अनिलदादा आहे ना...
( एक विश्वासाच नातं )
--------------------------------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
30 जून 2020
---------------------------------------------------------------
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी विश्वासाची नाती असतात ..पण तीचं अस्तित्व आपल्या आयुष्यात सामावलेलं असतं ...
तुम्हीही शोधा मग म्हणाल "------" आहे ना ...
या विश्वासाच्या नात्यावरच आपलं आयुष्य.. आनंद घेत असत ...दुःख शेअर करत...स्वप्न पहात असतं
ही विश्वासाची नाती विरळ होतात तेव्हा ...
सुशांतसिंग राजपूत सारखं घडत ....
आयुष्यात वरवर सर्व काही असल्यासारखं वाटतं आणि अंतर्मनात खुप एकटे असतो.
म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच करत आहे.
प्रत्येकाने आपल्या विश्वासाच्या व्यक्ती बद्दल
"----------" आहे ना ....असं अनुभवलं पाहिजे.
ही नाती असंख्य होत नाहीत ..एखादच असतं
हे विश्वासाचं नातं घरात पाहिजे...
मित्रांमध्ये पाहिजे ...
जिथे राहतो तिथे पाहिजे ....
काम करतो तिथे पाहिजे...
पण हा विश्वास अचानक नाही तयार होत ...त्यालाही इन्व्हेस्टमेंट करावी लागते.
इन्व्हेस्टमेंट असते भावनांची ...नात्यातील तरलतेची
माझ्या घरात अश्या विश्वासाची हक्काने सामावलेली व्यक्ती म्हणजे अनिलदादा
दादाची रिटायरमेंट..
असा मेसज आला आणि सर्रकन दादाचा संपूर्ण प्रवास आठवू लागला.
मी 10 एक वर्षाचा असेन .... 80 चे दशक
सकाळी 7 वाजता लगबगीनं पूण्याच्या गाडीवर पोस्टाची बॅग घ्यायला जाणारा दादा नेहमी आठवतो. अण्णा (माझे वडील.शिक्षक होते) धाकामुळे रत्नभूमी पेपरच पार्सल घेण्यासाठी मी ही त्याच गाडीवर डोळे चोळत उठायचो. उठायला उशीर झाला की, पाट चोळायची (अण्णांचा धपाटा खाऊन)वेळ यायची ..पण पेपरच पार्सल नक्की असायचं कारण अनिलदादा आहे ना... एव्हढा विश्वास अनिल दादा वर असायचा. हा विश्वास पोस्ट खात्यालाही असायचा.त्याकाळी संपर्काचे एकमेव माध्यम म्हणजे पोस्ट.एस टी गाडीवरच आवक जावक असायची ...ती चुकली की ...झाला बट्ट्याबोळ... अख्खी मुंबई कोकणची आणि कोकणची आर्थिक मदार मनिऑर्डरवर यांचा दुवा म्हणजे पोस्ट खातं.
अनिलदादा विश्वासाने आणि अदबीने काम करायचा.
अचानक पितळेची तबकडी लावलेला खाकी कपडे घातलेला दादा दिसला. कारण दादा आता एस टी मध्ये कंडक्टर झाला होता.तो चांगल्या नोकरीला लागल्याच्या आनंदापेक्षा गावातील लोकांना काळजीच जास्त होती ..ती म्हणजे सकाळच उठून एवढी वक्तशीर पोस्टाची बॅग कोण घेणार . दादाने एवढा विश्वास तयार केला होता. दादाने सायकल घेतली . मयु (माझा लहान भाऊ) आणि मी दोघे दादाच्या पाठीमागे शेपटा सारखे कायम असायचो. मी जरा जास्तच आगाऊ असल्याने पाय पुरत नसताना सायकलच्यामध्ये पाय घालून चालवायचा प्रयत्न करायचो .. आणि एकदा धाडकन खाली कोसळलो .. आई जवळ आली मला वाटलं मायेन जवळ घेईल ..पण कसलं ...जो रट्टा पडला आणि म्हणाली मेल्या अनिलदादा आहे ना... घे शिकून. अख्या वाडीत विश्वासाच दुसरं नांव म्हणजे अनिलदादा....
वाडीत कोणताही कार्यक्रम असो आणि वाडीचा अध्यक्ष कोणीपण पण असो पण १००% काम करायला अनिलदादा ...
हा विश्वास केवळ वाडीतच नव्हे ....तर एस टी विभागात पण कमावला... चिपळूण डेपोनंतर थोड्याच दिवसात गुहागर डेपोला बदली झाली ती रिटायर्ड होईपर्यंत ...
मी गोगटे कॉलेजमध्ये 11 वीला ऍडमिशन घेतलं.... मस्त ग्रुप झाला पण अनिलदादा आंबेडला असला तरी त्याचे शूज ..शर्ट कॉलेजला घालून मुरडायचो.
12 वीलाअसताना तर मोठी गंम्मत झाली .....
ट्रिपला आयोजन केलं तीन दिवस गोव्यात चांगले कपडे घालायचे म्हणून अनिलदादाच्या कपड्याचा धुरळा केला. मी रत्नागिरीत माईकडे(माझी सर्वात मोठी बहीण) पोलीसलाईनीत रहायचो. ट्रिपवरून आल्यावर दादा कपडे घेऊन जायला आला , ड्युटी संपली होती म्हूणून गोवा ट्रिपचा शर्ट घालून निघाला .. चर्च रोड कडून जाताना ट्रिपला असलेल्या माझ्या मैत्रिणींनी पाठीमागून दादाला पाहिलं त्यांना वाटलं मीच आहे त्यांनी आंबेकर म्हणून हाक मारली ,मुली हाक मारतायत म्हटल्यावर दादा घाबरला ..... भलताच लाजाळू ... तो कधी वहिनीसोबतसुद्धा सर्वांच्या समोर बोलताना दिसला नाही ...म्हणजे दादाची काय अवस्था झाली असेल....
त्याने जोरात चालायला सुरुवात केली आणि निघून गेला (हा प्रसंग आठवला की अजून हसायला येतं) किती शांत असावं म्हणजे आयुष्यात स्थैर्य येऊ शकत ..म्हणजे अनिलदादा आठवतो ...मी जेव्हा प्राध्यापक म्हूणून गोगटे कॉलेजमध्ये हजर झालो आणि पहिला पगार घेतला तेव्हा देवाजवळ पेढे, आई अण्णांना कपडे आणि दादाला निळ्याकलरचा बारीक चेक्सचा शर्ट घेतला होता. आई अण्णाच्या कपड्याचे रंग आठवत नाही पण दादा तसा नात्याने चुलतभाऊ असलातरी .त्याच गणितच वेगळं आहे .दादा फारच कमी बोलतो पण त्याच्या विश्वासपूर्ण वागण्यातून भावनिक गुंतवणूक होते
पोहायला जायचं असेल तर दादा हवा...
शिमग्याची भारे चोरायचे असतील तर दादा हवा ....
पूजेला / गोंधळात दादा नसेल तर जमतच नाही ...
क्रिकेट खेळायला दादा नसेल तर साली मज्जाच येत नाही.....
त्याच्या या वागण्यामुळे तो रिटायर्ड होतोय असं वाटतच नाही.
अनिलदादा सारखा दादा आयुष्यात असणं म्हणजे केव्हढी देवाची देणगी असल्यासारखं वाटतं ...
...पण हेच साक्षीला वाटतं आनंद अंकल आहे ना...
साक्षी दादाची एकुलती एक मुलगी आणि आमची लाडकी पूतणी ... ती 22 वर्षाची आहे पुण्यात 5 स्टार हॉटेलमध्ये काम करते . पण ती आमच्यासाठी अजूनही लहान वाटते... ती दादाच्या लग्नानंतर आठ वर्षांनी झाली...त्यामुळे खूपच लाडकी
मी गावी सण-समारंभात नक्की असतो ...साक्षीची सातवीची परीक्षा झाल्यावर मे महिन्यात आमच्या घरी वहिनी मागच्या दरवाजाने ( तो आमच्या साठी मुख्य दरवाजाच वाटतो ...कारण अख्ख गांव तिथेच आईशी गप्पा मारायला येतं) लगबगीनं आली...आणि म्हणाली भाऊ साक्षीला रत्नागिरीत शिकायला यायचं आहे आणि हे मान्य करत नाही आहेत.
...मी म्हटलं थांब आलो ... दोघांचं ऐकूण घेतलं आणि मग दादाला म्हणालो ...फाटक शाळेत साक्षीची मामी शिक्षिका आहे कशाला घाबरतोस ...शहरात मुलं स्मार्ट होतात .
दादाला फार समजावं लागलं नाही ... पण तसा निर्णय घेणे अवघड होतं आमच्या आंबेकरांमध्ये सर्वात मोठी शेती आणि गोतावळा असणार घर दादाचं ..आणि असं घर सोडून रत्नागिरीत येणं मुश्किल होतं.
...पण दादा आता वेगळ्या मोड मध्ये होता.. आनंद म्हणतोयना ....
साक्षीची 10 वी झाली ..मी दादा-वहिनीला आणि साक्षीला म्हणालो. माझं मोठं घर आहे तुम्ही माझ्या इथेच रहायला या... साक्षी माझ्याच कॉलेजमध्ये जाईल.
तिघे रहायला आले आणि माझ्या दोन मुलांनाही घरची माणसं मिळाली ...श्रवण (नर्सरीत असताना)तर संपूर्ण फॅमिली म्हणून शाळेत सर्वांची नांवे सांगायचा ..त्याचं पण असचं झालं अनिल काका आहे ना...त्यांनीच आर्या- श्रवणला सायकल शिकवली ...साक्षिला ऍक्टिव्हा शिकवायला मी मदत केली या छोट्या छोट्या गोष्टींच एकमेकांमध्ये विश्वासाच नातं तयार करतात.
बारावी नंतर काय करणार तर माझ्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ठरलं तितक्यात
मुंबईच्या पुतण्याला (अभिषेक ..त्याचे वडील म्हणजे माझा चुलत भाऊ कॅन्सरने मृत्यू झाल्याने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आली) रत्नागिरीत हॉटेल मॅनेजमेंटसाठी बोलवलं. मी साक्षीला म्हटलं 'प्लेन सायन्स करून काही उपयोग नाही .... तू पण हॉटेल मॅनेजमेंट कर' ... ती दुसऱ्या मिनिटाला तयार झाली दादाच तर म्हणणं होतं ..आनंद अंकल सांगतील तसं कर . कारण साक्षीच्या 10 नंतर कॉलेजमध्ये पालक म्हणून माझंच नांव असायचं ..म्हणूनच गेली वर्षभर साक्षी पुण्यात उत्तम 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत आहे. दादाच्या रिटायर्डमेंटच्या अगोदरच मुलगी कामाला लागली.. हिच दादासाठी सुखावह गोष्ट होती.
...माझ्यासाठी अनिलदादा आहे ना...
तर साक्षीसाठी आनंद अंकल आहेत ना.. हे आहे.
हीच नात्यातील विश्वासार्थाच आयुष्य सुलभ बनवते
अनिलंदादाच्या पुढील आयुष्यात सतत आम्ही सोबत असणारच आहोत ... तुला तुझी सेकंड ईनिंग सॉलिड जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻