सतत करत राहतो ....या साऱ्याचा दृश्यपरिणाम म्हणजे कालही त्याने मला बरोब्बर सव्वाचारला फोन केला," उल्हास, जॉईन होतोयसं  ना? "        
             परवा मोबाईलवर नीटसा सराव न जमल्यामुळे काल मी सुट्टीच्या दिवशीही लॅपटॉप आणि ड्यूअल स्ट्रॉंग नेटवर्क मिळवण्यासाठी आमच्या शाळेचे ऑफिस गाठले. (बघा,  रविवारी देखील शाळेत जावे लागले). गेलं वर्षभर झूम मिटींगला क्लिक करून जॉईन होणे एवढं अंगवळणी पडलंय की पटकन हे विविध गुणदर्शन गुगल मीटवर आहे हेच विसरायला झालं. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार एका मोठ्या आकारात काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळीकडे लक्ष वेधून करण्यात आली. ( कलाकार- संध्या सावंत) 👌👌 त्यानंतर जया आणि सोनाली यांची प्रार्थना. साधी प्रार्थना म्हणायची तरी त्यामागे चार-पाच जणांच्या ६-७ सूचना होत्या हे विशेष.😀 
                 यानंतर संजू साळवीला अभिवादन करण्यासाठी एक खास प्रेझेंटेशन करण्यात आले. ( क्रेडिट - आनंद- अस्मिता)  तसं संजू आणि मी‌ यांची फार घसट नव्हती.  परंतु माझ्या लग्नाआधी बायकोसोबत मी संजूच्या गाडीतळावरील फोटो स्टुडिओत एक फोटोही काढला होता. संजूच्या फोटो स्टुडिओ नावदेखील मेमरीज ! पण अवलिया कलाकार म्हणून संजू चांगला ओळखीचा झाला. जेव्हा जेव्हा रत्नागिरीत एखाद्या कार्यक्रमात भेट झाली, तेव्हा तो नावाने ओळखायचा. ( प्रचंड मोठ्या लोकसंग्रहाला नावाने ओळखणे यात शरद पवार अत्यंत माहीर आहेत, हे आठवलं) . तो अकाली जाण्याआधी  जेमतेम २० दिवस आधी  बिपीनच्या 'सयाजी' बंगल्यावर आमची भेट झाली. तेव्हाही राहुल आठल्ये आणि मी एकत्र प्रवेश करताच तो उद्गारला ," या मास्तर लोक!" संजूची गाणी आणि 'कसक'ने पुन्हा काळजाचा ठाव घेतला.  
              क्रिकेटमध्ये तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर दर्जेदार बॅट्समन खेळतो , तसं स्वप्निल मुरकरचे ' सच मेरे यार है' झाले. सूरज आणि प्रभाकर यांनी केरळ किनाऱ्यावर मान्सून येऊन ठाकला, हे लक्षात घेऊन पावसाला आळवणी करणा-या कविता म्हटल्या , त्याचा  तत्काळ परिणाम पहा-  रत्नागिरीत काल रात्री दोन तास गडगडाटी पाऊस पडला! 😝😝 याबद्दल त्यांना आता  सर्वांना कांदा भजी खिलवण्याची शिक्षा दिली पाहिजे! 😋😋 महाकवी कालिदासानंतर ढगांमध्ये मेघदूत कोणाला जाणवले तर तो म्हणजे सूरज ( हा *सूरज* ढगांमागे जाणारा *सूर्य*  नाही) 

            सूरज या ब्लॅकबेल्टधारक कराटेपटूचा हवेत पंच जोरदार असला तरी त्याची पावसाला गवसणी अत्यंत हळुवार ,कोमल , नाजूकसाजूक होती. प्रभाकरने तर सध्या सतत कानावर पडणाऱ्या पॉझिटिव्हिटीचे उत्तम उदाहरण दाखवले.👍 GJC 95ला कनेक्ट होताना मी गणेशगुळ्याच्या पिकनिकला गेलो होतो ते प्रभाकरच्या टाटा टिगोरमधून हे आठवले. 
          स्क्रीनवरील छोट्याछोट्या विंडोपेन्समध्ये लक्ष वेधून घेत होता एक स्क्रीन - तो जणू काही एक स्टुडिओ होता - एवढेच नव्हे तर प्रकाशयोजनाही अशी होती की आनंद, राजू आणि स्वप्नील यांच्या डोक्यावर जणूकाही प्रभामंडल -  आभा ( aura) पसरलेले दिसत होते.🙏 मिलिंदचे कॅसियोवादन 🎹 मनाला तल्खली देऊन गेले.‌ विनायकच्या शीळवादनावर सब कुछ किशोर असा छाप होता आणि सर्वांनाच त्याने ताल धरायला/ गुणगुणायला भाग पाडले. मला थोडंफार जमणा-या शीळवादनातील उस्ताद भेटल्याचा आनंद होता.
आनंदनेही  'एक प्यार का नगमा है' सहज सादर केले. *गायक आनंद, गीतकार संतोष आनंद  म्हणजे आनंदी आनंद* !! ( आणि मी उल्हास !!!😝) 

            रश्मीने तर  संगीतसाधना 🎤चालू ठेवलीय, त्याचाच परिपाक म्हणजे तिचा कालचा परफॉर्मन्स. हवा के झोके आज...   जया आणि मी  कॉलेजला तीन वर्षे इंग्रजीचे क्लासमेट्स. परवा सरावाच्या वेळी तिने ९६साली इंग्रजी डिपार्टमेंटल सेंडऑफलादेखील मी  शीळ वाजवून गाणे म्हटले होते, याची आठवण करून दिली.  माझी मामेबहीण प्रज्ञा देवने अतिशय सुंदर शास्त्रीय नृत्य केले. ती आणि रश्मी यांनी कॉलेज सोडताना त्यांचे वय तेथेच गोठवून त्या बाहेर पडल्या आहेत असे वाटते !😀 ( हलकेच घेणे) कालच सकाळी आम्हा भावंडांचीपण एक ( *अर्थात*) झूम मीटिंग झाली, त्यावेळीदेखील सर्वांनी सांगितले की प्रज्ञाची दहावीला बसलेली मुलगी आणि प्रज्ञा या दोघीही सोळा वर्षांच्याच वाटतात ! )  आता भाऊ म्हणून मी सांगतो की प्रज्ञा केवळ छान नाचते असं नाही तर नाचवतेही !😂😂 निवी आणि ईशान्वी या फेसबुक व युट्यूबवर जबरदस्त लोकप्रिय मायलेकींच्या नृत्याप्रमाणे प्रज्ञाने व्हीडिओ पोस्ट करायचा विचार करायला हरकत नाही. 
              GJC 95च्या पहिल्या ऑनलाईन गॅदरिंगमध्ये कविता, नृत्य ,इंस्ट्रुमेंटल, रांगोळी ,गाणी,शीळ वादन ,एकपात्री असे विविध प्रकार यामुळे रंगत आली. *ख-या अर्थाने विविध गुणदर्शन ! Variety Entertainment Programme* !! 

       कैलासला सर्वजण गझलकार म्हणून प्रामुख्याने ओळखतात. मात्र त्याने सुरुवातीला वात्रटिका (हास्य कविता)  सादर करून थोडेसे आश्चर्यचकित केले.  हे म्हणजे राहुल द्रविडने  विश्वचषकात टॉन्टन येथे श्रीलंकेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन शतक झळकावले किंवा परवा परवा चेन्नईत रोहित शर्मा आयपीएलच्या टी-20 सामन्यातदेखील अगदी कूर्मगतीने खेळत होता-  म्हणजे आपल्या नैसर्गिक वृत्तीला मुरड घालून, ते आठवलं.  प्लेइंग टू गॅलरी नाही ! अर्थात कैलासने वात्रटिका सादर करत असताना सर्वांना हसवलं पण  प्रियाला तर  हसू इतकं अनावर होत होते, ते का हे समजले नाही. 😝( श्री. गणराज सावंत यांना विचारलं पाहिजे.) 
              जयाने 'दिल है के मानता नहीं  ... ' म्हणून सर्वांना आपल्या दहावी - बारावीच्या वेळी रीलीज झालेल्या फिल्मची आठवण करून दिली. मधूनेही गाणी चांगली म्हटली, तिचं कोकणी गाणं मला अधिक आवडलं. आनंद जसा समाजसंघटक तसा बिपीन राजकारणातील संघटक आणि उत्तम क्रिकेटपटू एवढीच मला माहिती होती परंतु त्याने गायकीचापण उत्तम नमुना पेश केला. 
              सर्वात कौतुक करावे लागेल ते म्हणजे निवेदिका सोनाली सावंतचं ! तिने तर ऑनलाईन कार्यक्रम असतानादेखील आकाशवाणीच्या एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत जाऊन निवेदन -सूत्रसंचालन सुरू करावे त्या सहजतेने संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा सांभाळला. अर्थात उत्तम तांत्रिक सहाय्य अस्मिता आणि हेमंत यांचे होते. त्यांचे संसारात sync उत्तम असल्यामुळे या तांत्रिक गोष्टीत त्याचेच प्रतिबिंब पडले यात नवल ते काय ? 😀 मी मेडले पद्धतीने हिंदी  गाण्यांचे शीळ वाजवत सादरीकरण केले. माझ्या ऑफिसमधल्या प्रकाशयोजनेमुळे मला कायम असा फील येत होता की आपल्याला चंद्राची एकच बाजू प्रकाशित दिसत असते तसं माझ्या अर्ध्या  चेहऱ्यावर प्रकाश दिसत होता. सोनालीने तर  फुलराणीमधला प्रवेश अतिशय सुंदर सादर केला. एकदम भक्ती बर्वे व अमृता सुभाष यांची आठवण आली. श्रीराम लागूंनी *वाचिक अभिनय* पुस्तक लिहिले ते आठवलं.  Voice modulation व शब्दफेक जबरदस्त होते. 👌👌 मूळ कार्यक्रमपत्रिकेनुसार सोनालीचा कार्यक्रम आधी आणि मग माझं शीळवादन होते. प्रत्यक्षात सोनालीने माझ्यानंतर सादर केलं, हे फारच बरं झालं. कारण ती सारखं म्हणत होती ,  "मास्तर, तुला शिकवीन चांगलाच धडा..... " हे ऐकून मला तर शीळ वाजवताना कापरं भरलं असतं.
            शलाकाने  छान गाणं म्हटलं. तिचा तो परफॉर्मन्स 'हम भी तो है' या कार्यक्रमात मी पूर्वी आपल्या 22 नंबर हॉलमध्येही लाईव्ह ऐकला होता ते आठवलं. अस्मितानेही छान गाणं‌ म्हटलं. 'मला जे गाणं आवडतं, जमतं ते पुरूष आवाजात असलं म्हणून काय झालं! '   हा आत्मविश्वास आणि मोकळेपणा महत्त्वाचा .👍 राजू जाधवचं गाणं मला कॉलेज डेजपासून माहित आहे. हमखास वन्स मोअर घेणारा कलाकार. या कार्यक्रमात तसा गलका झाला नाही कारण हेमंतकडे सेटिंग्जची बटणे होती. ( कोणी म्हणालं की रश्मीने‌ डोळे‌ वटारले तरी प्रत्येक जण आपण चुकून अनम्यूट तर नाही ना याची खात्री करायचा!😀) 
सर्वात शेवटी मला विशेष कौतुक करावं वाटते की जवळपास तीन तास ज्यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करून केवळ प्रोत्साहन देण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी उपस्थिती दर्शविली. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही तरी केवळ आपले मित्र मैत्रिणींबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी हे सर्व हजर होते . 👍👍 संपूर्ण कार्यक्रमभर ३० ते ४०  प्रेक्षक हजर रहात होते. हा आकडा फार मोठा नसला तरी,  गर्दी नसली तरी दर्दी होते असे म्हणता येईल. 
       थिएटरमध्ये सिनेमाचे पहिले गाणे सुरू झाले की आलेपाकाच्या वडीचा तुकडा मोडावा तसं.. किंवा शाळांच्या गॅदरिंगमध्ये इंग्रजी नाटक सुरू झाले की हमखास वेफर्स पिशव्यांचा आवाज येतो , तसं काही झालं नाही.  मात्र दीड दोन तासांनी    कोणी कॅमे-यासमोर‌ चहा- कॉफी पित होते, कोणी तोंडात चकलीचा वा बर्फीचा तुकडा टाकत होते...  सर्व वाट्या, बोल्स -चमचे स्क्रीनसमोर दिसू लागले. मी शाळेत असल्याने माझी पंचाईत झाली! 😰)  
           आनंदने टिपीकल संघटक या नात्याने कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाकडून धावता आढावा वसूल केला. मला बोलताना तो म्हणाला, "उल्हास, शिटी वाजवून तुझे पोट दोन सेंटिमीटरने आत आलेले असेल ...."  अरे,  हे काय,  म्हणजे आता मिलिंद आणि सुरजच्या  जोडीने वाढीव पोटाशी माझे नावपण  जोडले गेले... ! कमाल आहे बुवा!! 😀
- उल्हास सप्रे
( टीप : १. मैत्रीचा ग्रूप असल्याने सर्वांचा एकेरी उल्लेख आहे. गैरसमज नसावा. मला  ग्रूपवर 'सर' म्हणताच  प्रचंड ऑकवर्ड वाटते.
२. सर्वच कार्यक्रम छान झाले. कुणाचा नजरचुकीने उल्लेख राहिला असेल तर क्षमस्व. )
95 स्नेहसंमेलन 

प्रा.कैलास गांधी
दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेज ,दापोली
------------------------------
ऑनलाइन स्नेहसंमेलन आणि माझा सहभाग


गेले काही दिवस किंबहुना काही महिने मी ज्या मनस्थितीतून जात होतो त्याच मनस्थितीतून अनेक जण जात आहेत.  म्हणजे आपला दिनक्रम तर आपण पार पडतो आहोत.  पण पण या मध्ये कुठला उत्साह नाही कुठली स्फूर्ती  नाही,  काहीतरी नवीन करावं अशी उर्मी देखील नाही. हा कालखंड कधी संपेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही आणि कदाचित काळाकडे देखील याचं ठाम आणि ठोस उत्तर नाही.  यामुळे आपण आणखी किती दिवस किती महिने, किती वर्ष अशा स्थितीत जगणार आहोत हे फार मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर माझ्यासारख्या लिखाण करणाऱ्यांसाठी  हा भरपूर मोकळा वेळ उपलब्ध करून देणारा कालखंड होता.  पण पण डोक्यात अनेक कल्पना, विषय, प्रतिमा आणि शब्द घोंगावत असताना  देखील लिखाण होत नव्हतं. दोनच गेले काही दिवस किंबहुना काही महिने मी ज्या मनस्थितीतून जात होतो त्याच मनस्थितीतून अनेक जण जात आहेत.  म्हणजे आपला दिनक्रम तर आपण पार पडतो आहोत.  पण पण या मध्ये कुठला उत्साह नाही कुठली स्फूर्ती  नाही,  काहीतरी नवीन करावं अशी उर्मी देखील नाही. हा कालखंड कधी संपेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही आणि कदाचित काळाकडे देखील याचं ठाम आणि ठोस उत्तर नाही.  यामुळे आपण आणखी किती दिवस किती महिने, किती वर्ष अशा स्थितीत जगणार आहोत हे फार मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर माझ्यासारख्या लिखाण करणाऱ्यांसाठी  हा भरपूर मोकळा वेळ उपलब्ध करून देणारा कालखंड होता.  पण पण डोक्यात अनेक कल्पना, विषय, प्रतिमा आणि शब्द घोंगावत असताना  देखील लिखाण होत नव्हतं. दोनच दिवसांपूर्वी मी एक गझल लिहिली आणि पोस्ट देखील केली. 

लाख शक्यता प्रचंड आशावादी होत्या 
परंतु त्याही फार तणावाखाली होत्या 

ठोस शाश्वती कुठे कुणाची उरली होती 
सर्व व्यवस्था होत्या पण, पर्यायी होत्या 

सर्व आकडे कुठे लपवण्यासाठी होते ?
काही संख्या चक्क दिखाव्यासाठी होत्या 

अनेक वर्षे निरोप सुद्धा आला नाही 
आज बातम्या त्यांच्या गावोगावी होत्या 

काही फक्त मिथकांवर अवलंबून होते 
उरलेल्यांच्या आशा देवावरती होत्या 

मृत्युचे भय याच भितीने पळून जाईल 
इतक्या चिंता आज उपाशीपोटी होत्या 

ही दुनियेची एकमात्र हतबलता नाही 
या आधीही अशाच काही नोंदी होत्या 

प्रगल्भ त्यांना दुनियेनेच बनवले आहे 
कुठे समस्या जन्मताच मुत्सद्दी होत्या ?

कुणीच का काळाची बाजू मांडत नाही ?
एकजात का एकतर्फी तक्रारी होत्या ?


अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या ...  हुरूप वाढला आणि गोठलेली लेखणी पुन्हा एकदा सुरू झाली.  यामध्येच घडलेली एक आनंदाची गोष्ट म्हणजे आनंद आंबेकर याचा फोन आला आणि त्याने ही ऑनलाईन गेट-टुगेदर ची संकल्पना सांगितली.  खूप छान संकल्पना वाटली.  ऑनलाइन कार्यक्रम करताना अनेक अडचणी येऊ शकतात याची जाणीव होती मात्र अनेक वर्षानंतर अनेक जणांना ऐकता येईल, पहाता  येईल  जुन्या आठवणींना उजाळा मिळेल याची खात्री होती. आजचा कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम होता. माझ्यासारख्या आळशी माणसाला तयारीचा त्रास नव्हता. मात्र इतर जणांसाठी खूप तयारी आवश्यक होती. सर्वजणांनी खूप तयारी करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. काही तांत्रिक कारणामुळे मी थोडा उशिरा जॉईन झालो यामुळे काही जणांचे सादरीकरण  मला अनुभवता आले नाही. याची कार्यक्रम संपल्यानंतर चुटपुट मात्र लागून राहिली. ग्रुप मधले अनेक जण मला ओळखत होते की नाही हे माहीत नाही. काही जणांना मी ही ओळखत नव्हतो.  कार्यक्रमानंतर  सर्वजणांना  एकमेकांची ओळख निश्चित झालेली असेल. आजवर झालेल्या कार्यक्रमांना आणि गेट-टुगेदरना मी येऊ शकलो नव्हतो त्यामुळे हा पडदा उघडलेला नव्हता. 

 ज्यांना मी मिस केलं त्यांच्याबद्दल लिहिता येणार नाही मात्र त्यांनीही कार्यक्रमात निश्चित बहार आणली असणार...
सोनालीचे अत्यंत ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन,  हेमंत आणि अस्मिताने सांभाळलेली तांत्रिक बाजू, आनंदची संकल्पना, नियोजन लाजवाब होते. जया सामंतने गायलेले 'दिल है के मानता नही' त्या काळात घेवून गेले. मी दुर्दैवाने भक्ती बर्वेंची 'ती फुलराणी' पाहिलेली नाही पण अमृता सुभाषच्या 'ती फुलराणी' च्या चक्क तालमी  पाहिल्या होत्या. आठवण सोनालीने करून दिली. उल्हास सप्रेने वाजवलेली शिट्टी वरची आणि बहारदार होती.  मधू कदमने साऊंड ट्रॅक शिवाय गायलेली गाणी अप्रतिम, अस्मिताने देखील गाण्याचा चांगलाच सराव केल्याचे तिच्या सादरीकरणानंतर जाणवले. शलाकाने गायलेले सनम तेरी कसम मस्त होते. बीपीनने गाताना चांगलाच ठेका धरायला लावला. राजूचे गाणे नेहमीप्रमाणे ढासू होते. आनंद, राजू आणि स्वप्नीलने शेवट सुद्धा सुंदर गेला.  संजूची आठवण मात्र आता सुद्धा येत आहे. हे कुणीतरी निळू फुले,अशोक सराफ  यांची मिमिक्री केली असती...तर   खातू नाट्यमंदिर च्या स्टेजवर संजू उभा आहे हे असा भास झाला असता....  धन्यवाद सगळ्यांचे....


शुक्रवार, २८ मे, २०२१

जीना इसी का नाम है.....

जीना इसी का नाम है …. 


डॉ.आनंद आंबेकर 

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय 

रत्नागिरी 

दिनांक 28 मे 2021 

_______________________________


माझ्या "माय लाईफ" या ब्लॉग मध्ये आज पहिल्यांदाच मी वेगळ्या शैलीत लिहीणार आहे.

गेले एक वर्ष आपण कोरोना महामारी काळात अनेक गोष्टीने त्रस्त आहोत... कोणाला आरोग्याचा प्रश्न आहे ….कोणाला आर्थिक प्रश्न आहे आणि त्यामुळे अनेक असे सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत.भयाचे साम्राज्य आहे. यावर मात करून जी लोकं जीवनाचा आनंद घेतात त्यांना बघून सहज एक वाक्य मनात येत ते म्हणजे ….जीना इसी का नाम है 

आलेल्या परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाची दिशा बदलण्यासंदर्भामध्ये अनेक लेख ...व्हिडिओ आपल्याला वाचायला..बघायला मिळतात परंतु त्रयस्थ लोकांचे अनुभव बघत असताना त्याच्या पाठीमागे एक तात्विक किंवा वैचारिक भावना असते पण आपल्या जवळच्या मित्रमंडळी कोरोना काळात लढा देऊन आनंदी जगण्याचा जो मंत्र देतात ते बघून तिकडे वैचारिक पद्धतीने बघत नाही... तर आपण भावनिक पद्धतीने त्यांच्याकडून ऊर्जा घेतो... मोटिव्हेशन घेतो आणि आज या लेखामध्ये तुम्हाला मी माझ्या जवळच्या मित्रांकडून घेतलेल्या मोटिव्हेशन मधून सहज ओठावरती येतं ...जीना इसी का नाम है 

       गेल्या 2020 च्या मार्च महिन्यापासून कोविडचा थरार सुरू झाला ...पण जोपर्यंत आपल्या जवळ घडत नाही तोपर्यंत काही वाटत नाही. परंतु जुलै 2020 महिन्यामध्ये आमचा कॉलेज मित्र संजीव साळवी याचे  कोरोनामुळे निधन झाल्यानंतर कोरोना आमच्या सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण करू लागला. 95 मित्रमंडळी मधील असे अनेक मित्र मंडळी आपल्यावर आलेल्या प्रसंगाला फाईट करून स्वतः आनंदी राहत आहेत आणि इतरांना आनंद देत आहेत. अशाच काही मित्र-मैत्रिणींचा संदेश म्हणजेच जीना इसी का नाम है …..    

      मित्रमंडळींना जवळून वाचण्याचा (आपण पुस्तक वाचतो...माणसं का नाही? ) प्रसंग आला तो म्हणजे 95 फॅमिलीचे ऑनलाइन स्नेहसंमेलन. त्यानिमित्ताने मेसेज केले... अनेकांशी बोललो आणि 30 मे 2021 ला ऑनलाइन स्नेहसंमेलन घ्यायचं ठरलं. स्नेहसंमेलन ठरवण्याचे कारण सुद्धा जाणीवपूर्वक आहे ..आज सर्वजण अत्यंत विदारक स्थितीमध्ये जगत आहेत. काही मित्रांनी अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला ...तर काही प्रसंगामध्ये गुरफटलेले आहेत...मित्रांच्या अश्या  अनेक घटना डोळ्यासमोर आल्या की, जे मित्र स्वतः प्रसंगांमध्ये आहेत वाईट प्रसंगांमध्ये आहे परंतु तरीही स्नेहसंमेलन करण्यासाठी आग्रही आहेत. त्याचं जीवन पाहिल्यानंतर असंच म्हणावे लागेल... जीना इसी का नाम है 

    खरं म्हणजे माझ्या घरी सुद्धा माझी पत्नी नेहमी शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी जाते ...घरामध्ये खूप टेन्शनचे वातावरण असतं ...लहान मुलं आहेत … परंतु तरीही मध्ये मध्ये तिला आणि आम्हाला रिलॅक्स वाटण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. यातूनच एक ऊर्जा मिळते एकत्र असल्याचा भास होतो... आणि त्यामध्येच एक सकारात्मकता येते.

   आज आपण पाहिलं तर कोरोनाच्या मृत्यु मध्ये सर्वाधिक आकडा प्रेशरमुळे मृत्यू झाल्याचा दिसून येतो. म्हणूनच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक मित्रांशी बोलणं झालं ...मित्र सध्या कोणत्या वाईट स्थितीत जात आहेत... तरीही आपण स्वतः आनंदी राहून इतर सर्वांना आनंद देण्यासाठी झटत आहेत ….जीना इसी का नाम है 

बिपिन बंदरकर..

  अत्यंत जिवलग मित्र.. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्याची आई देवाज्ञा झाली ...आठ दिवसापूर्वी त्याचे चुलत भाऊ त्याच्यापेक्षा लहान असलेले कोरोणाचे बळी झाले  पण तरीही स्नेहसंमेलन असा विषय आल्यावर बीपीनने लगेच सांगितले, ऑनलाईन मिटिंग घेऊया आणि प्लॅन करूया…. स्वतःवर प्रसंग असून सुद्धा ते बाजूला ठेवले. शिवसेनेचा रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून सतत लोकांना मदत करत असतो आणि तरीही मित्रांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कायमच आघाडीवर असतो. मग म्हणावं लागतं…. जीना इसी का नाम है 


विवेक देसाई... 

    आज स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहे घरामध्ये विलगीकरण मध्ये राहत आहे ..पण स्नेहसंमेलनाचा विषयी आल्यावर त्याचा मित्र स्वप्नील मुरकर जो स्वतः जिल्हा परिषद मध्ये कोरोनामध्ये काम करतोय त्याला गाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विवेकने स्वप्निलला आवर्जून आग्रह केला आणि मला फोन करण्यासाठी सांगितला की, जेणेकरून त्यांनी सहभाग घ्यावा. खरं म्हणजे अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर शॉकमध्ये जातात. पण स्वतः पॉझिटिव्ह असताना मित्रांना आनंद देण्यासाठी एक पाऊल कायमच पुढे असतो यालाच म्हणतात ….जीना इसी का नाम है


सोनाली सावंत….

गेली दोन-तीन वर्ष तिचे पती घरी आजारी आहेत अर्थार्जनाची मोठी जबाबदारी स्वतःकडे आहे. पण तरीही आपले स्वतःचे दुःख बाजूला ठेवून अनेक व्यवसायांमध्ये नवीन नवीन अनुभव घेत आहे. इतरलोकांना आनंद देण्यासाठी सोनाली कायम पुढाकार घेत आहे. अनेकांना आर्थिक मदत देण्यासाठी स्वतः पत्रकार असल्याने लोकांना आवाहन करत आहे.फायटर म्हणजे काय हे तिला बघून वाटतं कळतं .. जीना इसी का नाम है 


प्रभाकर कांबळे...

जिल्हा परिषद ऑफिसमध्ये कोविडची ड्युटी करत असताना स्वतः पॉझिटिव्ह आहे परंतु स्नेहसंमेलन मध्ये मी 100% माझ्या कविता वाचणार आहे. असा सांगणारा प्रभाकर नक्कीच हिम्मत देतो.नॉर्मल असूनही भीतीच्या सावटाखाली राहणाऱ्यां लोकांसाठी एक उत्तम मोटिव्हेशन आहे.


राजेश जाधव…

एक चांगला गायक म्हणून मित्रांमध्ये कायमच फेवरेट आहे स्नेहसंमेलन असले की त्याचे गाणे असावे असा सर्वांचा आग्रह असतो. दोन-तीन दिवस ऑनलाइन प्रॅक्टिसला आला नाही म्हणून फोन केला तर कळलं..त्यांची पत्नी आजारी असल्याने ट्रीटमेंट सुरू आहे. पत्नी हॉस्पिटलमध्ये नर्स  आणि पोलीस पाटील असल्याने सतत लोकांच्या मदतीसाठी हे दोघे लोकांच्या संपर्कात असतात. कायमच कोरोना होण्याची भीती असते...पण तरीही सतत मदत करत आणि मित्रांमध्ये हसत खेळत राहणारा  राजूला पाहिल्यानंतर वाटतं ...जीना इसी का नाम है 

      सर्वांच्या सकारात्मक व्यवहारामुळे आपल्यामध्ये आलेली नकारात्मकता सहज निघून जाते कोरोनाच्या  भीतीने ग्रासलेल्या लोकांसाठी या सगळ्या लोकांचा एक आदर्श घेणे गरजेचे आहे आपण कितीही दुःखात असलो तरी त्याचा बाऊ नकरता आज आलेला क्षण आनंदाने जगत राहिला पाहिजे म्हणजेच ….

जीना इसी का नाम है

समुपदेशन - एक अनुभव कथन - प्रभाकर

क्षितिजापलीकडले डोकावताना               सोळाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर मुलांच्या मनात प्रत्येक गोष्टींमध्ये विचार आणि भावनांचे थैमान उडालेले ...