विजय आंबेकर : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी
●प्रा. आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
31 ऑगस्ट 2020
-----------------------------------------------
एक सामान्य घरातील तरुण ...
चाळीमध्ये राहून शिक्षण घेत...
उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारी लोकवस्ती …
भाईगिरी करणे भुषण समजणाऱ्या तरुणांच्या वस्तीत राहणारा तरुण...
आईवडीलांकडून उत्तम संस्कार घेत ...
पोलीस कॉन्स्टेबलची नोकरीची सुरवात करत …
क्राइम ब्रँच मध्ये जबरदस्त नेटवर्क आणि अमोघ संवाद कौशल्याच्या जोरावर मोठमोठे गुन्हाचा तपास करणारा हुकमी एक्का...
विजय साळसकर सारख्या नामवंत
पोलीस अधिकारांची पहिली पसंत असणारा मुंबई पोलीस ...
अपार मेहनतीने अभ्यासकरून पोलीस सब इन्स्पेक्टरच्या पदापर्यंत मजल मारूनही तृप्त नहोता अविरत कष्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला 2017 मध्ये मुंबई पोलीस खात्यातील उत्तुंग कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होतो …
अमिताभ बच्चनच्या एखाद्या चित्रपटाची कथा असावी असे हिरोचे वर्णन … वाटते ना ..
पण हा आहे आमचा विजयदादा ...बघा नाव सुद्धा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाला साजेसंच आहे.
विजयदादा म्हणजे तसा नात्याने चुलता ..
पण पहिल्या पासूनच त्याला आम्ही दादाच हाक मारतो … सार्वजनिक कार्यक्रमात अतिशय दुर्मिळ दिसणारा भाऊ ...पण वहिनी भेटायचीच दोघेही सतत हसतमुख ..त्यांच्या दोन कन्या निशा आणि सोनिया.
राजाराम आजोबाची मुलं म्हणजे अतिशय शिस्तबद्ध
आंबेकर भावकीतील अतिशय श्रद्धेने नांव घ्यावी त्यातील राजाराम आजोबा ...
आणि त्यांचा सर्वात लहान मुलगा म्हणजे विजयदादा ...उंचपुरे व्यक्तिमत्व ..साऊथच्या हिरोंसारखी झुपकेदार मिशी ...पण चेहऱ्यावर सतत खळखळून असणारे हास्य …कधी मुंबई पोलीस वाटायचाच नाही ...या त्याच्या साऊथ हिरो सारख्या पर्सनॅलिटीचा त्यांच्या कामात खूप उपयोग झाला … मुंबईतील घाटकोपरच्या हमीदाबाई गल्लीत राहत असताना शेजारी ब्रीद काकांच्या प्रोत्साहनामुळे विजय दादा पोलीसभरती झाला ...प्रवास खडतर होता ...कधी कधी ट्रेनिंग सोडून यावं का ?..असे वाटायचे पण मनात खुप मोठी स्वप्न असल्याने तिथे मिळणारे प्रत्येक ट्रेनिंग जीवनबोध म्हणून घेतले आणि नोकरी सुरू केली...
20 व्या वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात...
थोड्याच वर्षामध्ये त्याची बदली क्राइम ब्रँच मध्ये झाली आणि गेली 20 वर्षे त्यांच्या पर्सनॅलिटीचा पुरेपूर उपयोग झाला …
दादा गावी आला की एकतर पुस्तक वाचत बसायचा किंवा दुसऱ्याशी साधं बोलताना सुद्धा भारावून टाकणारे बोलायचा
हयाच त्याच्या स्वभावाचा क्राइम ब्रँच मध्ये उपयोग झाला. जगामध्ये मुंबई पोलीस अग्रेसर मानले जातात
त्यांच्या गुन्हे तपासाची मुख्य किल्ली आहेत 'खबरी' ...आणि विजय दादाची हीच स्ट्रेंथ आहे. त्याच्या नेटवर्कचा अनेक पोलीस अधिकारी कौशल्यपुर्वक उपयोग करायचे. म्हणूनच प्रफुल्ल भोसले असतील महेश देसाई असतील की 26/11 फेम शहीद विजय साळसकर असतील या सर्वांना विजयदादाच्या नेटवर्कचा गुन्हे तपास करताना खूप उपयोग व्हायचा
..दादांनी साधे कपडे घातले की साऊथच्या हिरोंसारखा दिसायचा आणि प्रचंड वाचन असल्याने बोलायला लागला की विचारवंत वाटायचा त्यामुळे पोलीस तपासाला खुप उपयोग व्हायचा . पण रक्तातच मुंबई पोलीस असल्याने जातायेता कुठे अन्याय होत असेल तर तो शांत बसायचा नाही ...कधी कधी जीवावर बेतायच … हिरोसारख्या पर्सनॅलिटीचा अश्यावेळी धोका असायचा ...
असाच एक किस्सा …
घराच्या गल्लीतून बाहेर पडून रस्त्यावरून चालत जात होता …एका भिकाऱ्याला काही भाईगिरी करणारी मुलं त्रास देत होती ...विजयदादांनी त्या पोरांना हटकवल आणि पळवून लावलं ...तो पोलीस आहे असं कोणाच्याच लक्ष्यात आलं नाही ...मग पुढे जाऊन रिक्षा केली आणि पुढच्या कामावर जायला निघाला… रिक्षा दुसऱ्याच मार्गावर जातेय असं त्याच्या लक्षात यायच्या अगोदरच भिकाऱ्याला त्रास देणाऱ्या पोरांनी आपली गँग घेऊन दादाला घेरलं होतं… रिक्षावाला पण त्यांचाच माणूस होता ..दादाला मारायला पुर्ण तयारी झाली होती ...मग दादाने आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली ...आपण क्राइमब्रँचला आहोत हे दाखवून दिलं
..ती उदयमुख भाई वरमले ….पण तिथून बाहेर आल्यावर क्राइम ब्रँचचा हिसका दाखवत आयुष्य भरासाठी नरमले …
1995 च्या दरम्यान मुंबई पोलिसांनी सगळ्याच गुन्हेगारीच्या गँग संपवून टाकण्यासाठी एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या .. त्याकाळात घरामध्ये खुप तणावाचे वातावरण असायचं घरातून बाहेर पडलेला दादा घरी आला म्हणजे आपला... अशी कायम भीती असायची त्याकाळात कुटुंबातील कुठल्याच सार्वजनीक लग्न ..समारंभ..याला कधीच दिसायचा नाही ...सर्व कार्यक्रमात वहिनी एकट्याने हजर असायची ..मग नातेवाईक विचारायचे विजय कुठे आहे .. मग वहिनी हसूनच विषय टाळायची ...पण त्या हसण्यात पण मुंबई पोलिसांनी उभारलेल्या गुन्हेगारी मोहिमेची वास्तव भीती लपलेली असायची..
पण दादा कधी संतुष्ट राहिला नाही ...मुंबई पोलीस म्हणून गुलशन कुमार हत्याकांड सारख्या अनेक गुन्हे तपासात दादाच्या कुशल नेटवर्कचा खूप फायदा झाला वेळोवेळी खात्याकडून जवळजवळ 400 च्या आसपास उत्तम कामासाठी प्रशस्तिपत्र प्राप्त झाली आहेत.पण कधीच त्याचा गवगवा केला नाही की बडेजाव केला नाही...माझी मुंबई विद्यापीठातील कामाचा दादाला नेहमी अभिमान वाटतो …,अगदी सद्या सुरू केलेल्या लिखाणाला दादाने स्वतः फोन करून कौतुक केले दादाच्या व्यस्त दिनक्रमात सुद्धा त्यांच्या बॅगेत कायम एखादं पुस्तक असतंच अश्या उत्तम वाचक दादांनी जे वाक्य बोलला ते कायम लक्षात राहील ...पुलं आणि वपु च्या स्टाईलसारख तुझं लिखाण आहे ...असचं निरीक्षण ठेवत जा म्हणजे आपोआप लिहीत राहशील ...मला तर मूठभर मांस चढलं … खरं म्हणजे मला दादाचा युट्यूबवर व्हीडिओ करायचा आहे … बघूया कधी वेळ येते ती …
व्यस्त शेड्युल मध्ये सुदधा सब इन्स्पेक्टर व्हायचं म्हणून अभ्यास करायचा ...पण पुरेसा वेळ नमिळाल्यामुळे त्याला यशस्वी होता आलं नव्हतं … 2015 मध्ये दादाचा 50 वा वाढदिवस होता ..पण अजिबात साजरा नकरता अभ्यास करत राहिला कारण दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती … आणि शेवटी 2015 साली त्याच्या आयुष्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या ...एक स्वतः पोलीस सब इंस्पेक्टर झाला आणि...त्याच्या मोठ्या मुलीने निशाने लॉ पूर्ण करून हाय कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.
दादाने केलेल्या कामाची सर्टिफिकेट आणि पेपर कात्रण यांच्या संचायाची दादाने कधीच प्रयत्न केला नाही.
एकदा एक पोलीस ऑफिसर वहिनीला म्हणाले विजयच इतकं पराकोटीच काम आहे तर एकत्र करा शेवटी निशा आणि वहिनीने जबाबदारी घेतली इतके वर्षे पॅशनने केलेल्या कामाबद्दल दादाला पहिल्याच प्रस्तावात 2017 ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला….आणि आम्हा आंबेकर फॅमिलीला अभिमान रहावा अशी आयुष्यभरासाठी भेट दिली.
मराठी विद्यालय घाटकोपरच्या शाळेच्या मित्रांनी सत्कार ठेवला दादा फक्त 12 मिनिटच बोलला त्यात आई बाबा...वहिनी …. निशा .. सोनिया यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणलं ... संपूर्ण आयुष्य त्यागाची भावना ठेऊन ...कायमच जीव धोक्यात घालून मुंबई पोलीसाचे कर्तव्य पार पाडत राहिला ...पण समाधानाचे उत्तुंग शिखर सुद्धा गाठलं होत ….ते समाधान फक्त दादाचं नव्हतं … घरातील सर्व माणसांच होतं...शाळेतील मित्रांना होतं ...सोमय्या कॉलेजच्या मित्राचं होतं… आमच्या सारख्या भावाचं होत ...आज त्याच्या सर्व्हिसला 37 वर्षे होत आहेत ..पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार ...पण त्याच्याकडे बघून वाटतच नाही की दादाची सर्व्हिस संपत आली आहे
दादा तुला मानाचा सलाम...