अण्णा …. दूरदृष्टी बाप
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
7020737400
18 ऑगस्ट 2020
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
आज वडिलांचा आठवा स्मृती दिन आहे
------------------------------------------------------
अण्णा..प्राथमिक शिक्षक ...म्हणजे खरं म्हणजे चाकोरीबद्ध जीवन असलं पाहिजे होतं… बदली होणार जॉब … स्वतःच कुटुंब आणि शाळा असं सर्रास प्राथमिक शिक्षकांचे जीवन असतं….
पण सर्वांचे वडील जसे असतात तसे माझे वडील का
नाही ? असा प्रश्न नेहमी पडायचा ?
सतत मोठ-मोठ्या योजना आखायचे ….
सतत लोकांमध्ये असायचे ….
सतत त्यागाची तयार असायची ….
मग आमची फरफट व्हायची...
आमच्या सर्वच कल्पनेच्या पलीकडचे असायचे.
अण्णांनी हातात घेतलेलं एखादं काम लोकांच्या लक्षात यायचं की नाही... माहीत नसायचं ...पण मास्तर(प्राथमिक शिक्षक होते) बोलताय ना ? मग आपण सोबत आहोत ...असं अनेकवेळा व्हायचं.
...पण कधी लोक न्यूट्रल व्हायचे तेव्हा अण्णांची चिडचिड व्हायची...लहानपणी आमच्या समजण्याच्या पलिकडे असायचे.
...पण आज माझ्यासंदर्भात सुद्धा असं होतं तेव्हा कळतं (रक्ताचे गुण असतातच ना... )
अण्णा असे का वागायचे...
त्यांची व्हिजन काय होती...
त्यांनी सुरू केलेली प्रत्येक व्यवस्था आज लोकांच्या हिताची ठरत आहे. लोक आवर्जून अण्णांची आठवण काढतात ...आणि म्हणतात मास्तर होते म्हणून हे सर्व आज आहे.
वडिलांना बाबा कधीच म्हटलं नाही ...कारण आमचे चुलत भाऊ अण्णा म्हणायचे म्हणून आम्हीपण अण्णाच म्हणायचो
वडील कधी केवळ घरचे झाले नाहीत ...कारण शाळेचे शिक्षक असल्याने अख्या गावाचे (आंबेड) आंबेकर गुरुजी.
एकदा तर शाळाच घरात आणली ….
किस्सा एकदम फिल्म होईल असाच आहे. (1983) सालातील प्रसंग ….
शाळेची इमारत जुनी झाली होती … आम्ही शाळेच्या भिंतीजवळ बसायचो कारण भिंती चिऱ्याच्या होत्या पण आरपार होल होते.. त्यामुळे होलमधून मुंबई-गोवा हाय-वे वरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसायच्या
आणि मोठी सुट्टीपडून शाळेत आलो की त्याच होलमधे साप बसलेले असायचे ….इतकी जरजर अवस्था शाळेची झाली होती.
घरात अचानक नवीन घर बांधायचा विषय सुरू झाला
…. मी चुणचुणीत असल्याने बिनधास्त अण्णांना बोललो आम्ही नाही येणार नवीन घरात …आमचं मूळ घर भलमोठं आहे ...एकूण 20 दरवाजे आहेत.. ते पण चिरेबंदी….
पडवीत तर आम्ही क्रिकेट खेळायचो आणि पकडापकडी …त्यामुळे नवीन घरात जायचं नाही असं सांगितलं …. नवीन घर झालं ….आणि थोड्या दिवसांत आमच्याच नवीन घरात 4 थीचा आमचा वर्ग सुरू झाला. आणि 6 वी मध्ये असताना परत नवीन शाळेच्या खोलीमध्ये आमचा वर्ग सुरू झाला
परत काही दिवसांत नवीन घरातुन आम्ही परत जुन्या घरात रहायला आलो …
….हा सर्व उलटसुलट शाळेचा प्रवास का झाला ?
घराची अदलाबदल कश्यासाठी झाली त्यावेळी लहान वयात समजलं नव्हतं पण नंतर कळलं …
अण्णांना शाळेचं नवीन काम करायचं होतं..
त्यामध्ये अण्णांची धडपड लोकांना कळत नव्हती कळेपर्यंत आमची शाळेचा लपंडाव सुरू होता.
अण्णा म्हणजे लक्षात न येणार कोडं असायचं….
त्यातच त्यांची दूरदृष्टी होती.
किस्सा असा होता ...आंबेडची शाळा पडायला आली होती म्हणून शाळेजवळची जागा घेऊन अजून दोन वर्गाची शाळा बांधायला घेतली ...पण सगळीकडेच विघ्नसंतोषी लोक असतात त्यामुळे शाळेचे काम अर्धवट थांबलं ...सामान तर आले होते ...आणि अण्णांच्या सर्व अंगलट आले होते...म्हणून त्याच सामानातून नवीन घर झाले होते. एवढी मोठी आपत्ती ...मनस्ताप झाला होता त्यावेळी लहानपणी कळलं नव्हतं म्हणूनच नवीन घर बांधताना मी नापसंती व्यक्त केली होती ….परंतु चांगलं काम करण्यासाठी चांगली माणसं सुद्धा जोमाने मदतीला येतात त्यावेळी अतिशय सन्मानित व्यक्ती आणि आदराचे स्थान असणारे हसन खान ..नारायण गुरव ... मोहम्मद शिरगावकर ..धोंडू आंबेकर या लोकांनी अण्णांना योग्य साथ दिली आणि नवीन शाळेचे काम सुरू झाले होते. म्हणूनच नवीन शाळा झाल्यावर आम्ही नवीन शाळेत गेलो होतो. ….पण परत जुन्या घरात रहायला का आलो ? ….याचं असं झालं होतं की शाळेला निवेंडकर गुरुजी म्हणून नवीन मुख्याध्यापक आले होते अतिशय वक्तशीर आणि हुशार शिक्षक होते त्यांच्या बद्दल अण्णांना आदर होता आणि स्वतः एक वर्षानंतर मुख्याध्यापक म्हणून बदली होऊन जाणार होते म्हणून आपल्या नंतर शाळा सांभाळून घेणारा माणूस आपल्या जवळ असावा म्हणून नवीन घर त्यांना रहायला दिलं आणि स्वतः जुन्या घरात रहायला आलो ...आणि अण्णांच्या दूरदृष्टी मुळे तसेच झाले पुढील आठ वर्षं निवेंडकर गुरुजी आमच्या घरी राहिले ...आणि शाळेला चांगले दिवस आले ...शाळा 'केंद्र शाळा' झाली ..
आम्ही नवीन घरात रहायला होतो तरी जुन्या घरातील 11 भावांचा गणपती महोत्सवसाठी स्वतः झटायचे 2005 नंतर सर्व हिशोब करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली म्हणून आज आम्ही सख्ये चुलत 21 भाऊ एकत्र आहोत.. अण्णा गेल्यानंतर घर दुरुस्तीचा विषय आला तेव्हा केवळ 15 दिवसात 7 लाख रुपये सर्वांचे जमले आणि केवळ 4 महिन्यात घराचे काम पूर्ण झाले ...आम्ही 21भाऊ त्यांच्या सारखे एकत्र रहावेत म्हणून त्यांनीच पाया भरून ठेवला होता...ही अण्णांची दूरदृष्टी होती.
अण्णांची मी सातवीत असतांनाच 140 किलोमीटर लांब सापिर्ली - खेड मध्ये शाळेत प्रमोशन होऊन मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती . पाच सहा वर्षे राहिले
...तिथेपण जिवाभावाची माणस तयार केली. एकदा स्वाती देवळेकर(उर्फ बेबी म्हणजे माझी दोन नंबरची बहीण) ट्रेझरी ऑफिसमध्ये खेड मध्ये बदली होऊन आली... एक वयोवृद्ध बाई स्वतःच्या सुनेसाठी पेन्शनचे काम करायला आली होती तिचा मुलगा मिलिट्री मध्ये शहीद झाला होता. ट्रेझरीचा शिपाई बहिणीला म्हणाला.. वर्ष झालं ह्या म्हातारीच पेन्शनच काम कोण करत नाही ..बिचारी अतिशय आडगावातून येते...दिवसातून दोनच गाड्या अश्या सापिर्ली गावातून येतात ...बेबीला सापीर्ली गावाचं नांव ऐकलं आणि अण्णांच्या शाळेचं गांव म्हणून तिच्याबद्दल आपुलकी तयार झाली . त्याबाईच तासाभरात काम करून दिलं.. काम झालं म्हणून त्या बाईला अश्रू अनावर झाले ..तरुण मुलगा शहीद झाल्याचं दुःख होतच … मग बेबीने.. "मी आंबेकर गुरुजींची मुलगी" म्हणून सांगितले. मग ती बाई अण्णांबद्दल भरभरून बोलू लागली ...देव माणूस होता ..पोरांना चांगली शिस्त लावली होती म्हणूनच मुलगा मिलिटरीमध्ये गेला होता असे आवर्जून सांगितले.
ती बाई बाहेर गेली आणि थोड्या वेळाने वडापाव घेऊन आली….आणि म्हणाली बाई मला माहित आहे...हाफीसच काम झालं की हाफीसर पैसे घेतात ..पण तू आंबेकर गुरुजींची मुलगी आहेस तू पैसे घेणार नाहीस म्हणून वडापाव आणला आहे.. नको म्हणू नकोस.
बेबीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ...पण मनात वडीलांच्या संस्काराबद्दल अभिमान होता.
अक्षय कुमारचा टॉलेट सिनेमा पाहिला ...त्यामध्ये त्याला झालेला विरोध बघून अण्णांची आठवण आली होती 1984 साली सार्वजनिक शासकीय योजना टॉलेट
बांधायची योजना आली ...अण्णा शिक्षक असले तरी सर्व शासकीय आणि राजकीय कामात अग्रेसर असायचे ...संगमेश्वर तालुक्यातील सर्व राजकीय /शासकीय मीटिंग आमच्याच घरी असायच्या.. आमदार भाई सावंत खाजदार हुसेन दलवाई ...आमदार मुसा मोडक ...आमदार मामी भुवड ...अगदी आमदार सुभाष बने आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने सुदधा … ही सर्व मंडळी घरी यायची निवणुका हा विषय कमी होता पण शासकीय योजना कश्या राबवायच्या याबद्दल मोठं प्लॅनिंग असायचं ...त्यावेळी शासकीय स्तरावर स्वच्छता आणि आरोग्यासाठी सार्वजनिक संडास बांधायची योजना आली ...म्हणजे लोकांच्या उत्सुकतेचा भाग होता ... त्याचा मैला टाकीत सोडायचा हा विषय आला आणि कळीचा विषय सुरू झाला त्याची दुर्गंधी येणार अश्या भीती पोटी गावात कोणीच तयार नव्हते…. तो वापरायचा कसा ...स्वच्छ कसा करायचा … याबद्दल सर्वच अनभिज्ञ होते …जर संडास झाला तर आजूबाजूच्या घरात वास येणार अशी अफवा पसरली ..मग अण्णांनी तोडगा काढलाया आणि म्हणाले "माझ्या घराच्या शेजारीच बांधा" ….मग काही बायका आईच्या कानात खुसपूस करू लागल्या ….जरा मास्तराला समजवा ...पण आईचा अण्णांना पाठींबा असायचा म्हणूनच पुढे 1992 ला आई पंचायत समिती निवडणूक जिंकून आली होती (शिवसेनेची लाट असून सुद्धा ...त्यानंतर वांद्री मतदार संघात कॉंग्रेस कधीच निवडून आले नाही) आईपण लोकांना समजावू लागली संडास असणे आपल्या बाईमाणसांना किती महत्वाचे आहे.. सर्व बायका तयार झाल्या आणि शेवटी आमच्या घराच्या शेजारी गावचा पहिला सार्वजनिक संडास तयार झाला .सांडसाच्या साफसफाई साठी खुपच मेहनत घ्यावी लागायची.. त्यासाठी आमच्याच वाडीत राहणारे अतिशय मोजकं बोलणारे पण आदराचे स्थान असणारे माडखोलकर गुरुजी मदत करायचे अण्णांना सामाजिक काम करण्यासाठी कोणीना कोणी सोबत हवं असायचे. माडखोलकर गुरुजीं सिंधुदुर्गचे पण त्यांना सुद्धा आमच्या घराच्या शेजारी स्वतंत्र घर भाड्याने घेऊन दिले होते त्यामुळे त्यांचीही सहकार्य व्हायचे ...हळूहळू लोकं सज्ञान झाली ...इथेही अण्णांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते.
1988 मध्ये गावात टेलिफोन सेंटर असावं म्हणून लोकांच्या घरा-घरात फिरून जागृती केली ...गावातील पहिला टेलिफोन केळकर पोलीस पाटलाचा आणि दुसरा आमच्या घरी आला … शेजारीच मुस्लिम मोहल्ला असल्याने मस्कत,दुईत (गल्फ) मधून आलेले फोन सांगायला मोहल्यात आम्ही लहान मुलं जायचो... मग परत त्यांचा फोन येईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरु असायच्या.. आपुलकीने विचारपूस व्हायची ...मुळातच हिंदू-मुस्लिम असे दोन धर्म आहेत हे आम्हाला लहानपणी माहीतच नव्हतं ...कारण गौरी-गणपतीला.. मोहल्यातील खान फॅमिली,आंबेडकर फॅमिली, केळकर फॅमिली,फकीर फॅमिली, शिरगांवकर फॅमिली ,बोट फॅमिली यांचे दरवर्षी नवसाचे नारळ असायचे आणि आम्ही सुद्धा उरूस असायचा तेव्हा दर्ग्यात अण्णांसोबत नारळ घेऊन जायचो … होळीला आम्ही एकत्र आट्यापाट्या खेळ खेळायचो .. टेलिफोन आल्याने आम्ही फोनच्या निमित्ताने वारंवार भेटायला लागलो.
गावात सर्व लोकांनी एकत्रित शेतीची कामे करावीत म्हणून अण्णा नेहमी पुढाकार घायचे.. मोहल्ला, मोहिते वाडी, किंजळे वाडी, आणि आंबेकर वाडी यांची सर्वांची बैलाची जोत एकत्रित यायची ...आणि सकाळी इरल्यात बसून न्यारी आणि दुपारी कपड्यात घेऊन आलेलं जेवण खायचं… सगळ अविस्मरणीय होतं ...शेतात गाण्यांची जोरदार मैफिल असायची ….जणू एक सणच असायचा … पण अण्णांनंतर असं गावचं एकत्रित दर्शन मुश्किल झालं होतं...
मी जेव्हा रत्नागिरीत मित्रांचे ग्रुप करून काम करतो तेव्हा अण्णा खुष असायचे. 1994 ला शिर्डी येथे मी ट्रिप आयोजित केली तेव्हा गावावरून जात असल्याने 53 जणांना कांदा पोहे आणि चहा आईचे सकाळी 7 वाजता करून ठेवले होते त्या ट्रिपला असलेले सर्व मित्र आजही आठवण करतात .
(सर्व जाती धर्म ...एकत्र आणण्याचे
कार्य)
12 मध्ये मी आणि गौरी(माझी पत्नी) घरी(नाचण्यात) 5 मे ला लग्नाचा 10 वा लग्नाचा वाढदिवस एकत्रित करायचा म्हणून मुंबईत महेश (लहान भाऊ)ला फोन सुरू होता आणि अचानक गावातुन (आंबेड) फोन आला ...आई घाबरली होती ...ती म्हणाली अण्णां कसेतरी करत आहेत...7 दिवसांपूर्वीच आईला बरं नव्हतं म्हणून हॉस्पिटलमधून आणलं होतं आणि आई गावी गेली होती .. अण्णांना बरं वाटत नाही यावर विश्वास बसत नव्हता ….लगेच गावी जाऊन रत्नागिरी सिव्हीलमध्ये गौरी असल्याने दाखल केले पण … अण्णांना ब्रेन अटॅक आला होता दुसऱ्याच दिवशी मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो…त्यासाठी बिपीन शिवलकरने खुप मदत केली होती सोबत माजी विद्यार्थी अभिजित मांजरेकर होता...खेडमध्ये देवळेकर भाऊ ...नंतर जसलोक मध्ये दिपू ...बिपिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वा..आणि पुढे जवजवळ 4 महिने अण्णा कोमात होते ….सर्व वाडीतील लोक भेटून गेले आयुष्यभर बडबड करणारे अण्णा काहीच बोलत नव्हते ...हे बघवत नव्हतं... अण्णांच वय 78 होते पण त्या वयात सुद्धा कोणाचा जन्म कधी झाला आणि कोणाचा मृत्यु कधी झाला या तारखा घरातील लोक विसरले की, अण्णांना विचारायचे ...इतकी प्रत्येकाबद्दल आपुलकी होती .. 18 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी 7 वाजता अण्णां गेले असा मला फोन आला.. मी पोहचेपर्यंत रात्री 9 वाजले ज्यावेळी बीपीटी हॉस्पिटल क्वॉर्टर मधून अण्णांचा शेवटचा प्रवास सुरु झाला तेव्हा जवळजवळ 1 किलो मिटर लोकांची गर्दी होती ….एखाद्या खेडेगावात राहणारा शिक्षक... त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एव्हढी गर्दी म्हणजे नक्कीच अण्णांच्या सामाजिक कामाची सलामी होती.
अण्णांची आठवण कायम शाळेत रहावी म्हणून त्याचं महिण्यात आंबेडच्या शाळेला सेंट्रल साउंड सिस्टीम बसून दिली आणि अण्णांच्या सामाजिक कामाला पुढे नेण्याचा प्रारंभ केला.
(लग्नाचा 50 वा वाढदिवस)
या वर्षी 18 (ऑगस्ट) अण्णांचा 8 वा स्मृतीदिन आहे आम्ही चार भावंडाच्या कुटुंबांनी एकत्रित येऊन अण्णां आणि आईच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे जावा म्हणून " पारिजात फाऊंडेशन " ची स्थापना करत आहोत ….मोठी बहीण हयात नाही पण दोन मुली दिप्ती(मुंबई येथे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स), प्रीती(इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिक्षिका)आणि दोन जावई ...निलेश कादवडकर (मुंबई -व्यावसायिक आणि भाजपा तालुका अध्यक्ष)आणि प्रशांत नेवरेकर(वेब डीझायनर) ...दोन नंबर बहीण ट्रेझरी मध्ये अधिकारी, तिचे पती RDCबँकेत मॅनेजर विशेष म्हणजे 60 जणांचा स्वामी भक्त म्हणून उत्तम ग्रुप चालवता त्याचे दोन मुलगे एक धीरज HDFC बँकेत मॅनेजर सौरभ आपलं कोकण न्यूज चॅनेल मध्ये जॉब करतो,माझी मिसेस मेंटल हॉस्पिटलमध्ये नर्स, लहान भाऊ महेश MSEB मध्ये मॅनेजर (बांद्रा) विशेष म्हणजे 4500 सभासद असलेल्या पतसंस्थेवर संचालक म्हणून निवडून आला आहे त्यांची पत्नी पूर्वा BPT हॉस्पिटलमध्ये नर्स अश्या सर्वाना एकत्र घेऊन पारिजात फौंडेशन च्या माध्यमातून सामाजिक काम करून अण्णांच्या सामाजिक कामाचा वारसा पुढे चालवायला आहे, 5 वर्षांपूर्वीच जीवदानी परिवाराची स्थापना करून दर सहा महिन्यांने चिंतन शिबिराच्या माध्यमातून आम्ही एकत्र यायला सुरुवात केली आहेच त्यामुळे पारिजात फौंडेशन संकल्पना उदयास येत आहे ...आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आवश्यक आहेत.