शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण


राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण 

लेखक -डॉ. आनंद आंबेकर 
           रत्नागिरी 
०४/०९/२०२६
—---------------------—---------------------------------------
१८ ऑगस्ट २०२६ सकाळी सहा वाजता अचानक बिपिनचा फोन आला.. विलंब नलावता उचलला .. राजश्री कोल्हापूरला ऍडमिट होती.. शनिवारी मी,गौरी आणि दोन्ही मुलं आणि सोबत कोल्हापूरचा मित्र अमर राजश्री जिथे ऍडमिट होती त्या प्रभु हॉस्पिटलमध्ये बिपीन आणि त्याचा मुलगा मिहिर यांना भेटून आलो होतो. राजश्रीच्या आजारपणाबद्दल बिपीन खुप आशावादी होता.. राजश्री बरी झाली की .. जबरदस्तीने योगाला घेऊन जाईन .. तिची कोणतीच सबब ऐकणार नाही ..पण तब्बेत बघता काहीच कळत नव्हते …. आणि फोन वरून बिपिनने कल्पना करू शकत नाही अशी बातमी दिली. बिपिनच्या भावनांचा बांध फुटला होता.. मला ही माझ्या भावना आवरता आल्या नव्हत्या.. गौरी आणि आर्या मला सावरत होत्या मी असा रडतांना आर्याने कधीच पाहिलं नव्हतं. ग्रुपवर राजश्रीच्या जाण्याचा मेसेज टाईप करताना एक एक शब्द असंख्य वेदनांनी पडत होते.. कोणी गेले की भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला कधी एव्हढे काही वाटत नव्हते पण आज असे का होते कळत नव्हते.. मेसेज पूर्ण होताच सुन्न अवस्थेत बसलो होतो पहिला फोन सुजितला केला पण उचलला नाही तितक्यात मंगलोर वरून प्रशांतचा फोन आला …आणि आम्ही दोघे घरातील जवळचे गेले असे रडत होतो.मी सर्व महाराजा ग्रुप मधील सर्वांना फोन करून बातमी सांगितली.. प्रशांत सोबत जी अवस्था झाली … तीच इतरांशी बोलताना झाली .. आमच्यातील पहिली मैत्रीण .. पहिली ग्रूप मेंबर आम्हाला सोडून गेली होती.

   राजश्रीचे जग सोडून जाणे …म्हणजे एखाद्या फिल्मचा शेवट नपाहिल्यावर होणाऱ्या अस्वस्थेची भावना निर्माण होते अशी मनाची अवस्था आहे.
१९९० पासून ३६ वर्ष मैत्री असणारी व्यक्ती अचानक जग सोडून गेली.हे मनाला अजूनही पटत नाही गेल्या 36 वर्षात अधून मधून राजश्री अदृश्य होण्याची कारणे सुद्धा अतिशय लहान मुलाच्या स्वभावाप्रमाणे असायची.
       १९९० मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी मध्ये ११ वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच भेटीत लक्षात राहणारी राजश्री अनेक वेगवेगळ्या कारणाने आमच्यासमोर यायची मी आंबेड सोडून रत्नागिरी मध्ये शिक्षणासाठी आलो होतो तशीच राजश्री सुद्धा दापोली सोडून शिक्षणासाठी रत्नागिरी मध्ये आली होती. सुरुवातीला तुफिल पटेल आणि नंतर रत्नागिरी मध्ये स्थायिक असलेले हेमंत मांडवकर, राजेश जाधव आणि माझी पहिल्यांदा मैत्री झाली त्यानंतर बिपिन शिवलकर, सचिन सावंत , प्रशांत बापर्डेकर सिनियर कॉलेजला आल्यावर सुजित कीर , संदेश कीर , दैवत कडगावे, राजा घाग,सतीश नाईक अशी एकत्र मित्रमंडळी सतत सहवास सुरू झाला. त्यावेळेला कॉलेजमध्ये नवख्या मुलांसंदर्भात बऱ्यापैकी चेष्टा मस्करी सुरू असायची राजश्रीचा स्वभाव बिनधास्त असल्यामुळे तिची चेष्टा मस्करी काही बिंदास मुलं करायची.. पण आम्ही अकरा जन म्हणजे महाराजा ग्रुप सतत तिच्या पाठीमागे असायचो.राजश्रीला कायमच धाडसी गोष्टी करण्याचे आवड असायची ती इतर मुलींसारखी अजिबात नव्हती आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे या तंद्रीमध्ये असायची म्हणूनच एनसीसी मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राजपथ परेड साठी होणाऱ्या कॅम्पमध्ये तिचे सिलेक्शन झाले होते आणि कराटे मध्ये चांगले प्राविण्य मिळवले त्यावेळी ब्लॅक बेल्ट मिळवणारी राजश्री कॉलेजमध्ये पहिली मुलगी होती. नंतर ती मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटेचे क्लास घेऊ लागली. विद्यार्थी सार्वत्रिक निवडणुका बंद झाल्यावर सांस्कृतिक महोत्सव सुरू झाले सर्वात पॉप्युलर मुलगी म्हणून रोज क्वीनचा सुद्धा तिने पहिला मान मिळवला.कॉलेजमध्ये आमच्या क्लासमध्ये टू व्हीलर चालवणारी सुद्धा ती पहिली होती. 
   कॉलेज संपल्यानंतर थोड्याच दिवसात राजश्री आणि बिपिन शिवलकर यांनी लग्न केले हा सुद्धा महाराजा ग्रुप मध्ये पहिला मान पटकावला…बिपिनच्या पाठिंबामुळे ती राजकारणामध्ये उतरली पहिल्याच प्रयत्नात ती नगरसेवक झाली. महिला बाल कल्याण सभापती असताना राजश्रीने महिलांसाठी अतिशय उपयुक्त असे कार्यक्रम घेतले आज तिच्या अंत्ययात्रेला तिच्या वॉर्ड मधील सर्व जाती-धर्माच्या महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या . महिलांच्या आरोग्यविषयक अनेक कल्पना तिने राबवल्या त्याचबरोबर महिलांना आर्थिक सबलीकरण करण्यासाठी बचत गट महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतिशय दर्जेदार कार्यक्रम राजश्रीने घेतले . समाजकारण आणि घरातील जबाबदाऱ्या यांचा अतिशय समतोल साधण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी तिच्या तब्येती वरती नकळत परिणाम होत होता तिच्या पर्सनल हेल्थकेअर वर हल्ली वारंवार तक्रारी सुरू झाल्या होत्या परंतु त्या काही एवढ्या गंभीर नव्हत्या परंतु अचानक तिला तीव्र हृदयविकाराचा अटॅक आल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली पण... अतिशय कमी दिवसात मन सुन्न करून राजश्री आम्हाला सोडून गेली.
   बिपिनच्या घरच्या सर्व सदस्यांना जग थांबल्या सारखे झाले होते. बिपीनचा भाऊ सचिन हॉस्पिटल मध्ये घेऊन जाताना ड्रायव्हिंग करत होता.आत सुन्न झाला होता.. जवळ गेल्यावर हुंदका देत म्हणाला.. राजश्रीने अजिबात वेळ दिला नाही मारुती मंदिर पर्यंत जातानाच दम सोडला होता.. मिहिर आणि तरुण अखंड कोसळले होते बिपीनची आई आजारी असते. भेटायला गेल्यावर म्हणते तुमची राजू..माझं आजारपण काढायला लागेल म्हणून गेली वाटते.. काकीची अवस्था बघवत नव्हती. दहाव्याच्या दिवशी बिपिनची वयाने सर्वात लहान बहीण..पण राजश्री गेल्याने सर्व घराचा भावनिक भार तिच्यावर आल्याचे स्पष्ट दिसत होते .आई आजारी आणि राजश्री अशी अचानक सोडून गेली. एखाद्याच्या कुटुंबात सर्व भार स्वतःच्या अंगावर घेणारी बाई गेली की असंच दुसऱ्या बाई वरती भार येतो अशी अवस्था रूपाची दिसत होती.आयुष्यात खूप व्यक्ती जग सोडून जातात परंतु सतत अव्वल येण्याची धडपड असणारी राजश्री या ठिकाणी सुद्धा आम्हाला सर्वांना सोडून पहिला नंबर मिळवला होता .
बिपीन आणि राजश्रीचा फोटोग्राफर भाऊ प्रवीण आंबेकर याच्या रत्नागिरीच्या प्रदर्शनातील फोटो
  



1 टिप्पणी:

निनावी म्हणाले...

भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
राजश्री शिवलकर हसमुख, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाची मैत्रीण होती. तिच्या सहवासातील प्रत्येक क्षण आज आठवणी बनून मनाला चटका लावून जातो. तिचे आपुलकीचे बोलणे, हसतमुख चेहरा आणि मनमोकळा स्वभाव कायम स्मरणात राहील.
आज ती आपल्यात नाही, ही जाणीव मनाला अतिशय वेदना देणारी आहे. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि तिच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🌹
राजश्री, तुझ्या आठवणी सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील.

Irshad Ali Sagvekar

राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण

राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण  लेखक -डॉ. आनंद आंबेकर             रत्नागिरी  ०४/०९/२०२६ —---------------------—---------...