_______________________________________
डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
दिनांक - २२.११.२०२५
_______________________________________
कामावरचे प्रेम …ते पण २६ वर्ष …कधी कधी स्वतःचाच हेवा वाटतो.. हे कसं शक्य झाले ..
आपल्या प्राध्यापक व्यवसायावर सतत प्रेम करणे. सातत्याने नवीन नवीन जबाबदाऱ्या शिकत राहणे जबाबदाऱ्या अंमलबजावणीमध्ये करताना व्यस्त राहणे …व्यस्त राहताना कुठेही कंटाळा न येणे सतत कामातील ऊर्जेने दुसऱ्यांना ऊर्जा देणे …प्राध्यापक व्यवसाय असल्याने हे शक्य झाले.
१९९३ ची ती सकाळ आठवते… बारावीतून पास झाल्यावर अतिआत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये येतो तसा माझ्यामध्ये सुद्धा आला होता…आणि ज्युनिअर कॉलेज नंतर तेच सिनियर कॉलेज असेल तर जास्तच सीनियर असल्याची ताकद येते. बारावीपर्यंत कधीच विषय नसलेला समाजशास्त्रचे लेक्चर कॉलेजच्या रूम नंबर 12 मध्ये नव्यानेच प्राध्यापक व्यवसायात आलेले प्रा. तुळशीदास रोकडे घेत होते .विषयाची गोडी लागल्याने नियमित प्रमाणे तासाला बसलो होतो परंतु कट्ट्यावरचे मित्र यांना माझा हा सिन्सिअरनेस काही आवडलेला नाही . वर्गातून मला कसे उठवायचे याचे प्रयत्न सुरू झाले कोणाची डेरिंग होत नव्हती.. तितक्यात आमची सीनियर उज्वला पंगेरकर आताची अतिशय डॅशिंग पत्रकार अगदी तिला दामिनी नावाने ओळखले .ती कट्ट्यावरती आली..मी नाही पाहिल्यावर ..आनंद कुठे गेलाय असे विचारले..सर्व म्हणाले तो फार शहाणा झालाय वर्गात तासाला बसलाय.. उजू म्हणाली..थांब मी त्याला बाहेर आणते कायम चॅलेंज घेणारी उज्वला वर्गाच्या दरवाजावर आली
रोकडे सरांना सांगितले सिव्हील मध्ये रक्ताची गरज आहे आणि आनंद आंबेकरला बाहेर पाठवा त्याची गरज आहे . मी समजलो होतो ..काहीतरी गडबड आहे..मी बाहेर आलो दरवाजाच्या बाहेर आल्यावर ..तुला कसे बाहेर काढले हे बोलत होती..मागे वळून पाहिलं तर रोकडे सर दरवाज्याच्या बाहेर आले होते त्यांना बघून मला खूप लाज वाटली ..आपण कोणाचा तरी अपमान केला असं वाटायला लागले.. मधल्या सुट्टीत स्टाफ रूम मध्ये जाण्याची हिंमत झाली नाही .. सर कोर्टाकडे कायम चहा प्यायला जायचे तिथे गेलो आणि त्यांची माफी मागितली ..आणि मग सरांनी प्राध्यापक भूमिकेत जाऊन चार गोष्टी समजून सांगितल्या..त्यांनी मला माझ्या क्षमतेबद्दल सांगितले ..तू छान बोलतो बोलतोस..स्टेज डेअरिंग आहे.. मार्क पण चांगले असतात.. तू भविष्यात प्राध्यापक होऊ शकतोस असे स्वप्न सर्वप्रथम त्यांनी दाखवले. . तू स्थानिक आहेस तुला नोकरी मिळू शकते आणि मुलांवरती कमांड ठेवायची तुझी ताकद आहे..मी खूप विचार करायला लागलो माझ्याबद्दल असं कधीच कोणी काही बोललं नव्हतं बारावीत असताना ट्रीपचे मॅनेजमेंट आणि सीनियरला आल्यावर एन.एस.एसची लीडरशिप हे केलं पण एक एन्जॉय म्हणून ..मित्र सोबत आहेत म्हणून.. काम करत होतो .
१९९३ चा डिसेंबर महिना आला एन.एस.एस चे शिबिर सुरू असताना ज्या ज्या वेळेला मी स्टेजवर जाऊन बोलत होतो सर्वांना संघटित करत होतो त्या त्या वेळेला रोकडे सरांचे शब्द कानावर येत होते .कॅम्प संपताना स्लॅम बुक मध्ये आपल्या अनेक आवडत्या गोष्टी लिहायच्या असतात तसेच करिअर हा कॉलम होता आणि मी सहजपणे पहिल्यांदाच प्राध्यापक व्हायचे आहे असे लिहून टाकले .
पण माझ्या स्वभावाच्या विपरीत मी करिअर लिहिले हे सगळ्यांनी माझी चेष्टा व्हायला लागली .अतिशय बिंदास स्वभाव आणि मनाला पटल्यावर कोणाचेही न ऐकण्याची सवय या व्यवसायाकडे जाण्यासाठी उपयोगी पडली खरं तर अडचणी खुप आल्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोल्हापूरला एम ए करण्यासाठी वडिलांनी परवानगी दिली नव्हती त्यामुळे मी त्यांच्याशी सहा महिने त्यांच्याशी मी बोलत नव्हतो..आईने त्यांचे मन वळवून कोल्हापूरला जाण्याची परवानगी दिली. तत्पूर्वी जून मध्ये मी आणि मित्र तुफील पटेल आणि कोल्हापूरला जाऊन एक्स्टर्नल ऍडमिशन घेऊनच ठेवले होते. इथे कोणाचे न ऐकण्याचा .. आपलेच खरे करण्याचा स्वभाव उपयोगी पडला ऍडमिशन झाल्यानंतर सहा महिने होऊन गेले होते..नंतर वडिलांचा पाठींबा मिळाला.
शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक होण्यासाठी अतिशय पोषक वातावरण होते. तिथले सर्व प्राध्यापक सर्व मित्र अतिशय सकारात्मक ऊर्जा देत होते कोल्हापुरातील स्थानिक हरिश राणे (दुर्दैवाने तो हयात नाही) ज्याचे स्वतःचे लॉज होते आणि अमर हिलगे ज्याचा स्वतःचा सोन्याचा व्यवसाय होता हे टाइमपास साठी आलेले दोघेजण यांच्याशी मैत्री झाल्यावर ते सुद्धा सिन्सिअरपणे अभ्यास करायला लागले आणि डिपार्टमेंट मध्ये फक्त सात जणांना बी प्लस मिळाला त्यात तिघे आम्ही होतो.
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात..
देवरूखच्या आठल्ये सप्रे कॉलेजमध्ये पटवर्धन सर रिटायर होणार होते त्यांच्या लिव्ह वेकेन्सी वरती तीन महिने काम केले प्राचार्य डॉ.सुरेश जोशी सर मला कायमस्वरूपी जॉब ठेवण्यासाठी उत्सुक होते परंतु डॉ. सुभाष देवसर आम्ही लास्ट इयरला असताना प्राचार्य झाले होते.एनएसएस मधील काम आणि मॅनेजमेंटची आवड ही बघून त्यांनी मला गोगटे कॉलेजला एप्लीकेशन करायला सांगितले.खरंतर समाजशास्त्रासाठी जागाच नव्हती कारण जोशी सर आणि रोकडे सर नुकतेच जॉब वरती सुरू झाले होते परंतु रोकडे सरांचे मोठे बंधू फाउंडेशन कोर्स शिकवत होते त्यांना प्राचार्य म्हणून इतर ठिकाणी गेल्यामुळे ती पोस्ट शिल्लक होती आणि मी फाउंडेशन कोर्स साठी 22 नोव्हेंबर 1999 मध्ये रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून हजर झालो आज या घटनेला 26 वर्ष होत आहेत.. सुपर 26 वर्ष…प्रवासही तसाच झालाय सुरुवातीला आर्ट्स फॅकल्टी मध्ये फाउंडेशन कोर्स आणि समाजशास्त्र शिकवला सात आठ वर्षानंतर राजू सप्रे सायन्स उपप्राचार्य झाल्यानंतर त्यांनी सर्व फाउंडेशनची लेक्चर्स मला घेण्यासाठी सांगितले कोविड पूर्वी डॉ. मकरंद साखळकर सर यांनी कॉमर्समध्ये एकच फाउंडेशनचा प्राध्यापक असावा असा आग्रह धरला आणि मी आर्ट्स सोडून कॉमर्स कडे पूर्ण वेळ आलो तिथे सात-आठ वर्ष झाल्यानंतर अचानक बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स डिग्री सुरू झाली आणि त्याची जबाबदारी तू घ्यायची आहेस ..विभाग प्रमुख म्हणून तुला प्राध्यापक नियुक्त करायचे आहेत आणि त्यासाठी गेले पंचवीस वर्षातून तुझे कला क्षेत्रातील विद्यार्थी उपयोगी पडतील अशी दूरदृष्टी ठेवून नुकतेच प्राचार्य झालेले डॉ. मकरंद साखळकर सर यांनी जबाबदारी दिली.आवडीचे काम असल्याने खूप चांगले काम सुरू आहे . भरपूर अडचणी असल्या तरी आपण कोकणातल्या मुलांसाठी रोजगारक्षम अभ्यासक्रम देत आहोत याचा मनस्वी आनंद आहे.
2032 मध्ये रिटायर होणार ..मोजून सात वर्षे शिल्लक आहेत.याचा विचार करताना आपण बिझी राहण्यासाठी आपले संघटन कौशल्य आणि लोकांमध्ये राहण्याची सवय असल्याने मी अनेक मला आवडीची ग्रुप तयार केले आणि ते मेंटेन करत आहे आपले आयुष्य किती ते कोणालाच माहिती नसते परंतु आनंदी राहण्यासाठी आपण नियोजन नाही केले तर आपल्या आनंदासाठी दुसरे कोणीच आनंद देऊ करू शकत नाही याची जाणीव सुद्धा प्राध्यापक व्यवसायामुळेच आली. चांगले विचार जोपासणे आणि जगणे यामुळेच आनंदात 26 वर्ष गेली.विचार घेण्याच्या आणि विचार देण्याच्या आनंददायी व्यवसायामुळेच खूप समाधान आहे.
अनेक लोक सहज बोलतात की तुझे खूप विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी चमकत आहेत यशस्वी आहे आणि तुझे नाव घेतात …या गोष्टीचा आनंद होतो पण अभिमान नक्कीच नाही कारण विद्यार्थांकडून सुद्धा खूप शिकायला मिळते ….खरं म्हणजे त्यांच्या उर्जेमुळेच जे काय काम होते ते शक्य असते.. परमेश्वर चरणी हीच प्रार्थना की .. विचार घेण्याचा आणि विचार देण्याचा स्वभाव कायमस्वरूपी राहावा.