अण्णा …. दूरदृष्टी बाप
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
7020737400
18 ऑगस्ट 2020
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
आज वडिलांचा आठवा स्मृती दिन आहे
------------------------------------------------------
अण्णा..प्राथमिक शिक्षक ...म्हणजे खरं म्हणजे चाकोरीबद्ध जीवन असलं पाहिजे होतं… बदली होणार जॉब … स्वतःच कुटुंब आणि शाळा असं सर्रास प्राथमिक शिक्षकांचे जीवन असतं….
पण सर्वांचे वडील जसे असतात तसे माझे वडील का
नाही ? असा प्रश्न नेहमी पडायचा ?
सतत मोठ-मोठ्या योजना आखायचे ….
सतत लोकांमध्ये असायचे ….
सतत त्यागाची तयार असायची ….
मग आमची फरफट व्हायची...
आमच्या सर्वच कल्पनेच्या पलीकडचे असायचे.
अण्णांनी हातात घेतलेलं एखादं काम लोकांच्या लक्षात यायचं की नाही... माहीत नसायचं ...पण मास्तर(प्राथमिक शिक्षक होते) बोलताय ना ? मग आपण सोबत आहोत ...असं अनेकवेळा व्हायचं.
...पण कधी लोक न्यूट्रल व्हायचे तेव्हा अण्णांची चिडचिड व्हायची...लहानपणी आमच्या समजण्याच्या पलिकडे असायचे.
...पण आज माझ्यासंदर्भात सुद्धा असं होतं तेव्हा कळतं (रक्ताचे गुण असतातच ना... )
अण्णा असे का वागायचे...
त्यांची व्हिजन काय होती...
त्यांनी सुरू केलेली प्रत्येक व्यवस्था आज लोकांच्या हिताची ठरत आहे. लोक आवर्जून अण्णांची आठवण काढतात ...आणि म्हणतात मास्तर होते म्हणून हे सर्व आज आहे.
वडिलांना बाबा कधीच म्हटलं नाही ...कारण आमचे चुलत भाऊ अण्णा म्हणायचे म्हणून आम्हीपण अण्णाच म्हणायचो
वडील कधी केवळ घरचे झाले नाहीत ...कारण शाळेचे शिक्षक असल्याने अख्या गावाचे (आंबेड) आंबेकर गुरुजी.
एकदा तर शाळाच घरात आणली ….
किस्सा एकदम फिल्म होईल असाच आहे. (1983) सालातील प्रसंग ….
शाळेची इमारत जुनी झाली होती … आम्ही शाळेच्या भिंतीजवळ बसायचो कारण भिंती चिऱ्याच्या होत्या पण आरपार होल होते.. त्यामुळे होलमधून मुंबई-गोवा हाय-वे वरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसायच्या
आणि मोठी सुट्टीपडून शाळेत आलो की त्याच होलमधे साप बसलेले असायचे ….इतकी जरजर अवस्था शाळेची झाली होती.
घरात अचानक नवीन घर बांधायचा विषय सुरू झाला
…. मी चुणचुणीत असल्याने बिनधास्त अण्णांना बोललो आम्ही नाही येणार नवीन घरात …आमचं मूळ घर भलमोठं आहे ...एकूण 20 दरवाजे आहेत.. ते पण चिरेबंदी….
पडवीत तर आम्ही क्रिकेट खेळायचो आणि पकडापकडी …त्यामुळे नवीन घरात जायचं नाही असं सांगितलं …. नवीन घर झालं ….आणि थोड्या दिवसांत आमच्याच नवीन घरात 4 थीचा आमचा वर्ग सुरू झाला. आणि 6 वी मध्ये असताना परत नवीन शाळेच्या खोलीमध्ये आमचा वर्ग सुरू झाला
परत काही दिवसांत नवीन घरातुन आम्ही परत जुन्या घरात रहायला आलो …
….हा सर्व उलटसुलट शाळेचा प्रवास का झाला ?
घराची अदलाबदल कश्यासाठी झाली त्यावेळी लहान वयात समजलं नव्हतं पण नंतर कळलं …
अण्णांना शाळेचं नवीन काम करायचं होतं..
त्यामध्ये अण्णांची धडपड लोकांना कळत नव्हती कळेपर्यंत आमची शाळेचा लपंडाव सुरू होता.
अण्णा म्हणजे लक्षात न येणार कोडं असायचं….
त्यातच त्यांची दूरदृष्टी होती.
किस्सा असा होता ...आंबेडची शाळा पडायला आली होती म्हणून शाळेजवळची जागा घेऊन अजून दोन वर्गाची शाळा बांधायला घेतली ...पण सगळीकडेच विघ्नसंतोषी लोक असतात त्यामुळे शाळेचे काम अर्धवट थांबलं ...सामान तर आले होते ...आणि अण्णांच्या सर्व अंगलट आले होते...म्हणून त्याच सामानातून नवीन घर झाले होते. एवढी मोठी आपत्ती ...मनस्ताप झाला होता त्यावेळी लहानपणी कळलं नव्हतं म्हणूनच नवीन घर बांधताना मी नापसंती व्यक्त केली होती ….परंतु चांगलं काम करण्यासाठी चांगली माणसं सुद्धा जोमाने मदतीला येतात त्यावेळी अतिशय सन्मानित व्यक्ती आणि आदराचे स्थान असणारे हसन खान ..नारायण गुरव ... मोहम्मद शिरगावकर ..धोंडू आंबेकर या लोकांनी अण्णांना योग्य साथ दिली आणि नवीन शाळेचे काम सुरू झाले होते. म्हणूनच नवीन शाळा झाल्यावर आम्ही नवीन शाळेत गेलो होतो. ….पण परत जुन्या घरात रहायला का आलो ? ….याचं असं झालं होतं की शाळेला निवेंडकर गुरुजी म्हणून नवीन मुख्याध्यापक आले होते अतिशय वक्तशीर आणि हुशार शिक्षक होते त्यांच्या बद्दल अण्णांना आदर होता आणि स्वतः एक वर्षानंतर मुख्याध्यापक म्हणून बदली होऊन जाणार होते म्हणून आपल्या नंतर शाळा सांभाळून घेणारा माणूस आपल्या जवळ असावा म्हणून नवीन घर त्यांना रहायला दिलं आणि स्वतः जुन्या घरात रहायला आलो ...आणि अण्णांच्या दूरदृष्टी मुळे तसेच झाले पुढील आठ वर्षं निवेंडकर गुरुजी आमच्या घरी राहिले ...आणि शाळेला चांगले दिवस आले ...शाळा 'केंद्र शाळा' झाली ..
आम्ही नवीन घरात रहायला होतो तरी जुन्या घरातील 11 भावांचा गणपती महोत्सवसाठी स्वतः झटायचे 2005 नंतर सर्व हिशोब करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली म्हणून आज आम्ही सख्ये चुलत 21 भाऊ एकत्र आहोत.. अण्णा गेल्यानंतर घर दुरुस्तीचा विषय आला तेव्हा केवळ 15 दिवसात 7 लाख रुपये सर्वांचे जमले आणि केवळ 4 महिन्यात घराचे काम पूर्ण झाले ...आम्ही 21भाऊ त्यांच्या सारखे एकत्र रहावेत म्हणून त्यांनीच पाया भरून ठेवला होता...ही अण्णांची दूरदृष्टी होती.
अण्णांची मी सातवीत असतांनाच 140 किलोमीटर लांब सापिर्ली - खेड मध्ये शाळेत प्रमोशन होऊन मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती . पाच सहा वर्षे राहिले
...तिथेपण जिवाभावाची माणस तयार केली. एकदा स्वाती देवळेकर(उर्फ बेबी म्हणजे माझी दोन नंबरची बहीण) ट्रेझरी ऑफिसमध्ये खेड मध्ये बदली होऊन आली... एक वयोवृद्ध बाई स्वतःच्या सुनेसाठी पेन्शनचे काम करायला आली होती तिचा मुलगा मिलिट्री मध्ये शहीद झाला होता. ट्रेझरीचा शिपाई बहिणीला म्हणाला.. वर्ष झालं ह्या म्हातारीच पेन्शनच काम कोण करत नाही ..बिचारी अतिशय आडगावातून येते...दिवसातून दोनच गाड्या अश्या सापिर्ली गावातून येतात ...बेबीला सापीर्ली गावाचं नांव ऐकलं आणि अण्णांच्या शाळेचं गांव म्हणून तिच्याबद्दल आपुलकी तयार झाली . त्याबाईच तासाभरात काम करून दिलं.. काम झालं म्हणून त्या बाईला अश्रू अनावर झाले ..तरुण मुलगा शहीद झाल्याचं दुःख होतच … मग बेबीने.. "मी आंबेकर गुरुजींची मुलगी" म्हणून सांगितले. मग ती बाई अण्णांबद्दल भरभरून बोलू लागली ...देव माणूस होता ..पोरांना चांगली शिस्त लावली होती म्हणूनच मुलगा मिलिटरीमध्ये गेला होता असे आवर्जून सांगितले.
ती बाई बाहेर गेली आणि थोड्या वेळाने वडापाव घेऊन आली….आणि म्हणाली बाई मला माहित आहे...हाफीसच काम झालं की हाफीसर पैसे घेतात ..पण तू आंबेकर गुरुजींची मुलगी आहेस तू पैसे घेणार नाहीस म्हणून वडापाव आणला आहे.. नको म्हणू नकोस.
बेबीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ...पण मनात वडीलांच्या संस्काराबद्दल अभिमान होता.
अक्षय कुमारचा टॉलेट सिनेमा पाहिला ...त्यामध्ये त्याला झालेला विरोध बघून अण्णांची आठवण आली होती 1984 साली सार्वजनिक शासकीय योजना टॉलेट
बांधायची योजना आली ...अण्णा शिक्षक असले तरी सर्व शासकीय आणि राजकीय कामात अग्रेसर असायचे ...संगमेश्वर तालुक्यातील सर्व राजकीय /शासकीय मीटिंग आमच्याच घरी असायच्या.. आमदार भाई सावंत खाजदार हुसेन दलवाई ...आमदार मुसा मोडक ...आमदार मामी भुवड ...अगदी आमदार सुभाष बने आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने सुदधा … ही सर्व मंडळी घरी यायची निवणुका हा विषय कमी होता पण शासकीय योजना कश्या राबवायच्या याबद्दल मोठं प्लॅनिंग असायचं ...त्यावेळी शासकीय स्तरावर स्वच्छता आणि आरोग्यासाठी सार्वजनिक संडास बांधायची योजना आली ...म्हणजे लोकांच्या उत्सुकतेचा भाग होता ... त्याचा मैला टाकीत सोडायचा हा विषय आला आणि कळीचा विषय सुरू झाला त्याची दुर्गंधी येणार अश्या भीती पोटी गावात कोणीच तयार नव्हते…. तो वापरायचा कसा ...स्वच्छ कसा करायचा … याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते …जर संडास झाला तर आजूबाजूच्या घरात वास येणार अशी अफवा पसरली ..मग अण्णांनी तोडगा काढलाया आणि म्हणाले "माझ्या घराच्या शेजारीच बांधा" ….मग काही बायका आईच्या कानात खुसपूस करू लागल्या ….जरा मास्तराला समजवा ...पण आईचा अण्णांना पाठींबा असायचा म्हणूनच पुढे 1992 ला आई पंचायत समिती निवडणूक जिंकून आली होती (शिवसेनेची लाट असून सुद्धा ...त्यानंतर वांद्री मतदार संघात कॉंग्रेस कधीच निवडून आले नाही) आईपण लोकांना समजावू लागली संडास असणे आपल्या बाईमाणसांना किती महत्वाचे आहे.. सर्व बायका तयार झाल्या आणि शेवटी आमच्या घराच्या शेजारी गावचा पहिला सार्वजनिक संडास तयार झाला .सांडसाच्या साफसफाई साठी खुपच मेहनत घ्यावी लागायची.. त्यासाठी आमच्याच वाडीत राहणारे अतिशय मोजकं बोलणारे पण आदराचे स्थान असणारे माडखोलकर गुरुजी मदत करायचे अण्णांना सामाजिक काम करण्यासाठी कोणीना कोणी सोबत हवं असायचे. माडखोलकर गुरुजीं सिंधुदुर्गचे पण त्यांना सुद्धा आमच्या घराच्या शेजारी स्वतंत्र घर भाड्याने घेऊन दिले होते त्यामुळे त्यांचीही सहकार्य व्हायचे ...हळूहळू लोकं सज्ञान झाली ...इथेही अण्णांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते.
1988 मध्ये गावात टेलिफोन सेंटर असावं म्हणून लोकांच्या घरा-घरात फिरून जागृती केली ...गावातील पहिला टेलिफोन केळकर पोलीस पाटलाचा आणि दुसरा आमच्या घरी आला … शेजारीच मुस्लिम मोहल्ला असल्याने मस्कत,दुईत (गल्फ) मधून आलेले फोन सांगायला मोहल्यात आम्ही लहान मुलं जायचो... मग परत त्यांचा फोन येईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरु असायच्या.. आपुलकीने विचारपूस व्हायची ...मुळातच हिंदू-मुस्लिम असे दोन धर्म आहेत हे आम्हाला लहानपणी माहीतच नव्हतं ...कारण गौरी-गणपतीला.. मोहल्यातील खान फॅमिली,आंबेडकर फॅमिली, केळकर फॅमिली,फकीर फॅमिली, शिरगांवकर फॅमिली ,बोट फॅमिली यांचे दरवर्षी नवसाचे नारळ असायचे आणि आम्ही सुद्धा उरूस असायचा तेव्हा दर्ग्यात अण्णांसोबत नारळ घेऊन जायचो … होळीला आम्ही एकत्र आट्यापाट्या खेळ खेळायचो .. टेलिफोन आल्याने आम्ही फोनच्या निमित्ताने वारंवार भेटायला लागलो.
गावात सर्व लोकांनी एकत्रित शेतीची कामे करावीत म्हणून अण्णा नेहमी पुढाकार घायचे.. मोहल्ला, मोहिते वाडी, किंजळे वाडी, आणि आंबेकर वाडी यांची सर्वांची बैलाची जोत एकत्रित यायची ...आणि सकाळी इरल्यात बसून न्यारी आणि दुपारी कपड्यात घेऊन आलेलं जेवण खायचं… सगळ अविस्मरणीय होतं ...शेतात गाण्यांची जोरदार मैफिल असायची ….जणू एक सणच असायचा … पण अण्णांनंतर असं गावचं एकत्रित दर्शन मुश्किल झालं होतं...
मी जेव्हा रत्नागिरीत मित्रांचे ग्रुप करून काम करतो तेव्हा अण्णा खुष असायचे. 1994 ला शिर्डी येथे मी ट्रिप आयोजित केली तेव्हा गावावरून जात असल्याने 53 जणांना कांदा पोहे आणि चहा आईचे सकाळी 7 वाजता करून ठेवले होते त्या ट्रिपला असलेले सर्व मित्र आजही आठवण करतात .
(सर्व जाती धर्म ...एकत्र आणण्याचे कार्य)अण्णांना ब्रेन अटॅक आला होता दुसऱ्याच दिवशी मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो…त्यासाठी बिपीन शिवलकरने खुप मदत केली होती सोबत माजी विद्यार्थी अभिजित मांजरेकर होता...खेडमध्ये देवळेकर भाऊ ...नंतर जसलोक मध्ये दिपू ...बिपिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वा..आणि पुढे जवजवळ 4 महिने अण्णा कोमात होते ….सर्व वाडीतील लोक भेटून गेले आयुष्यभर बडबड करणारे अण्णा काहीच बोलत नव्हते ...हे बघवत नव्हतं... अण्णांच वय 78 होते पण त्या वयात सुद्धा कोणाचा जन्म कधी झाला आणि कोणाचा मृत्यु कधी झाला या तारखा घरातील लोक विसरले की, अण्णांना विचारायचे ...इतकी प्रत्येकाबद्दल आपुलकी होती .. 18 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 7 वाजता अण्णां गेले असा मला फोन आला.. मी पोहचेपर्यंत रात्री 9 वाजले ज्यावेळी बीपीटी हॉस्पिटल क्वॉर्टर मधून अण्णांचा शेवटचा प्रवास सुरु झाला तेव्हा जवळजवळ 1 किलो मिटर लोकांची गर्दी होती ….एखाद्या खेडेगावात राहणारा शिक्षक... त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एव्हढी गर्दी म्हणजे नक्कीच अण्णांच्या सामाजिक कामाची सलामी होती.
अण्णांची आठवण कायम शाळेत रहावी म्हणून त्याचं महिण्यात आंबेडच्या शाळेला सेंट्रल साउंड सिस्टीम बसून दिली आणि अण्णांच्या सामाजिक कामाला पुढे नेण्याचा प्रारंभ केला.
(लग्नाचा 50 वा वाढदिवस)या वर्षी 18 (ऑगस्ट) अण्णांचा 8 वा स्मृतीदिन आहे आम्ही चार भावंडाच्या कुटुंबांनी एकत्रित येऊन अण्णां आणि आईच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे जावा म्हणून " पारिजात फाऊंडेशन " ची स्थापना करत आहोत ….मोठी बहीण हयात नाही पण दोन मुली दिप्ती(मुंबई येथे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स), प्रीती(इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिक्षिका)आणि दोन जावई ...निलेश कादवडकर (मुंबई -व्यावसायिक आणि भाजपा तालुका अध्यक्ष)आणि प्रशांत नेवरेकर(वेब डीझायनर) ...दोन नंबर बहीण ट्रेझरी मध्ये अधिकारी, तिचे पती RDCबँकेत मॅनेजर विशेष म्हणजे 60 जणांचा स्वामी भक्त म्हणून उत्तम ग्रुप चालवता त्याचे दोन मुलगे एक धीरज HDFC बँकेत मॅनेजर सौरभ आपलं कोकण न्यूज चॅनेल मध्ये जॉब करतो,माझी मिसेस मेंटल हॉस्पिटलमध्ये नर्स, लहान भाऊ महेश MSEB मध्ये मॅनेजर (बांद्रा) विशेष म्हणजे 4500 सभासद असलेल्या पतसंस्थेवर संचालक म्हणून निवडून आला आहे त्यांची पत्नी पूर्वा BPT हॉस्पिटलमध्ये नर्स अश्या सर्वाना एकत्र घेऊन पारिजात फौंडेशन च्या माध्यमातून सामाजिक काम करून अण्णांच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे चालवायला आहे, 5 वर्षांपूर्वीच जीवदानी परिवाराची स्थापना करून दर सहा महिन्यांने चिंतन शिबिराच्या माध्यमातून आम्ही एकत्र यायला सुरुवात केली आहेच त्यामुळे पारिजात फौंडेशन संकल्पना उदयास येत आहे ...आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आवश्यक आहेत.
३३ टिप्पण्या:
अण्णासारख्या गुणी नेतृत्वाने समाजाला प्रतिकुल परिस्थीतीतही मार्गदर्शित केले. म्हणूनच तर आपल्या सारख्या पुढच्या पिढीला सुखाचे दिवस शक्य झाले. दुर्देवाने अण्णासारख्या गुरुजनाची संख्या दिवसेनदिवस कमी होत असताना अण्णाचे हे कार्य पुढे नेण्याचा आपला प्रयत्न पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा.त्यांना तीच खरी आदरांजली ठरेल.माझी खूप कांही वेळा त्यांची भेट झाली नाही पण जेंव्हा केव्हा ते भेटले ते साने गुरुजीच्या रुपाने भेटले.ते माझे भाग्य समजतो. प्रा.तुळशिदास रोकडे. रत्नागिरी.
सर्व प्रथम अण्णांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली...
अण्णांचा जीवनप्रवास वेगवेगळ्या वळणांचा.. खुप मोठा आहे... परंतु आनंद तू मोजक्या आणि समर्पक शब्दांत छान जीवनप्रवास उलगडला आहेस.. सतत बडबड करणे.. हा त्यांचा स्वभाव.. यामुळे काहींना कंटाळा ही यायचा.. पण त्यापेक्षा अधिक लोक त्यांना जोडले जायचे. आणि आपलेही वाटायचे... त्यांच्याशी बोलताना कोणालाही औपचारिकता वाटायची नाही.. त्यामुळे आनंद तुझे सर्व मित्र अण्णांशी दिलखुलास बोलायचे... इकडे आमच्याकडे मुंबई ला आल्यावर नवीन माणसांची पटकन ओळख करायचे.. आणि कोणी आपल्या रत्नागिरी चा माणुस भेटला की मग काय... त्यांना मूठभर मांस यायचे.. अगदी तो मग मंडणगड ते राजापूर पर्यंत कुठलाही असो.. त्यांचा आपले पणाने उर भरून यायचा....
आनंद... तु खुप छान भावना समर्पित केल्या आहेस... अण्णां छोटया छोटया गोष्टीत आनंद घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे.. तेवढा एक गुण आला तरी सार्थक झाले....
Nice 👍👍👍
अण्णांसारख्या गुरुजनांना शत शत नमन... ज्यांनी पुढची पिढी घडवली... स्वतःच्या मुलांना योग्य संस्कार देऊन जीवन कसं जगायचे असते ते शिकवले ....तुम्ही अण्णांबद्दल खुप छान व विस्तृत असा लेख लिहिलात...
अण्णां सारखे सामाजिक पिंड असलेले दूरदर्शी शिक्षक आज फार विरळा झाले आहेत. त्यांचे कार्य आणि जीवनपट अधिक विस्तृत स्वरूपात चरित्ररूपाने लोकांसमोर आदर्शरूपात येणे उचित ठरेल. छान शब्दांकन !
अण्णांना स्मृती दिनानिमित्त भावपूर्णआदरांजली...
अण्णांचा जीवनप्रवास अतिशय मोजक्या शब्दात व जिवंतपणे आपण मांडलात वाचताना आपसूकच मन भरून आले
नेहमीचे चाकोरीबद्ध जीवन सर्वच जगतात परंतू समाजाचा विरोध पत्करून समाज प्रबोधनाचे कार्य कारणारा अवलिया विराळाच
हे गुण उपजतच असावे लागतात. खरे तर अश्या व्यक्तींबद्दल मी बोलायचे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखेच आहे. मला तुमचा खूप अभिमान वाटतो कि तुम्हाला मातृपितृ दोघांच्या रूपाने खंबीर दूरदृष्टी व सय्यमी छत्र लाभले..आईवडिलांची प्रेरणा घेऊन तुम्हीदेखील सामाजिक कार्यात तितक्याच हिरीरीने भाग घेत आहात. अण्णांचे कार्य उल्लेखनीयच आहे अनेकदा समाजहिताचे काम करीत असताना प्रत्यक्षअप्रत्यक्ष लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते लोकांच्या टीकाटिपणीला न घाबरता न जुमानता त्यागभावनेने केलेल्या अण्णांच्या कार्याला त्रिवार सलाम.
तुम्ही हाथीघेतलेल्या " पारिजात फाऊंडेशन "च्या कार्याकरिता खूप खूप शुभेच्छा
𝕊𝕦𝕟𝕕𝕒𝕣
अण्णांना आदरांजली
आनंद सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले
अण्णा नेहमीच मदतीला धावून जाणारे
लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारे होते
आंबेडला महापुरुष मंदिर बांधले त्यावेळी पुढाकार अण्णांनी घेतला होता
आपल्याला असे वडील लाभले हे आपले भाग्य आहे
त्यांच्या कृपेने पारिजात फाऊंडेशन आपण सुरू केली आहे
आपण सर्वांनी मिळून लोकसेवेचे चांगले काम करू
सौ स्वाती सुधीर देवळेकर
खर तर आज काय अभिप्राय काय देऊ ते समजत नाही आहे.लेख वाचताना अनेक गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या,डोळे पाणावले. आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर काय दुःख होत ते मला आण्णा गेल्यावर समजल .आठ वर्ष झाली....दिवस निघून जातात जीवनाचा एक भाग म्हणून पण आठवणी कायम राहतात अगदी जशाच्या जशा .आम्ही प्रत्येक सुट्टीला आंबेडला यायचो मला आजही आठवतंय की आम्ही आंबेडला आलो की अण्णांना खूप आनंद व्हायचा आम्ही येताना दिसलो की घराच्या मागच्या दारात येऊन माझा पोपट आला अस म्हणायचे मला. माझा जो बोलका स्वभाव आहे त्याच क्रेडिट पण अण्णांना. त्याच्याकडूनच मला हा गुण मिळाला असावा. मी बोलकी असल्याने आण्णा मला लहानपणी त्याच्यासोबत शाळेत घेऊन जायचे मग मी सर्वाना गाणी म्हणून दाखवायचे. तेव्हापासूनच माझ्यामध्ये शिक्षिका होण्याची आवड निर्माण झाली असावी.त्यामुळे आज मी शिक्षिका या पेशात आहे त्याच क्रेडिट पण अण्णांना. अण्णांना कधीच विसरता येणार नाही.अण्णांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन .
सदर पोस्ट प्रा.सुशील वाघधरे यांची आहे
धन्यवाद सर
आपण सुद्धा फौंडेशन च्या कामात सहकार्य करा
बोलका पाऊस
सगळ्याचे लेख वाचले अक्षरशः खेड दापोली प्रवास आज रडत रडत केला
आताही डोळ्यात पाणी येत आहे लिहिताना
एवढे सतत बोलणारे आण्णा शेवटच्या क्षणी न बोलता गेले ह्याचे खूप दुःख वाटते
माझ्या शाळेचे ऍडमिशन कॉलेज ऍडमिशन माझा नोकरीचा इंटरव्ह्यू असो माझे आण्णा माझ्या सोबत असायचे
माझी तीन मुले चांगल्या पोस्ट वर असल्याचे ते लोकांना कौतुक म्हणूनच सांगायचे
आमची जन्मतारीख चौघांची तोंडपाठ असायची
कित्तेक लोकांना त्यानी मदतीचा हात दिला होता
माझ्या गळ्यातील सोन्याची चेन गहाण टाकून एका व्यक्तीला पैशाची मदत केली होती त्यावेळी मला खूप राग आला होता कारण मी कॉलेजमध्ये मिरवत ती चेन घालून जायची पण आता समजते की मिरवण्यापेक्षा दुसऱ्या माणसाची मदत महत्त्वाची होती
पावसासारखे होते ते कायम बरसत
जसा पाऊस पडल्यावर झाडे माणसे पशु पक्षी याना फायदा होतो आनंद होतो
तसे माझे आण्णा होते
त्यांच्या शेवटच्या क्षणी भेटण्याचे मला भाग्य लाभले
आण्णा तुम्ही ग्रेट होतात
तुमचे एक वाक्य मला नेहमी आठवते तुम्ही माझ्या लग्नापूर्वी सांगितले होते ते
आई वडील याना वाईट वाटेल असे कधी वागू नको
खरं आहे तुमचे
तुम्ही आमच्या साठी पुण्य केलेत म्हणून आम्ही सुखी आहोत
खरं तुम्ही अजून पाहिजे होतात
तुम्ही गेल्या पासून आंबेडच्या घराचा शो गेला
ते घर बोलते होते
तुम्हाला देवळेकर फॅमिली कडून आदरांजली💐💐
अण्णांचे शिक्षकी संस्कार आहेत म्हणूनच तू जेव्हा लग्न ठरलं म्हणून नवनिर्माण हाय सोडणार होतीस तेव्हा विद्यार्थ्यांनी तुला साठी प्रेसेंट दिली होती
आपण शिक्षकांची मुलं असल्याने नशीबवान आहोत
माझे लग्न ठरले तेव्हा माझी आंतरमंडळ बदली होईल की नाही याची शंका होती. अण्णांनी मला हळूच विचारले तू बदली करून येशील ना ? अण्णा माझ्याशी कधी सासऱ्यासारखे वागले नाहीत त्यांच्या वयाच्या 68 व्या वर्षी मी त्यांच्या आयुष्यात सून म्हणून आले आणि वृद्धापकाळातील नर्स म्हणून .
मी रत्नागिरीत बदली करून आल्यावर ते आमच्याकडेच होते. दर सोमवारी आंबेडला देवाची पूजा करायला जायचे. आमच्याकडे असल्याने ते मला आमचेच वाटायचे हळू हळू जाणवले की ते सर्वांशी असे वागतात सर्वांनाच आपले मानतात. अशी आपुलकीची भावना मला या भावंडांमध्ये ही दिसते रत्नागिरी ते आंबेड त्यांच्यासोबत एसटीने प्रवास केला तर एसटीचा कंडक्टर त्यांच्या ओळखीचा नाही असे नसायचेच अण्णा खूप हिशोबी होते एसटीच्या तिकिटावर ही ते हिशोब लिहायचे त्यांना मी बनविलेले मासे खूप आवडायचे माशाचा वार त्यांनी कधी सोडला नाही त्यांना पोटाचा त्रास असल्याने ते औषधे घ्यायचे जाहिरात बघून औषधे आणायला सांगायचे मेडिकल फिरून झाल्यावर कळायचे हे औषध बाजारात अजून यायचे आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या बालपणी त्यांची सोबत लाभली हे माझे भाग्यच होते. सिव्हिल हॉस्पिटलला तपासणीसाठी आले तर कोणी ओळखीचं भेटलं की सांगायचे ही माझी सून आहे त्यांना खूप कौतुक करून सांगायचे
2007 मध्ये एकदा त्यांना अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. डोकं भयंकर गरम होत होते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर खलाटे नवीनच हजर झाले होते त्यांनी तपासून सिटीस्कॅन करण्यास सांगितले अण्णाना brain infract बसला होता आयसीयूमध्ये ऍडमिट केले तिथेही त्यांची बडबड सुरू. सर्व स्टाफशी ओळख करून झाली होती. त्यांना 2007 ते 2012 पर्यंतच्या आयुष्य भेटलं होतं ते डॉक्टर खलाटे यांच्या अचूक निदानामुळे...
गौरी आंबेकर
अतिशय सुंदर आणि वास्तव चित्र कथन .🙏🙏
छान लिहिले आहे मामा..
अण्णांना विनम्र अभिवादन��������
अण्णांसारखा hadacha3शिक्षकच शिक्षणासारख्य पवित्र कार्याला स्वतः चं राहातं घरं सोडून शिक्षकाला देत होते म्हणून ती शिक्षण व्यवस्था मजबुत होती, चारित्र्य संप्पन्न होती. अण्णांच्या कार्याला सलाम.
सुंदर लिहीले आहेस
*"अण्णा"*
सर्वांनाच आपुलकी, प्रेम, माया, जिव्हाळा देणारे व सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे, कधीच न थांबणारे, बडबड, गडबड व लुडबुड करणारे एक ठाम व्यक्तिमत्व. खेळामध्ये लहाना पेक्षा लहान व चीटिंग करणारे म्हणजे आमचे प्रेमळ व निरागस अण्णा..
मी म्हणजे अण्णांची लाडकी नात, का तर मी त्यांची मोठी नात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी जन्माला आली असे ते नेहमी म्हणायचे..
आंबेडला आलो की इतिहासाची उजळणी व्हायची. अण्णांना सर्वांचे जन्मतारीख जन्मवार व जन्मवेळ अचूक लक्षात असायच्या..
आज पण फणस पाहताच आठवण येते ती माझ्या अण्णांची व आंबेडची, कारण अण्णा फणस फोडून गरे ताटामध्ये द्यायचे व मी आणि प्रीती ताटामध्ये एक ही गरा शिल्लक नाही ठेवायचो, पण अण्णा कधी कंटाळले नाही आणि आज फणसाची चव गोड लागत नाही..
अण्णां सोबत पिक्चर बघण्याची मजा तर काही औरच होती, तर ते का पिक्चर लागला की अण्णाच स्टोरी सांगून मोकळे व्हायचे. पिक्चर बघण्याचा सर्व मूड ऑफ व्हायचा...
अण्णांचे आमच्यावर खूप उपकार होते मम्मीच्या आजारावर मुंबईला हिंदूजा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना अण्णा व आई आमच्या सोबत आरवली येथे राहायला होते. दोघांनीही आमची खूप काळजी घेतली.. 75% गुण घेऊन सुद्धा अण्णांचे उद्गार काय तर "वासरात लंगडी गाय शहाणी"..
अण्णांना कायम मी शिक्षिका व्हावी असे वाटत होते पण मी मेडिकल क्षेत्रात आली तरीही ते खुश होते..
माझे लग्न जमले निलेश यांच्या सोबत अण्णा खूप खुश होते. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही, अचानक अण्णांची तब्येत खालावली व काही दिवसांच्या अंतरातच ते आम्हाला सोडून गेले. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का व कुटुंबा मध्ये एक पोकळी निर्माण झाली. अण्णा माझे लग्न पाहू शकले नाही याचे मला कायम दुःख आहे..
आज पण अण्णांची कमी आम्हाला भासत आहे पण त्यांनी मायेने दिलेली ती शाब्बासकीची थाप आज पण आठवणीत आहे..
"मिस यू अण्णा"..
अण्णांना कादवडकर फॅमिली कडून विनम्र अभिवादन..������������
आनंद अण्णा सारखी माणसे आताच्या जगात मिळणे खूपच कठीण.त्यांचे शिक्षणात जेवढे योगदान होते तेवढेच त्यांचे समाजकार्य ही मोठे होते. शिर्डी ट्रिपच्या वेळी ज्यांनी कांदापोहे खाल्ले त्यात मी ही त्यात सामील होतो.आज त्यांचाच वसा तू पुढे चालू ठेवला आहेस.
संदेश कीर
माझ्या लग्नाच्या पत्रिकेवर आयोजक महाराजा ग्रुप लिहिलं तेव्हा अण्णा खुष होते ... आणि म्हणाले माझीच पोरं आहेत ती ....
दिपू ...त्याचा मिश्किल स्वभाव वर्णन वाचून ओठावर हसू आलं ...आणि पुढे तुझ्या लग्नाला नव्हते वाचून डोळ्यात पाणी आलं
अण्णांना त्यांच्या स्मृती दीना निमित्त आदरांजली, मामा अण्णा हे सगळ्यांशी आपुलकी ने वागायचे सगळ्यांची विचारपूस करायचे गावी मी आलो की वर तुमच्या घरी आलो की सगळ्यांची विचारपूस करायचे, मला आठवते एका वर्षी मी आणि आई गावाहून मुंबई ला येण्यासाठी निघालो होतो तेव्हा अण्णा पण आमच्या सोबत मुंबईला आले होते त्या प्रवासात त्यांच्या सोबत गप्पांमध्ये कसा प्रवास संपला ते कळालेच नाही त्यादिवशी गाडी ला पण उशीर झाला होता आम्ही सगळे रात्री 8 वाजेपर्यंत घरी आलो गाडी च्या धुराने आमचे सगळ्यांचे चेहरे काळे झाले होते अण्णांचे तर सकाळी निघाले तेव्हा पांढरे शुभ्र कपडे होते त्यांचा पांढरा सदरा लेंगा पण काळा झाला होता.आम्हाला सगळ्यांना आमच्या अवताराकडे पाहून हसू येत होते त्यात अण्णांचे पण त्यावर विनोद चालू होते, असे हे माझ्या आठवणीतले अण्णा🙏🙏💐💐
आनंद अण्णांबद्दल खूप छान लिहिले आहेस माझ्यासाठी माझे अण्णा हे एक आदरणीय आहेत आंबेडचे घर हे अन्नामुळे सुने सुने झाले आहे अन्नासाठी किती लिहिले तरी कमीच आहे अण्णांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
सुनिल सिताराम आंबेकर
खूप छान ....
babyliss pro titanium flat iron | TITNCI Sports | TITNCI
Betting titanium curling iron with TABYSLIONS. We titanium white wheels have a great deal of quality and 출장샵 features in our Online betting products. All head titanium ti s6 TABYSLIONS. BETTING titanium necklace mens ONLINE. TABYSLIONS
What are the best casinos to play in 2021?
Which casinosites.one casinos offer aprcasino slots? — Casino Sites. Best casino sites are those that jancasino allow players to try a game 토토 from งานออนไลน์ anywhere. The most common online slots
अतिशय सुंदर आणि वास्तव चित्र कथन .🙏 आनंद अण्णांबद्दल खूप छान लिहिले आहेस
आनंद मित्रा खूप छान लिहिले आहेस अण्णांच्या बद्दल.... अण्णांसारखी दानशूर व्यक्ती मिशन/मिशनरी घेऊन काम करत रहाते तेव्हा ती कुटुंबासह समाज घडविण्यासाठी झिजत असतात. त्यामुळे जो झिजतो तो चमकतो हे अण्णांनी सिध्द करून दाखविले... हे सदृष्य काम आपल्या सामान्य माणसाच्या ध्यानी मनी येत नाही तसेच ते सामान्य माणसाच्या दृष्टीस देखील येत नाही किंवा त्याची महती त्यास कळत नाही... परंतु अण्णांची दूरदृष्टी आभाळासारखी होती, तिची व्याप्ती परिघाबाहेरची होती... अण्णांचा प्रवास व प्रेरणादायी कार्य वाचताना डोळे ओघळले... अण्णांच्या कार्याला सलाम व भावपूर्ण आदरांजली... आणि आनंद तुझा मित्र म्हणून मलाही आनंद वाटतो की, मी तुझ्या सोबत आहे.
-प्रभाकर रुक्मिणी राजाराम कांबळे, रत्नागिरी.
सर खूप छान लिहिलंय सर्व एकत्र फॅमिली आणि केले सर्वांचे प्रयन्त हे प्रकोटीचे आहेत . सर्वानचे शिक्षण एवढे उच्च आहे की सर्वांचे कौतुकच वाटते .आपली ओळख बाबा मुळे होते ही अजून एक अभिमाची गोष्ट आहे. बाबा म्हनजे एका वट - वृक्षाचे मूळच असते . सर्व करत असतात पण आपल्या मुलांनाचा सांभाळ करत, सर्व परिवार जोड्ड सर्व कस सुरळीतपणे करत असता आपली कामे. दुःख नाही कधी सांगत पण सुखात मात्र राज्या पेक्षा पण मोठे सुख अनुभवतो आपण . एक पॉईट होता बाबा करत होते ते का करत होते? ते आज सत्यात आपण जगतोय तेव्हा कळतंय की ते नेहमी सत्य व द त होते . आज बाबा खरे आहेत हे बाबा नसताना कळतंय . असे नाही की बाबा कले नाहीत बस आता हवेत असंच वाटते. पण त्यांनी आपल्या साठी केले सेक्रिफाईस लक्षात घेता त्या साठी खरच सर्व बाबा ना हॅट्स ऑफ 😇🙏🏻💯✅✨ माला ही आज बाबा उमागले . खूप छान होता लेख पहिल्यांदा अस वाचन केलाय मी. कामा तुन वेळ मिलन आजच्या कळात खुप कठीण झालाय. आज फ्री वेळेत वाचन करून खूप छान फील होताय #toogood_sir #exiled #hatsoff_😇🙏🏻
_यशस्वी
टिप्पणी पोस्ट करा