बुधवार, ६ जानेवारी, २०२१

" परिचारिका " कोविड योध्दाला पुस्तकरूपी सलाम

" परिचारिका "

कोविड योद्धाला पुस्तकरूपी सलाम


डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी

दिनांक : 6 जानेवारी 2021

----------------------------------------------------------------



" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका "

या पीएच.डी.संशोधन अध्ययनाचे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी दोन शब्द पुस्तक निर्मिती बद्दल ...कोविड योद्धाची भूमिका सर्वांसमोर आणण्यासाठी असंख्य लोकांनी सहकार्य केले आहे त्याच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक दोन शब्द ... तर पुस्तक प्रकाशनाला आवर्जून मान्यवर उपस्थित होते त्याच्या प्रतिक्रिया सदर ब्लाँगमध्ये व्यक्त करणार आहे.कोविडकाळात प्रकर्षाने परिचारिकांची भूमिका समजून आली म्हणून हा प्रपंच ... 


मनोगत 

माझ्या पहिल्या पुस्तकाचे मनोगत लिहिताना एक लेखक म्हणून खूप आनंद होत आहे." रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका" या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला 2006 मध्ये ज्यावेळीं गडिंहीग्लज मध्ये डॉ.प्रभाकर द्राक्षे सर यांच्याकडे मी पहिल्यांदा एक संशोधक विद्यार्थी म्हणून गेलो आणि एम फिल साठी काय अभ्यासक्रम घेऊ शकतो अशी सुरुवात झाली. सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये एखाद्या कम्युनिटीचा स्टडी करायचा विचार चालू होता परंतु द्राक्षे सरांनी गप्पा मारायला सुरुवात केल्यावर  त्यांच्या लक्षात आलं की माझ्या कुटुंबांमध्ये  परिचारिका महिला खुप आहेत. सरांनी सुद्धा एक परिचरिकेवर एक अत्यंत आत्मीयतेने अभ्यास करून लेख लिहिला होता. त्यामुळे परिचारिका विषय घ्यावा असे वाटू लागले.पीएचडी च्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील यांनी सुद्धा " परीतक्त्या " यावर संशोधन अध्ययनाचे  पुस्तक लिहिले होते. त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं आणि त्या क्षणी वाटलं की आपल्या पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर  आपण सुद्धा " परिचारिका " या विषयावर  पुस्तक लिहायचं.


      या पुस्तकाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भावनिक पातळीवर जास्त विचार केलेला आहे. तसं पाहिलं तर वरवर आपल्याला व्यावसायिक भूमिकांचा अभ्यास आहे असा दिसेल परंतु परिचारिकांच्या भावनिक कोषाचा येथे भरपूर विचार केलेला आहे आणि त्यामध्ये असलेले तात्विक मुद्दे पूर्णपणे  तत्वज्ञानावर आधारित आहेत  हे मुद्दे सर्वांना पुस्तक वाचताना आदर्श रूप वाटतील. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे संपूर्ण समाजातील सगळ्या वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक होईल अशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. प्रकरण-2 मध्ये शारीरिक स्वच्छता आणि शारीरिक तपासणी याचा अत्यंत आदर्श रूप लिखाण केलेले आहे म्हणजेच केवळ परिचारिकांच्या भूमिकांचा अभ्यास न करता आपल्या प्रत्येक घरांमध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशी शारीरिक जोपासण्यासाठी इथे प्रकरण तयार केलेला आहे. 

      परिचारिका यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये भारतीय कालखंडामध्ये समाजसेवी गरजेतून व्यावसायिक सुरुवात कशी झाली याची मांडणी केली आहे तसेच पाश्चिमात्य देशात युध्द काळामध्ये गरज म्हणून सुरू झालेली परिचर्या व्यवस्था आधुनिकतेकडे कश्याप्रकारे वळली याचे विवेचन केले आहे यामध्ये फ्लॉरेन्स नाईनडेंगेल च्या कर्तृत्ववाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो.


     पुस्तक लिहिण्यासाठी सात आरोग्यखात्यातील पुस्तक लेखकांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यात आला आहे तर भारतातील तेरा विविध विद्यापिठामध्ये संशोधन झालेल्या अध्ययनाचा गोषवारा मांडण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथनाचा आनंद घेता येणार आहे.

    अध्ययन करण्यापुर्वी सतत निरीक्षक करत असताना  आजूबाजूला अनेक परिचारिकांच्या जीवनातील घटना निरीक्षल्या गेल्या त्यातून खरी लिखाणाची उमेद निर्माण झाली अनेक घटना तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत  नियमित बघण्यातील परिचारिका किती सामान्यपणे आपलं जीवन जगताना दिसतात पण थोडं त्याच्या आयुष्यात डोकावल्या नंतर किती असामान्य काम करतात याची प्रचिती आली. त्यामुळे संशोधन लिखाणात ललीत लिखाणाचा आनंद घेता येणार आहे.

   सहकारी परिचारिकांशी सहकार्य घेताना देताना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑर्डर घेताना त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी व्यवहार करताना परिचारिकेचा संघर्ष होताना दिसतो तोच संघर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतो आपल्यालाही अशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात अशा वेळेला परिचारिकांच्या भूमिका टॉपिक तुम्हाला वाचताना आपल्या भूमिकांची नक्की जाणीव होईल आणि स्वतःच्या  आयुष्यासाठी सुद्धा हे वाचन उपयोगी पडेल असे मला आवर्जून सांगायचे आहे 

हे केवळ पीएचडीच्या चिकित्सक अभ्यासाचे पुस्तक नाही तर प्रत्येक व्यक्तीला अनेक भूमिका पार पाडताना जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाचे निराकरण कसे करावे यासाठी हे " रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका "  हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते.

--------------------------------

पुस्तक खरेदी करण्यासाठी विशेष सवलती 

मूळ मूल्य : 220 /

कोविड काळात वाचकांसाठी मूल्य : 200/-

परिचारिकांसाठी विशेष मूल्य : 180/- 

संपर्कासाठी नंबर : 9422372009 

--------------------------------


ऋनानुबंध 


"रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका"

 हे पुस्तक लिहिण्यासाठी मला अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केले आहे परंतु सर्वप्रथम ज्यांचे ऋण मी मानू इच्छितो त्या आहेत 100 शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिका  ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि वेळा बरोबर अत्यंत मनापासून संवाद साधला त्यामुळेच या विषयासंदर्भात आपुलकी निर्माण झाली. माझी पत्नी गौरी आणि दोन मुलं आर्या आणि श्रवण यांचा मनापासून ऋणी आहे ,  कारण कौटुंबिक अपेक्क्षांची तडजोड करून पुस्तक लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर माझी आई बहीण स्वाती देवळेकर तिचे पती सुधीर देवळेकर आणि भाऊ महेश त्याची पत्नी पूर्वा त्यांच्या भावनिक पाठिंब्यामुळेच मी पुढची वाटचाल करू शकलो. 



 कोल्हापूर मध्ये काम करण्यासाठी येणार म्हटलं की माझा अत्यंत जवळचा मित्र अमर हिलगे आणि कुटुंबातील सर्वच सदस्य आपुलकीने वागतात म्हणून येणारा तणाव कमी व्हायचा अमर तर मी कोल्हापूरला येणार म्हटलं की शिवाजी पुलावर  वाट बघत बसतो आणि आम्ही संपूर्ण काम होईपर्यंत त्माझ्यासोबत राहतो त्या सहवासाची किंमत करता येणार नाही. 

        खरं पाहिलं तर एक टायपिंग करणारा माणूस मित्र कधी होऊन जातो कळलंच नाही.  मैत्रीपूर्ण सल्ले देणे किंवा मैत्रीपूर्ण भावनिक आधार देणे हे श्रीकांत देसाईला ( नंदू ) अत्यंत खुबीने जमते म्हणूनच त्याचे प्रोत्साहन पुढच्या कामासाठी मला उपयोगी पडत असते.

       रत्नागिरीतील वैयक्तिक मित्रांपैकी बिपिन शिवलकर आणि बिपिन बंदरकर या दोघांचा अतिशय खंबीर पाठिंबा असतो आणि मला अत्यंत गरजेचा असतो.त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे कामाला सतत उमेद येते.

      वैचारिक पातळीवर मला सतत पाठिंबा देणारे माझे प्राध्यापक मित्र डॉ.राजेंद्र मोरे, उदय बामणे या दोघांच्या सतत विचारपूर्वक संभाषणातून माझ्या कामाला सतत प्रोत्साहन मिळत असते ते इतर कॉलेजमध्ये प्राध्यापक असले तरी माझें समवयस्क  असल्याने सतत त्यांचा वैचारिक पाठिंबा असतो. प्राध्यापक शुभम पांचाळ आणि भक्ती दळवी  यांनी अतिशय  आशयपूर्ण  मुखपृष्ठ तयार केले आहे शुभम हा खरं म्हणजे माझा विद्यार्थी.. नंतर झाला माझा सहकारी प्राध्यापक आणि आज तो  क्रिएटिव्ह काम करण्यासाठी सतत सहकार्य करणारा सोबती झाला आहे.

       पुस्तकाची तयारी करण्यासाठी माझ्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील या सतत मला प्रोत्साहित करत राहिल्या आणि उत्तम पुस्तक होण्यासाठी अजून काय करता येईल याचा सतत पाठपुरावा घेतला .

     महाविद्यालयातील सहकार्‍यांमध्ये समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे,प्रा.शिवजी उकरंडे आणि सहकारी सचिन सनगरे यांचीही सतत प्रोत्साहन असते. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुखटणकर हे केवळ महाविद्यालयाचे प्रशासक  नराहता माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी आदर्श  काम कसे करू शकतो याचे सतत  मार्गदर्शन करत असतात, सहकारी मित्र बापू गवाणकर , प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी, डॉ.मकरंद साखळकर, यांचेही सतत प्रोत्साहन असते. 

     आरोग्य विभागातील कै. डॉ. दिलीप मोरे आज ते असते तर खूप खुष झाले असते मला सतत आपुलकीच्या ..वडीलधारीच्या हक्काने सतत मला मार्गदर्शन करत असायचे त्याचबरोबर डॉ. शिवदिप किर यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषणातून मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले  ते स्वतः मेडिकल कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत अल्याने त्यामुळे या पुस्तकासाठी त्यांच्या संभाषणाचा अत्यंत उपयोग झाला आहे.दूरदर्शन सह्याद्रीचे माजी निर्माता श्री जयु भाटकर यांचे सतत आदर्श काम करण्यासाठी मार्गदर्शन असते. 

     रत्नागिरीतील पत्रकार अरुण आडिवरेकर, राजेश कळंबटे, जान्हवी पाटील,समीर शिगवण,अनघा निकम , शोभना कांबळे, मेहरूनिसा नाकडे,  आणि  रत्नागिरी खबरदारचे संपादक आणि जिवलग मित्र हेमंत वणजु यांचे पुस्तक निर्मितीसाठी  सतत पाठिंबा आहे

     शेवटी मी असा उल्लेख करीन की, हे पुस्तक संपूर्ण परिचारिकांच्या आयुष्यात केवळ मार्गदर्शक न होता शासन पातळीवर ती त्याची नोंद घेण्यासाठी मला माझे राजकीय मित्र आदरणीय शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन असते  त्यांच्या पाठिंब्याची कायम हमी असते. 

    . 

--------------------------------


मान्यवरांचे आशीर्वाद


" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका " डॉ.आनंद आंबेकर यांच्या पीएच.डी. संशोधनावर पुस्तक निर्मिती करण्यात आली , या पुस्तकाच्या सोहळ्यासाठी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर , मित्र परिवार अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून गेली नऊ वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉ. उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद आंबेकर यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 100 शासकीय आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिकांची मुलाखत घेऊन अध्ययन केले. संपुर्ण भारतातील सोळा विद्यापीठातील परिचारिका अभ्यासकांच्या पीएच.डी. अध्ययनाचा गोषवारा घेऊन सदर अध्ययन करताना " भूमिका संघर्ष " या प्रमुख संकल्पनेवर सदर अध्ययन केले. 

 महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुस्तकाची पहिली प्रत देऊन त्यांच्या घेतल्या आणि पुढील परिचारिका वेलफेअर साठी सहकार्याची ग्वाही दिली.सदर भेटीसाठी रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री.हेमंत वणजू यांनी विशेष सहकार्य केले.सोबत मित्र राजा साळवी आणि मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समनव्यक श्री निलेश सावे , रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री प्रदीप तथा बंड्या साळवी उपस्थित होते

   डॉ.आनंद आंबेकर यांनी प्रास्ताविक करताना आवर्जून सांगितले की तीन वर्षे फिल्ड वर्क करताना अनेक अनुभव सर्वासोबत सांगितले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंग आलेले सांगितले. डॉ.अलिमियाँ परकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले की, डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे समाजाभिमुख शिक्षणाला चालना मिळेल तसेच परिचारिका या माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या कणा आहेत असे आवर्जून सांगितले.

     रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोविड काळात परिचारिका समाजाच्या किती महत्वाचा घटक आहेत हे जगासमोर आले आहे, आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे परिचारिकाच्या  आयुष्याला शास्त्रीय दृष्टीने पाहता येईल. 

     माजी आमदार आणि यश फौंडेशन नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्चचे संस्थापक बाळासाहेब माने यांच्या  रत्नागिरीतील पहिल्या नर्सिंग कॉलेजच्या  चॅलेंजीग गोष्टी कथित केल्या आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाबद्दल आवर्जून उल्लेख केला.


     

 संगमेश्वरी रक्तामुळे जास्तीतजास्त सामाजिक भान आहे की काय असे मिश्किल व्यक्तव्य करत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.,अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थीदशेपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे आवर्जून उल्लेख केला. 

     आत्मनिर्भर होण्यासाठी महिलेने संघटित होण्याची आणि समाजातील सर्वच क्षेत्रात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे यासाठी परिचारकाचा प्रत्यक्ष फिल्ड मधील डॉ.आनंद आंबेकर यांचे अध्ययन परिचारिका आत्मनिर्भर होण्यासाठी नक्की उपयोगी पडेल असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले .

   डॉ.आनंद आंबेकर गोगटे महाविद्यालयाच्या सर्वच आघाडीवर अग्रेसर असतात त्यांच्या ऊर्जेचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो असे जाणीवपूर्वक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.


  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी असे सांगितले की,विद्यापीठातील 800 कॉलेजचे समन्वयक म्हणून काम करताना डॉ.आनंद आंबेकर यांचे वेगळेपण कायम दिसत असते, आम्ही दोघे स्वतःच्या कॉलेज दशेपासून युवा महोत्सव मध्ये सक्रिय होती तिथं पासून त्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते.


बिपीन बंदरकर,जयु भाटकर,डॉ.निधी पटवर्धन, रवींद्र केतकर, हेमंत पाडगावकर,बाळा पावसकर विशेष उपस्थित होते.

पुस्तकाच्या सुबक मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल प्रा. शुभम पांचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


  कार्यक्रमाला डॉ.आनंद आंबेकर यांचा महाराजा परिवार आणि  95 परिवार आवर्जून उपस्थित होता, अनेक आजी माजी विद्यार्थी आयोजकांच्या भूमिकेत असलेले दिसत होते, तसेच प्राध्यापक समूहाचा मनस्वी परिवार उपस्थित होता तसेच अनेक मित्र आणि आई चंद्रभागा, पत्नी गौरीं आणि परिवारातील सभासदांबरोबर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विणा लेले आणि मुग्धा सोहनी या आजी माजी मेट्रन  आणि परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष स्नेहा बने आवर्जून उपस्थित होत्या. साक्षी कॅटर्स च्या साक्षी आंबेकर आणि स्वप्नील केळशिकर, साई मंगल कार्यालयाचे मंदार दळवी यांनी उत्तम सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा.आरती पोटफोडे यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ.आनंद आंबेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

सचिन सावंत : स्वतंत्र विचाराचा..पण भावनिक मित्र

सचिन सावंत : स्वतंत्र विचाराचा..पण भावनिक मित्र


प्रा.डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

11 डिसेंबर 2020

--------------------------------

--------------------------------

 

    सचिनला पाहिल्यावर तो वरकरणी अतिशय साधा ...थोडं भूजल व्यक्तिमत्व वाटतं ..पण मनातून अतिशय ठाम.. स्वतंत्र विचाराचा आणि सगळ्यात महत्वाचं खूपच भावनिक मित्र. आयुष्यात अशी अनेक व्यक्तिमत्व येतात की त्यांच्याशी आपण ठरवून मैत्री करू शकत नाही ...ठरवून संबंध ठेवू शकत नाही ...एक अनाहुतपणे आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्यभर त्यांचा सहवास राहतो . आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण कायम सोबत राहणार्या त्या काही ठराविक लोकांमध्ये सचिन आहे.

     सचिनची आणि माझी मैत्री ती कधी दिखाव्याची नव्हती किंवा कधी मेन्टेन करावं लागलं नाही. परंतु सचिन माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा मित्र.  महाराजा परिवारातला अतिशय जवळचा आणि सर्वांमध्ये अतिशय आपुलकीचं स्थान असणारा सचिन. अकरावीला असताना थोडं महिनाभर लेट आलेला ..डोळ्या वरती काळा गॉगल घातलेला … अतिशय बुजरा मुलगा वर्गामध्ये एंट्री करतो आणि पाठीमागच्या पोरांना मस्करीचा विषय मिळतो .

मी तिसऱ्या-चौथ्या रांगेत बसायचो आणि तो पुढच्या बेंचवर येऊन हळूच बसला ... मधल्या सुट्टी मध्ये त्याची काही पोरं मस्करी करायला लागले ..पण का कुणास ठाऊक त्याच वेळेला त्याच्याबद्दल अतिशय आपुलकी वाटली आणि मग तूफील पटेल ,मी आणि  सचिन सोबत  बसायला लागलो. त्याचे शब्द काही आठवत नाहीत ...फार कमी बोलायचा .. पण आता महाराजा ग्रुप तयार झाल्यानंतर सचिनचा  मिस्कील स्वभाव सगळ्यांनाच मजा देऊन जातो..  एखाद्या ट्रीपमध्ये ...एखाद्या भेटीमध्ये सचिन नसेल तर त्याची आठवण नक्की निघते….म्हणजे त्या गॉगलवाल्या सचिन पासून आजच्या सचिन पर्यंत एवढा मोठा बदल झालेला आहे. 

    बारावीनंतर मला भाऊजींची बदली झाल्यामुळे रत्नागिरीत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला 

.,जेव्हा सचिनला कळलं की मला रत्नागिरी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा सचिन सहज म्हणाला … अरे माझ्या घरी येऊन राहा ..मला थोडं वेगळं वाटलं पण बाकीच्या मित्रानी सांगितलं की,  त्याच्याकडे मुलं पेइंगेस्ट म्हणून राहतात पॉलिटेक्निक च्या शेजारी घर असल्यामुळे हे नेहमीच आहे  त्यांच्यासाठी .मी फार विचार न करता त्याच्याकडे रहायला लागलो. काकी -काका -नितीन सोबत आता त्यांच्यासोबत मीसुद्धा राहायला लागलो.  आजी-आजोबा असताना पण त्याना काहीच वाटलं नाही की हा परका मुलगा आहे अगदी घरासारखे रहायचे. एकदा मला गाडी शिकवण्यासाठी गाडी घेतली आणि गेटवर आदळली ..माझ्याकडून गाडीचे नुकसान झाले होते. सचीनइतका दिलदार मित्र की आम्ही गपचुप दुरुस्ती करून आणली घरात कळू नये म्हणून सर्व काळजी घेतली 

  सिनियरला आल्यानंतर सॉरी खुप बदलली होती फार उशिराने गाडी घेऊन जायचे... त्याचा स्वभावात खूपच बदल झाला होता. त्याच्यातून परीक्षेचा फॉर्म भरायचा राहिला होता आणि ही गोष्ट आमच्या काकीला कळली…, काकीला मी आपल्या मुलासारखा  वाटत असल्यामुळे माझ्यावर येवढि रागवली की ..रागाने बोलली ..तुला आम्ही पेइंस्ट म्हणून ठेवला नाही आहे. माझ्या मुलासारखा आहेस मग सचिन चा फॉर्म भरला गेला नाही तर तू का नाही लक्ष दिलं. ... आणि माझ्याकडून ही दुर्लक्ष झालं होतं  काकीचा पारा चढला होता रागान बोलून गेली की...  तू निघून गेलास तरी चालेल ...सचिन पटकन बोलला जर आनंदला घरातून बाहेर काढलंस तर मी सुद्धा घरातून बाहेर पडेन आणि तो ठाम होता.

लहानपणापासूनच सचिनचा स्वभाव माहिती असल्यामुळे काकीने नरमाईने घेतलं आणि मी घरातच राहिलो आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याच्या घरी तीन वर्ष होतो. अपेक्षा घरातील व्यक्ति म्हणूनच राहत होतो आजी-आजोबा ,काका काकी , नितीन सगळे मनापासून माझ्यावरती प्रेम करायचे आपुलकीने वागायचे … पण या  सर्वांचा दुवा होता तो म्हणजे सचिन.

मी एम ए ला कोल्हापूरला शिकायला गेलो पण मध्ये आल्यावरती सचिनच्या घरी भेटीसाठी जायचो.  लेक्चरर म्हणून जॉईन झाल्यानंतर काकीला नेहमी भेटाव म्हणून मी मुद्दामहून मी काकीकदंबआरडी काढली होती.

   अनेक लोक परिस्थितीबद्दल तक्रारी करण्याच्या मूड मध्ये जास्त असतात ...त्याच्यामुळे झालं नाही … यांच्यामुळे अडचण आली अश्या सबबी देत असतात  परंतु सचिन याबाबत फार अजब व्यक्तिमत्व तो कधीच कोणाला दोष देत नाही आलेल्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणं... दिलखुलास राहणं मजेशीर राहणं. असं सचिनला बघून कधी कधी त्याचा हेवा वाटतो.  तो बँकेमध्ये रिकवरी म्हणून काम करतो ... प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे कित्येक वर्ष  एकच काम करत आहे. त्याच काम फिरतीच असतं …,पण कधीही थकवा जाणवत नाही ..बॉस बद्दल तक्रार जाणवत नाही … घरातल्या अनेक अडचणी होत्या परंतु कधी  मित्रांशी कधी डिस्कस करताना दिसला नाही आपल्या परीने जेवढे शक्य असेल तेवढे लढायचं नाही तर सोडून द्यायचं. सचिनच्या या स्वभावामुळे सचिनला अतिशय खूप कमी मित्र आहेत परंतु अतिशय जवळचे मित्र आहेत.

         मधल्या काळामध्ये सचिनला ड्रिंक करायची सवय लागली होती मी  कोल्हापूरला शिकत असताना अचानक सुजित किरचा निरोप आला…  म्हणाला सचिनना जरा बघून ये..तो काय फार दिवस जिवंत राहील असे वाटत नाही. … आणि आम्ही भेटायला गेलो सुजीतला त्याचा  अतिशय राग पण आला होता आणि त्याची अवस्था बघून भीती वाटत होती. याच गोष्टीने खूप ओरडला आणि कानाखाली पण मारली  हरामखोरा तुला वाईट सवय सोडायला काय होते.   आम्ही त्याला समजवल परमेश्वर कृपेने थोड्या दिवसात असं जाणवलं की त्यांनी पूर्णपणे आपली ड्रिंक सवय सोडून दिली होती... इतकच नव्हे तर अल्कोहोलिक ऍनिमिक संघटनेतर्फे ड्रिंक करणाऱ्या लोकांना जागृती करण्यासाठी सुद्धा काम करायला लागला होता. अनेक वर्ष त्याचे अशेच मित्र होते. ड्रिंक्स करू नये म्हणून जागृतीचे काम करत होते 

आज सचिनचा वाढदिवस आहे ...पण आम्हाला नवीन जन्म घेतलेला सचीन दिसतो.


शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

स्वप्न दाखविणारी बहीण

स्वप्न दाखणारी बहीन  ..


प्रा.डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

20 नोव्हेंबर 2020 

---------------------------------------------------------------


रत्नमाला म्हणजे बेबी ...माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी बहीण ...पण तिचं शिक्षण करण्यासाठी ती आठवीमध्ये असतानाच रत्नागिरीमध्ये महिला विद्यालय येथे शिकायला गेली आणि तिथेच हॉस्टेलमध्ये राहायची त्यामुळे आम्ही बहीण आणि भाऊ म्हणून ज्या पद्धतीने आम्ही राहायला पाहिजे होते ...भांडायला पाहिजे होते ….तसं कधी झालंच नाही पण ती बारावीला असताना  ती आंबेडला रहायला आली आणि मी सातवीला होतो कॉलेजचा अभ्यास करायची बेबीची अजब सवय होती.

तिला नाटक ऐकायची सवय होती एकदा " तरुण तुर्क म्हातारे अर्क " हे मधुकर तोरडमल यांचे नाटक ऐकत होती मी सुद्धा अगदी तन्मयतेने ऐकत होतो .. त्या नाटकात बिनधास्त कॉलेजची मुलं आणि त्याचे प्रताप ऐकत होतो ...याच वेळी नकळत पहिलं स्वप्न पाहिलं गेलं की ...आपण कॉलेजला जायचं .. दंगामस्ती करायची ...बेबी दाखवलेले दुसरे स्वप्न म्हणजे  तिची मैत्रीण मनीषा पाटणे आमच्या घरी कधी कधी आमच्या घरी यायची ती खुप छान दिसायची मी  बेबीला म्हणायचो  ती मनीषा ताई किती छान दिसते ..बेबी म्हणाली तुला छान छान मुली आवडतात तर तुला कॉलेजला जावे लागेल ...मित्र मैत्रिणी कराव्या लागतील ... मी पण मनात ठरवलं की आपण कॉलेजला जायचं आणि मैत्रीचा ग्रुप असण्याची एक आवड निर्माण झाली.ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः कॉलेजला आल्यानंतर केल्या ...नाटकात काम केलं.. कॉलेजचे मित्र मंडळ तयार केलं आणि कॉलेजच्या मजा-मस्ती साठी स्वतः ट्रिप.. कार्यक्रमांचं आयोजन करायला लागलो ही नकळतपणे मी बेबीमुळे पाहिलेली स्वप्न पूर्ण करत होतो.

जॉब संदर्भात सुद्धा असंच झालं बेबीला  ट्रेझरी ऑफिस मधला तो किस्सा आठवतोय .. ट्रेझरी ऑफिस चा माणूस आमच्या घरी आला आणि  सांगितले की तुमच सिलेक्शन झाल आहे.

  मलाही वाटलं की आपण सुद्धा चांगलं करायचं की लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे …गोगटे कॉलेजमधून फोन आला की माझं सिलेक्शन झाले आहे तेव्हा बेबीच्या जॉबच्या एंट्री ची आठवण झाली होती .

माझ्याच  कॉलेजला हजर झालो होतो बेबीने दाखवलेलं मला स्वप्न पूर्ण झालं होतं.

"आपण खूप छान काम करायचं तुम्हाला नक्की विचारणार" हा बोध घेतला होता.

 बेबीने फ्लॅट घेतला आणि त्यानंतर स्वतंत्र घर बांधल घर पाहिल्यानंतर माझ्याही मनात असं वाटायला लागलं की आपण सुद्धा स्वतःच्या घरात रहायला पाहिजे ... गार्डन करायला पाहिजे ...आणि दोनच वर्षात मी सुद्धा मी घर घेतलं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं बेबी आवर्जून कौतुकाने माझा नेहमी उल्लेख करते माझ्या भाच्यांचा आयडॉल करून ठेवला आहे.

खेडमध्ये राहत असताना शिवतर रोड वरती एक स्वामी समर्थ मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सर्व भक्तगणांचा एक खुप छान ग्रुप बेबी आणि भाऊजी आमचे देवळेकर यांनी तयार केलाय त्यांची फॅमिली  पाहून मी पण बेबीला म्हटलं बेबी आपण पण आपल्या फॅमिलीचा ग्रुप करायला पाहिजे आणि काही वर्षातच आम्ही आमच्या मैत्रीपूर्ण असलेल्या भावंडांचा एक जीवदानी ग्रुप केला आणि  ..एक फॅमिली साठी सपोर्ट सिस्टिम तयार झाली

 अशा प्रत्येक वेळेला बेबीने स्वप्न दाखवण्याचे काम केलं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सतत त्याच्या मागे लागलो ती स्वप्न बघत असताना येणाऱ्या अडचणी बेबी माझ्याशी चर्चा करायची परंतु अडचणी पेक्षा किती समाधान आहे... किती सुख मिळतं या गोष्टींमध्ये हे सांगायचे त्यामुळे अडचणींना मात करण्याची ताकद तयार करायची म्हणूनच आज बेबीच्या वाढदिवसाला एवढं आवर्जून सांगेन की मी खूप समाधानी आहे मी खूप नशीबवान आहे की मला स्वप्न दाखवणारी बहीण आहे.



रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

अभ्यास पी एच डी चा ...परीक्षा आयुष्याची

अभ्यास पी एच डी चा...परीक्षा आयुष्याची


प्रा.डॉ.आनंद आंबेकर

समाजशास्त्र विभाग

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

8 ऑक्टोबर 2020

–-------------------------------


महाविद्यालयात काम करत असताना पी एच डी करणे म्हणजे मोठी कसरत असते म्हणूनच अनेक प्राध्यापक अभ्यास रजा घेतात आणि आपल्या संशोधन विषयावर पूर्ण लक्ष देऊन संशोधन पूर्ण करतात  ...परंतु माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही. उलट अध्यापन कामा बरोबरच सर्वात व्यस्त असणाऱ्या सांस्कृतिक विभागांची ही जबाबदारी सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने काम करत होतो. स्पर्धात्मक काम असल्याने खुप प्रेशर घेऊन आणि देऊन काम करून घ्यावे लागत होते. म्हणूनच या नऊ वर्षात दोन वेळा महाविद्यालयाचे नॅक असेसमेंट झाले आणि A ग्रेड मिळाली त्यामध्ये आमच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी मोठी असायची .

महाविद्यालयाच्या जबाबदारी असायचीच ...पण या नऊ वर्षात कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अनाहूत पणे पडत राहिल्या …

2009 ला M.phil पूर्ण झाल्यानंतर 2010 ला Phd च्या रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केला ...मुलाखत होती त्याच्या आदल्यादिवशी गौरीची (पत्नी)आई  आजारी पडली अचानक मालवणला जावं लागलं… त्यांची तब्बेत स्थिर झाल्यावर मिसेसनेच धीर देऊन मला पी एच डी च्या मुलाखती साठी पाठवलं ...गगनबावडा घाटातून माझी दमछाक झाली होती ...प्रचंड उलट्या होत होत्या…हॉस्पिटलमधून आल्याने माझ्याकडे कपडे सुद्धा व्यवस्थित नव्हते ...अमर (कोल्हापूरचा मित्र ) सोबत होताच ...कपड्याच्या शोरूम मधून कपडे घातले आणि इंटरव्ह्यू ला गेलो ...पण हॉस्पिटलमधल्या वातावरणाचा मनावर परिणाम असल्याने मुलाखत चांगली झाली नव्हती ...सहाजिकच माझे सिलेक्शन झाले नाही.

परंतु मिसेसने दिलेला धीर आयुष्यभर विसरू शकत नाही … श्रवण एक वर्षाचा होता ….त्यात तिची आई आजारी होती तरीही मला पाठींबा देत होती.

शेवटी….

2011 ला रजिस्ट्रेशन झालं …"परिचारिका"  या  विषयाची निवड होई पर्यंत 2012 उजाडलं 

 2012 ला...3 मे 2020 रोजी लग्नाच्या दहाव्या ( 5 मे)वाढदिवसाच्या तयारीसाठी  नातेवाईकांना फोन सुरू होते..अचानक आंबेड मधून फोन आला अण्णांना कसतरी होतंय म्हणून ..मी आणि गौरी आंबेडला गेलो ...सिव्हिल मध्ये समजलं वडिलांना ब्रेन हॅमरेंज झाला आहे ...लगेच मुंबईत जसलोकमध्ये घेऊन जायचं ठरवलं  ..दिपू ( भाची) जसलोकमध्ये असल्याने सोपं होतं पण जाताना बिपीन शिवलकर.. अभिजीत मांजरेकर.. देवळेकर फॅमिली ..सुनीलदादा मदतीला होते ... हॉस्पिटलमध्ये 4 महिने उपचार केले पण यश आले नाही अण्णा गेल्याने आंबेड गावातील सर्व जबाबदाऱ्या येऊन पडल्या त्यातच गावातील घराचे नूतनीकरण केले 21 भावाना एकत्र करून काम करायचे म्हणजे मोठी कसरत होती. महेश आणि विजयदादा, रामचंद्रअण्णा, प्रवीणदादा मदतीला असल्याने शक्य झालं..पण पीएचडी चा विषय नक्की झाल्याचे समाधान होते.

2013 मध्ये मोठ्या बहिणचे पती यांचे अपघाती आणि गूढ रित्या मृत्यु झाला आणि ..पोलीसस्टेशन ...कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या ...परत बहीण आणि भाची यांना सावरणे अतिमहत्त्वाचे होते .. महत्वाचे म्हणजे भाऊच्या अर्धवट स्वप्नाची म्हणजे घराची पूर्णत्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती .. बापू गवाणकर, संतोष सावंत आणि राजेश घाग यांनी खुप मदत केली म्हणूनच घर अधिकृत झाले होते.. आई एकटी झाली होती तिकडे दुर्लक्ष होऊन जमणार नव्हते पण आईने स्वतःला खूप खुबीने सावरलं होतं अण्णांसोबत जवळजवळ 55 वर्ष संसार केल्यानंतर एकट्याने राहणं कठीण होते पण आई ती आईच 

तर मुलगा (श्रवण) तीन वर्षांचा असल्याने ती वेगळी तारांबळ होती … इकडे मुलांच्या आईची तारांबळ सुरू होती गौरी सतत सोबत होती ..त्यामध्ये पी एच डी च्या अभ्यासासाठी फिल्डवर्क सुरु झालं होतं.

2014 ला अचानक आमचा आधारस्तंभ असलेला प्रकाशभाऊ कॅन्सरच्या आजाराने आम्हाला सोडून गेला ...त्याच्या तीन मुलांपैकी एकाची जबाबदारी आवर्जून घेतली आणि त्याला हॉटेल मॅनेजमेंट साठी रत्नागिरी मध्ये बोलावले … माईला पण सोबत होणार होती...कधीही गावी नराहिलेला पुतण्या अभिषेक स्वतः ध्येयवादी असल्याने गावी आला होता.अभिषेक आज शिक्षण पूर्ण करून 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत आहे ...स्वतः पायावर उभा आहे याचे नक्की समाधान आहे.

 2015 ला रत्नागिरीतील घराचे रिनुव्हेशन चे काम सुरू करणे गरजेचे झाले होते … 2010 ला जून असलेलं घर विकत घेतल असल्याने त्यात काही बदल अपरिहार्य होते ...काम सुरू झालं आणि नवीन नवीन कल्पना सुचायला लागल्या आणि काम वाढत गेलं…अजुनही पीएचडीचे फिल्ड वर्क 150 परिचारिकांच्या मुलाखती घेऊन झाल्या होत्या असंख्य लोकांनी सहकार्य केले होते… गौरीच्या ओळखीचा खूप उपयोग व्हायचा … पण खाजगी रुग्णालयात मुलाखत घेणे कसरत असायची ...काही ठिकाणाहून तर मला अजिबात सहकार्य मिळायचं नाही थोडक्यात हाकलून दिलं जायचं ..पण अश्या कठीण प्रसंगी परिचारिका विषयाबद्दल अजून आपुलकी तयार झाली.आणि इतर विद्यापीठं आणि राज्यातील पीएचडी केलेल्या लोकांचा अभ्यास सुरू झाला होता.

याच वर्षी 1 एप्रिल 2015 रोजी 95 मित्रांचा व्हाट्सएप ग्रुप तयार केला ...अर्धवट राहिलेलं मित्राचं संघटन सुरू केले आणि अचानक बिपीन बंदरकर सारखा दिलदार मित्र जवळचा मित्र कधी झाला कळलंच नाही त्याच्या तुफान एनर्जीने आयुष्यात सकारत्मकता आली असे नम्र पणे कबूल करावे लागेल.

2016 मध्ये अचानक मोठी बहीण आम्हाला सोडून गेली आणि दुःखाचा डोंगर कोसळला ..ज्याबहिणीमुळे माझं कॉलेजच शिक्षण झालं त्या बहिणीच्या जाण्याने भावनिक पोकळी तयार झाली होती ...आणि भाचीच्या पालकत्वाची जबाबदारी आली होती ...भाचीच्या लग्नाची जबाबदारी मोठी होती ..पण राहतं घर भाडोत्री राहण्यासाठी काही बदल करायचे होते तेव्हा सनी आणि महेशच्या mseb च्या मित्रांनी मदत केली होती. पीएचडी च्या विश्लेषणाची वेळ आली होती ..विद्यापीठात विशेष फेऱ्या सुरू झाल्या होत्या प्रचंड पित्त असल्याने वडाप व्हॅन मधूनच प्रवास सुरु असायचा यावेळी माजी विद्यार्थी शिवा मोहिते आणि त्याचे काका व्हॅनमध्ये माझी पुढची सीट बुक करून ठेवायचे त्याचे मोठे सहकार्य असायचे म्हणूनच दिवसभर नंतर अभ्यास होऊ शकायचा… नंदू देसाईच्या (टाइपिंग करणारा कोल्हापूरचा मित्र) धिरामुळे हलकं वाटायचं.. घरातून जाताना प्रेशर असायचं पण नंदू एकदम रिलॅक्स करून पाठवायचा ...नंदू नेहमी म्हणायचा सर तुम्ही मना पासून अभ्यास करत आहात म्हणून तुम्हाला प्रेशर येत आहे ...काम आपलं एक नंबर होणार.. काम बेस्टच करायचं होतं ...सतत मुलाखत देणाऱ्या परिचारिका डोळ्यासमोर यायच्या मग अजून चांगलं काम करायला प्रेरणा मिळायची..मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ उषा पाटील मॅडम कधीच नाउमेद करत नव्हत्या ...पण चांगलं काम करण्यासाठी आग्रह होता.

2017  चार  महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या एक  म्हणजे प्रीतीचे (भाची) लग्न ठरले ...मोठी जबाबदारी मोकळी होणार होती ..पण पत्रिका वाटतानाच नवीन सियाज गाडीचा मोठा अपघात झाला आणि मृत्यूला हॅलो केल्याचा अनुभव होता ...पुन्हा एकदा सर्व मित्र सोबत होते.. दुर्दैवाने ब्रेन ट्युमर झालेला अतिशय जिवलग मित्र हरिष राणे आम्हाला सोडून गेला होता ...आणि आयुष्यभराची पोकळी ठेऊन गेला ...परत कधी त्याच्या लॉजवर रहायच धाडस झालंच नाही ..हरिष म्हणजे जीव की प्राण मित्र होता त्याचा सहवास म्हणजे हवाहवासा वाटायचा ...सतत त्याची काळजी वाटायची ब्रेन ट्युमर झाल्याचं 15 महिन्यापूर्वी कळलं होतं … अण्णा (हरिष चे वडील) आणि शिरीष नेहमी मरताना पहात होते .. तो जाण्यापुर्वी 3 दिवस अगोदर अमरचा फोन आला … हरिष तुझी आठवण काढत होता ...तुझ्याकडे रत्नागिरीला आनंदला भेटायला जायचं म्हणतोय असे शिरीषने (हरिषचा लहान भाऊ)सांगितले...अमर आणि मी फोन वर रडायला लागलो होतो ...गौरीला घटना सांगितली ...लगेच दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो …

हरिषला भेटलो त्याचा ट्युमरला सूज आली होती त्याच्याकडे बघवत नव्हतं ...कसाबसा रत्नागिरीत आलो आणि तिसऱ्या दिवशीच हरिष आम्हाला निघून गेला...अजून कोड उलगडत नाही की, हरिषचा खुप मोठा मित्र परिवार होता ...पण त्याच माझ्याशी असलेलं नातं काही वेगळच ...आजही हरिषची आठवण आली की, डोळ्यात पाणी येत ...

..पण सप्टेंबर 2017 मध्ये पिएचडी चा थेसिस जमा केला.

 2018 मध्ये पीएचडी चे काम पूर्ण झाले म्हणून थोडा रिलॅक्स झालो पण 8 ते 9 महिन्यानंतर असं समजलं की माझ्या तपासणीसाठी गेलेला थेसिस चुकीच्या व्यक्तीकडे गेला होता ..मराठी मधील माहिती असणाऱ्या एक्सपर्ट साठी पुन्हा विद्यापीठ  मंजुरी घेणे गरजेचे होते ...पुन्हा नवीन प्रतीक्षा सुरू झाली 

2019 मध्ये पीएचडी थेसिस च्या तपासणीसाठी संपूर्ण वर्ष प्रतीक्षा करावी लागली ... नागपूरची बहीन रुबी तायडे च्या ओळखीमुळे डॉ.शिनगारे यांच्या सहकार्याने रिपोर्ट मिळण्यासाठी खुप मोठी मदत झाली .कॉलेजच्या कामाच्या जबाबदारीमुळे पूर्ण वेळ व्यस्त गेला ..आणि सांस्कृतिक विभागाची विस्कळीत झालेली घडी नीट करण्यात वेळ गेला ...पण कॉलेजला A ग्रेड मिळाल्याचा आनंद होता.. प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन नक्की मिळत होते विशेष म्हणजे मला पी एच डी चा अभ्यास करण्यासाठी आवटे मॅडमकडे सांस्कृतिकची जबाबदारी दिली होती त्यामुळे तो वेळ माझ्यासाठी मोलाचा होता त्यामुळे त्यांचे आभार...विद्यापीठ स्तरावर थिएटर चॅम्पियन टॉप 3 मध्ये आलो आणि वैष्णवी जोशी मॉरिशसला जाण्यासाठी यशस्वी झाली अश्या कॉलेजच्या 3 मोठ्या गोष्टी घडल्या.

2020  फेब्रुवारी मध्ये पीएचडी चे सर्व रिपोर्ट आले ...व्हायव्हा होणार तर लॉक डाऊन झालं ...पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार होती ...पण याच काळात आरोग्य विभागाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं ...माझा संशोधनाचा विषय परिचारिका असल्याने ...नक्कीच लोकांचे लक्ष त्या विषयावर केंद्रित झालेले आहे ...अखेर 19 ऑक्टोबर 2020 ही दिनांक व्हायव्हा साठी जाहीर झाली.

मी 18 ऑक्टोबर म्हणजे आदल्या दिवशीच गेलो सोबत पत्नी गौरी आणि भाऊ सनी होते...प्रेशइंटेशन ची तीन प्रकारात तयारी केली होती … नऊ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा दिवस उजाडला होता..

टाइपिंगचे थोडे काम होते म्हणून सकाळी नंदूकडे गेलो तर नंदूच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले होते ...त्याने शिल्लक काम कसेबसे कॉपी करून दिले

बाजारात प्रिंट मारायला एक भटकंती करावी लागली ..लाईट नव्हती ...मग एक भला माणूस भेटला आणि प्रिंट मारून दिल्या ...बरोबर एक वाजता कर्नाटक मधून आलेले डॉ जवळीकर हॉल मध्ये आले आणि लाईट गेला ….थोड्या वेळाने लाईट आला आणि लॅपटॉप सुरू होईना … गौरी च्या चेहऱ्यावरचे रंग उडाला होता ...का कुणास ठाऊक मी स्थिर होतो 

अखेर लॅपटॉप सुरू झाला … प्रेसिडेंटेंशन मनासारखे झाले …. सर्वानीच कौतुक केले ...काही सुचना दिल्या … आणि अखेर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगन कराडे सरानी ...आम्ही आपल्याला डॉक्टरेट पदवी जाहीर करतो अशी उद्घघोषना केली ...आणि गौरी आणि सनीचा चेहरा खुलला … 


मार्गदर्शक मॅडम डॉ. उषा पाटील मॅडम खूष होत्या ...मित्र अमर , शिरीष गुरू डॉ.डी श्रीकांत सर्वांच्या समाधानाचा चेहरा बघून आनंद झाला 

...आणि मला सुद्धा एक तपश्चर्या पूर्ण झाल्याचे समाधान होते.


पी एच डी पूर्ण झाल्यावर महाराजा परिवार, 95 फॅमिली, साई सेवा मंडळ,नाचणे, रोहिदास सेवा मंडळ रत्नागिरी, सांस्कृतिक मंडळ, राईचा परवात ग्रुप, अखिल भारतिय नाट्य परिषद ,रत्नागिरी शाखा जय भैरी मंडळ, मांडवी, सह्याद्री दूरदर्शन चे निर्माता जयु भाटकर, पद्मा भाटकर आणि फॅमिली यांच्या सत्कारामुळे आनंदात न्हाऊन निघालो …

राजेश कळंबटे मुळे ABP माझा च्या मुलाखत(अमोल मोरे उमेश सावंत), रत्नागिरी खबरदार चा विशेषांक(हेमंत वजजु), तरुण भारत (जान्हवी पाटील)ची मुलाखत यामुळे आपण समाज उपयोगी संशोधन केल्याचा आनंद झाला.

पण ...असंख्य लोकांचे सहकार्य विसरता येत नाही 

ज्यावेळी संशोधनाचे पुस्तक होऊन शासन दरबारी विचार होईल तेव्हा संशोधन केल्याचा जास्त आनंद होईल.

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

कुमार राजीव रंजन (यूपीवाला फ़्रेंड )

कुमार राजीव रंजन

(यूपीवाला फ़्रेंड)

● प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

30 सप्टेंबर 2020

----------------------------------------------------

----------------------------------------------------



मैत्री होण्यासाठी वयाचं बंधन नसते तसे काळाचे ही बंधन नसते...

20 वर्ष मित्रांच्या ग्रुपमध्ये सोबत राहून सुद्धा एखाद्याशी मैत्री होऊ शकत नाही ..काही लोक अतिशय अल्पकाळासाठी एकत्र आले तरी सहज व्हेव्हलाईन जूळून जाते. अशीच अल्प काळातील भेट झाली कुमार राजीव रंजनशी.. 20 दिवस आम्ही राणी दुर्गादेवी विश्वविद्यालय , जबलपूर ,मध्यप्रदेश मध्ये समाजशास्त्र रिफ्रेशन साठी भेट झाली होती. 

नोव्हेंबर 2009 मध्ये मध्यप्रदेश एकदम गारठलेला असतो मी गेलो तेव्हा 5 डिग्री सेल्सिअस तापमान होत जबलपूर स्टेशनवर ट्रेनमधून उतरल्यानंतर रिक्षात बसल्यानंतर थंडीची चांगलीच जाणीव व्हायला सुरुवात झाली होती…UGC च्या एकॅडेमीक स्टाफच्या रेस्टहाऊसला सकाळीच पोहचलो तर ...मीच पहिला होतो दुसऱ्या दिवशी रिप्रेशर कोर्स सुरू होणार होता ...वॉचमनला सुद्धा माहीत नव्हतं ...बिल्डींग एकदम रामसे बंधूंच्या हॉरर शो सारखी दिसत होती ...एकतर आयुष्यात इतक्या कमी तापमान असलेल्या थंडीचा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो ...त्यात मला कोल्ड ऍलर्जी ...डॉ. मानकर यांच्याकडून हॉमोयोपॅथीच्या गोळ्यांचा डोस घेऊन आलो होतो ...डबीचे बुच काढताना सुद्धा नाकीनऊ आले होते... अंगावरील स्वेटर ...डोक्यावरील कान टोपी पायातील गरम मोजे दिवसभरात फक्त 3 मिनीटांसाठी फक्त आंघोळी साठी काढायचो ...आंघोळ सुद्धा मोठमोठ्याने  भसाड्या आवाजात गाणी म्हणत करायची आणि कसेतरी कपडे खालायचे आणि हिटरवर जाऊन बसायचं … माझ्या रूम मध्ये आम्ही तिघे होतो ...माझ्याशिवाय अजून दोनजन मध्यप्रदेशचे होते रामेश्वर (दुर्दैवाने कोरोनाच्या काळात त्याचा मृत्यु झाल्याचं त्याच्या मिसेसनी मेसेज केला होता...बातमी समजल्यावर खुप वाईट वाटले होते ) रामेश्वरला गेल्याच वर्षी त्याच्या वाढदिवशी मी फोन केला होता ...बोलीए डाक्टर साहब ..अशी नेहमी प्रेमाची हाक असायची आणि दुसरा पहाडे ...कायम गुड शांत असायचा ...आणि गायब असायचा ...त्यामुळे त्याच्याशी फार बोलणंच झालं नाही. 

समोरच्या रूममध्ये मोठ्या भारदस्त आवाजाचा कोणी तरी रहायला आला होता ...नंतर  समजलं यूपीवाला आहे ...2009 लाच राज ठाकरेनी यूपीवाल्या संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं...मोठे राडे सुरू होते ...महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली तेव्हा मी आवर्जून मनसेचे काम करायचो ऍड.संकेत घाग सारखे सेन्सिटिव्ह लोक लीड करत होते ...माझी राजकीय पार्श्वभूमी असल्याने मी सावधच काम करत होतो …. मनसे मेम्बरशीपची चिट्ठी खिशात होती… यूपीवाले चांगलेच पिसाळलेले होते त्यामुळे समोरच्या प्राध्यापकासोबत सावध रहायचं ठरलं … दुसऱ्यादिवशी अचानक रूममध्ये तो माणूस आला ...सहा फुटाच्या आसपास उंच पुरा धीप्पाड देह असलेला ..असख्लित हिंदी बोलणारा… सर्वांची स्वतःच ओळख करून घेतली माझ्यापर्यंत आला … ओळख सांगितली ...मै रत्नागिरी महाराष्ट्रसे हु….हा तो आपण बालासाहब ठाकरे के महाराष्ट्रसे है ...वा क्या बात है ...मी 38 लोकांमध्ये एकटाच महाराष्ट्र मधून आलो होतो … मी खूप सावध प्रतिसाद दिला ...तोच माझी ओळख करून घेणारा कुमार राजीव रंजन होता … 

रिप्रेशर कोर्समधील माझं कोणत्याही विषयावर सडेतोड बोलण्यावर राजीव फिदा होता एकदा असाच कास्ट सिस्टीम वर माझं मत मांडले….ब्रेक मध्ये राजीव जवळ आला बोलला ..तू भी ठाकरे जैसाच बोलता है ..तिथपासून राजीव  मला " बालासाहब " च बोलायचा हे लिहिताना सुद्धा त्याचा भारदस्त आवाज कानात ऐकायला येतो ...कैसा है बालासाहब … एव्हढा दिलदार मत व्यक्त केल्यामुळे त्याची यूपीवाले म्हणून जी भीती होती ती कमी झाली …

 4 दिवस झाले होते राजीव अचानक रूम मध्ये आला म्हणाला…. चलो जबलपूर मार्केटमे जाएगे  ...रामेश्वर सोबतच होता सायकल थ्री सीटर मधून निघालो ...अनेक विषयांवर गप्पा सुरु झाल्या ….एका हॉटेल मध्ये मस्त स्पेशल बिर्याणी खाल्ली आणि परत आलो रस्त्यामधून जाताना मध्ये त्याच्या एव्हढ्या बेधडक वागण्याची भीती वाटायची ...मनात यायचं मराठी म्हणून खोलवर राग असेल तर ….आपलं काही खरं नाही … पण हळूहळू सामाजिक विषयावर चर्चा सुरू झाल्या त्यावेळी कळलं यूपी बिहारी मुळात खुप गरीब आणि कष्टकरी आहेत तेच लोक महाराष्ट्रमध्ये काम करत आहेत. सामाजिक विषमता एव्हढी आहे की कमी जातीच्या महिलांना सामुहिक बलात्कार सारख्या घटनांना सतत सामोरे जावे लागते ...राजीव बोलला की ...ओ लोक महाराष्ट्रमे बहोत सेफ है ...ये पोलिटिकल लोगोंके वजसे ...ना घर के ना घाट है ...ऐसी स्थिती है… तेव्हाच ठरवलं रत्नागिरीत आल्यावर मराठी आंदोलन करणाऱ्या मनसेचे काम करायचे बंद करायचे ...आणि तसे केले सुद्धा ...पूर्वीसुद्धा मी कायमच बोलायचो ...मी नवनिर्माण समर्थक आहे राज ठाकरे समर्थक नाही …

राजीव , रामेश्वर,आणि मी बालाघाट ला फ़िरायला गेलो संगम चित्रपट चित्रित झाला तिथे गेलो….मघ्ये नदी बाजूला संगरवर दगडाचे डोंगर ...अतिशय विलोभनीय दृश्य होते ...तिथे राजीवची अजून दोस्ती झाली ...खूप फोटो काढले ...तिघानाही सीडी मध्ये लगेच देऊन टाकले होते ...गेली 11 वर्ष सतत त्याच्या वाढदिवसला नचूकता फोन करतो ...आम्ही एकमेकाला आपआपल्या ठिकाणी येण्यासाठी आश्वासन देतो ...जाणं अजून झालं नाही पण BHU(बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) चा विषय आला की नक्की राजीवची आठवण येते ...सहा महिन्यांपूर्वीच बँक ऑफ इंडिया मध्ये चंदनकुमार नावाचे बँक मॅनेजर आले आहेत ...ते केवळ BHU चे आहेत आणि राजीवशी साधर्म्य आहे म्हणून त्यांच्याशीही मस्त मैत्री झाली आहे…. 

20 वर्षात होऊ शकत नाही इतकी 20 दिवसात मैत्री होऊ शकली आहे ...आणि आजन्म राहणार आहे 


आज राजीवचा वाढदिवस आहे ...हॅपी बर्थ डे राजीव 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेतून प्रारंभ झाला ...एका नव्या सांस्कृतिक चळवळला

गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेतून प्रारंभ झाला .. एक नव्या सांस्कृतिक चळवळला
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी
8 सप्टेंबर 2020

Y'faa म्हणजे ....

Youth Festival  Artist Association 

संपूर्ण भारतभर युथ फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणाऱ्या फक्त विद्यार्थी नव्हे तर सपोर्ट करणाऱ्या प्राध्यापक, पालक, कलाकार या सर्वांसाठी Y'faa हे व्यासपीठ आहे. हौशी कलाकार आणि व्यावसायिक कलाकार या बरोबरच दैनंदिन शिक्षण घेत असताना ..नोकरी व्यवसाय करत असताना ...आपली कला जपण्यासाठी ..जोपासण्यासाठी ही सांस्कृतिक चळवळ सुरू केली आहे ...नाट्य ,नृत्य, संगीत,वाड्मय, ललित कला , हस्तकला ..लोककला  यांचे संवर्धन आणि वृद्धी करण्यासाठी Y'faa तुमच्या सोबत असणार आहे. वाय फा चे संघटक अतिशय निस्वार्थी पणे काम करत आहे....

एक शिस्तबद्ध सांस्कृतिक संघटन करूया ...

सांस्कृतिक महाराष्ट्र घडवूया…. 


यातूनच पहिला कार्यक्रम गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली ....


युथ फेस्टीव्हल आर्टीस्ट असोसिएशनच्या गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेला महाराष्ट्रामधून 271 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पहिला किल्ला सर केल्या सारखे वाटले मालवण पासून गोंदिया पर्यंत आणि मुंबई-पुण्यापासून कराड- साताऱ्यापर्यंतचे स्पर्धक सहभागी झाले होते.

 प्रसंग होता...

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढा देत आहे. कोरोना कालावधीत कलाकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी युथ फेसिव्हल आर्टीस्ट असोसिएशन (Yfaa) ने राज्यस्तरीय गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पी ए एस फाऊंडेशन, पारिजात फाऊंडेशन, मुंबई तसेच महाराजा फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून...

 स्पर्धेचे गुगल फॉर्मच्या  माध्यमातून हे फोटो अपलोड करण्यात येत होते. राज्यभरातून आलेल्या विविधांगी आकर्षक 271 फोटोंमधून 30 नंबर निवडण्यात आले. यामध्ये 

प्रथम क्रमांकास 1000/- रू व सर्टिफेकेट, 

द्वितीय क्रमांकास 700/- रु. व सर्टिफिकेट, 

तृतीय कमांक 500 रुपये व सर्टिफिकेट तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई-सर्टिफिकेट देण्यात आले.

   यामध्ये प्रथम कमांक- राजेश प्रभाकर वराडकर, दादर, 

द्वितीय कमांक - शैलेश इंगळे, रत्नागिरी, 

तृतीय कमांक - शरद पाटील, इचलकरंजी 

यांना देण्यात आले सुपर 30 चे परिक्षक म्हणून परेश राजीवले आणि अंतिम स्पर्धेचे परिक्षक श्री. समाधान पारकर यांनी उत्तमरीत्या काम पाहिले.  प्रथम कमांक प्राप्त राजेश वराडकर यांनी गणपती विसर्जनावेळी पाण्याचे उडणारे फवारे आणि त्यातूनही स्पष्टपणे दिसणारी गणेशाची मूर्तीने परीक्षकांचे मन वेधून घेतले. तर द्वितीय कमांक शैलेश इंगळे यांनी गणेशाभोवती केलेली सजावट हेच आकर्षण होते. तर तृतीय कमांक शरद पाटील यांनी कोरोना योध्दे अर्थात पोलिस गणेशविसर्जनावेळी गणरायासमोर नतमस्तक होऊन कोरोना लढ्याशी दोन हात करण्यासाठी शक्ती दे अशापकारचे काढलेले छायाचित्र लक्षणीय होते.  

चळवळ म्हटली की लोकांचा सर्वच स्तरावर सहभाग आवश्यक असतो म्हणूनच जाणीवपूर्वक सह प्रायोजक घेणे ही नेहमीची पॉलीसी असणार आहे....

  या स्पर्धेचे सह प्रायोजक

समाधान पारकर (अध्यक्ष, पी ए एस फाऊंडेशन, मुंबई,), स्वाती देवळेकर (अध्यक्षा, पारिजात फाऊंडेशन, मुंबई), बीपिन शिवलकर (संचालक, महाराजा फाऊंडेशन, रत्नागिरी)  होते. 

या स्पर्धेचे टेकनिकल काम प्रा.शुभम पांचाळ यांनी पाहिले तर प्रचारक म्हणून संकेत आंबेकर, राजेंद्र पवार, समृद्धी गांधी, तन्मय सावंत यांनी उत्तम काम पाहिले स्पर्धा आयोजन प्रा. आनंद आंबेकर (संघटक, युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन, रत्नागिरी) यांनी केले होते.







*राजेश वराडकरची अशीही कलेसाठी समर्पकता* 


वाय फा गणेशोत्सव स्पर्धा 2020 मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या श्री राजेश वराडकर , दादर -मुंबई यांनी पारितोषिकांची रोख रक्कम नस्विकारता वाय फा (युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन) च्या सांस्कृतिक चळवळी साठी देणगी दिली आहे .तसेच वाय फा च्या कामात सक्रिय होण्याचा मानस व्यक्त केला आहे. वाय फा संघटक प्रा.आनंद आंबेकर आणि राजेश वराडकर यांच्या झालेल्या फोन वरील संभाषणातून वाय फा च्या ध्येय धोरणात बाबत चर्चा केली आणि वराडकर वाय फाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि  हा निर्णय घेण्यात आला. 

 राजेश वराडकर यांच्या अश्या प्रोत्साहनाबद्दल संपूर्ण वा फा संघटक परिवार त्याचे मनापासून आभारी आहे.


गणेशोत्सव स्पर्धेमधून एकत्र आलेल्या फोटोलव्हर्स साठी पुढील उपक्रम

दर 15 दिवसांनी एक विषय देऊन फोटो एकत्रित प्रदर्शित केले जातील यासाठी प्रसन्न महाडिक हे आपले प्रचारक असतील

प्रसन्न हे अतिशय टॅलेंटेड फोटोग्राफर आहेत 

नियम असे असतील 

1)एक व्यक्ती दिवसाला जास्तीतजास्त 5 फोटो पाठवू शकेल

2) फोटोसोबत स्वतःचे नाव , गाव, प्रोफेशन टाकणे अनिवार्य आहे

3) फोटो कुठे काढला , आणि कसा काढला उदा. मोबाईल (कोणता, मोड कोणता)  कॅमेरा (कोणता,सेटिंग कोणते)


आपण सर्व फोटो च्या माध्यमातून *संवाद* साधणार आहोत म्हणुन एव्हढे डिटेल्स गरजेचे आहेत.

Yfaa ही एक सांस्कृतिक चळवळ आहे 

 *Express your soul* 

आपले ब्रीद वाक्य आहे

भविष्यात अजून वेगवेगळ्या कलांचे असेच संघटन आणि संवर्धन केले जाणार आहे.



गणेशोत्सव सुपर 30 फोटो आणि रिझल्ट युट्युब लिंकची खाली शेअर करत आहे

https://youtu.be/kBY34NeZaX4




सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

विजय आंबेकर..राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी

विजय आंबेकर : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी

●प्रा. आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

31 ऑगस्ट 2020

-----------------------------------------------



एक सामान्य घरातील तरुण ...

चाळीमध्ये राहून शिक्षण घेत...

उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारी लोकवस्ती …

भाईगिरी करणे भुषण समजणाऱ्या तरुणांच्या वस्तीत राहणारा तरुण...

आईवडीलांकडून उत्तम संस्कार घेत ...

पोलीस कॉन्स्टेबलची नोकरीची सुरवात करत …

क्राइम ब्रँच मध्ये जबरदस्त नेटवर्क आणि अमोघ संवाद कौशल्याच्या जोरावर मोठमोठे गुन्हाचा तपास करणारा हुकमी  एक्का...

विजय साळसकर सारख्या नामवंत 

पोलीस अधिकारांची पहिली पसंत असणारा मुंबई पोलीस ...

अपार मेहनतीने अभ्यासकरून पोलीस सब इन्स्पेक्टरच्या पदापर्यंत मजल मारूनही तृप्त नहोता अविरत कष्ट करणाऱ्या  पोलीस अधिकाऱ्याला 2017 मध्ये  मुंबई पोलीस खात्यातील उत्तुंग कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होतो …

अमिताभ बच्चनच्या एखाद्या चित्रपटाची कथा असावी असे  हिरोचे वर्णन … वाटते ना ..

पण हा आहे आमचा विजयदादा ...बघा नाव सुद्धा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाला साजेसंच आहे. 

विजयदादा म्हणजे तसा नात्याने चुलता ..

पण पहिल्या पासूनच त्याला आम्ही दादाच हाक मारतो … सार्वजनिक कार्यक्रमात अतिशय दुर्मिळ दिसणारा भाऊ ...पण वहिनी भेटायचीच दोघेही सतत हसतमुख ..त्यांच्या दोन कन्या निशा आणि सोनिया.

राजाराम आजोबाची मुलं म्हणजे अतिशय शिस्तबद्ध 

आंबेकर भावकीतील अतिशय श्रद्धेने नांव घ्यावी त्यातील राजाराम आजोबा ...

आणि त्यांचा सर्वात लहान मुलगा म्हणजे विजयदादा ...उंचपुरे व्यक्तिमत्व ..साऊथच्या हिरोंसारखी झुपकेदार मिशी ...पण चेहऱ्यावर सतत खळखळून असणारे हास्य …कधी मुंबई पोलीस वाटायचाच नाही ...या त्याच्या साऊथ हिरो सारख्या पर्सनॅलिटीचा त्यांच्या कामात खूप उपयोग झाला … मुंबईतील घाटकोपरच्या हमीदाबाई गल्लीत राहत असताना शेजारी ब्रीद काकांच्या प्रोत्साहनामुळे विजय दादा पोलीसभरती झाला ...प्रवास खडतर होता ...कधी कधी ट्रेनिंग सोडून यावं का ?..असे वाटायचे पण मनात खुप मोठी स्वप्न असल्याने तिथे मिळणारे प्रत्येक ट्रेनिंग जीवनबोध म्हणून घेतले आणि नोकरी सुरू केली...

20 व्या वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात...

थोड्याच वर्षामध्ये त्याची बदली क्राइम ब्रँच मध्ये झाली आणि गेली 20 वर्षे त्यांच्या पर्सनॅलिटीचा पुरेपूर उपयोग झाला …

दादा गावी आला की एकतर पुस्तक वाचत बसायचा किंवा दुसऱ्याशी साधं बोलताना सुद्धा भारावून टाकणारे बोलायचा

हयाच त्याच्या स्वभावाचा क्राइम ब्रँच मध्ये उपयोग झाला. जगामध्ये मुंबई पोलीस अग्रेसर मानले जातात 

त्यांच्या गुन्हे तपासाची मुख्य किल्ली आहेत 'खबरी' ...आणि विजय दादाची हीच स्ट्रेंथ आहे. त्याच्या नेटवर्कचा अनेक पोलीस अधिकारी कौशल्यपुर्वक उपयोग करायचे. म्हणूनच प्रफुल्ल भोसले असतील महेश देसाई असतील की 26/11 फेम शहीद विजय साळसकर असतील या सर्वांना विजयदादाच्या नेटवर्कचा गुन्हे तपास करताना खूप उपयोग व्हायचा 

..दादांनी साधे कपडे घातले की साऊथच्या हिरोंसारखा दिसायचा आणि प्रचंड वाचन असल्याने बोलायला लागला की विचारवंत वाटायचा त्यामुळे पोलीस तपासाला खुप उपयोग व्हायचा .  पण रक्तातच मुंबई पोलीस असल्याने जातायेता कुठे अन्याय होत असेल तर तो शांत बसायचा नाही ...कधी कधी जीवावर बेतायच … हिरोसारख्या पर्सनॅलिटीचा अश्यावेळी धोका असायचा ...

असाच एक किस्सा …

घराच्या गल्लीतून बाहेर पडून रस्त्यावरून चालत जात होता …एका भिकाऱ्याला काही भाईगिरी करणारी मुलं त्रास देत होती ...विजयदादांनी त्या पोरांना हटकवल आणि पळवून लावलं ...तो पोलीस आहे असं कोणाच्याच लक्ष्यात आलं नाही ...मग पुढे जाऊन रिक्षा केली आणि पुढच्या कामावर जायला निघाला… रिक्षा दुसऱ्याच मार्गावर जातेय असं त्याच्या लक्षात यायच्या अगोदरच भिकाऱ्याला त्रास देणाऱ्या पोरांनी आपली गँग घेऊन दादाला घेरलं होतं… रिक्षावाला पण त्यांचाच माणूस होता ..दादाला मारायला पुर्ण तयारी झाली होती ...मग दादाने आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली ...आपण क्राइमब्रँचला आहोत हे दाखवून दिलं 

..ती उदयमुख भाई वरमले ….पण तिथून बाहेर आल्यावर क्राइम ब्रँचचा हिसका दाखवत आयुष्य भरासाठी नरमले …

1995 च्या दरम्यान मुंबई पोलिसांनी सगळ्याच गुन्हेगारीच्या गँग संपवून टाकण्यासाठी एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या ..   त्याकाळात घरामध्ये खुप तणावाचे वातावरण असायचं घरातून बाहेर पडलेला दादा घरी आला म्हणजे आपला... अशी कायम भीती असायची त्याकाळात कुटुंबातील कुठल्याच सार्वजनीक लग्न ..समारंभ..याला कधीच दिसायचा नाही ...सर्व कार्यक्रमात वहिनी एकट्याने हजर असायची ..मग नातेवाईक विचारायचे विजय कुठे आहे .. मग वहिनी हसूनच विषय टाळायची ...पण त्या हसण्यात पण मुंबई पोलिसांनी उभारलेल्या गुन्हेगारी मोहिमेची वास्तव भीती लपलेली असायची..  


पण दादा कधी संतुष्ट राहिला नाही ...मुंबई पोलीस म्हणून गुलशन कुमार हत्याकांड सारख्या अनेक गुन्हे तपासात दादाच्या कुशल नेटवर्कचा खूप फायदा झाला वेळोवेळी खात्याकडून जवळजवळ 400 च्या आसपास उत्तम कामासाठी प्रशस्तिपत्र प्राप्त झाली आहेत.पण कधीच त्याचा गवगवा केला नाही की बडेजाव केला नाही...माझी मुंबई विद्यापीठातील कामाचा दादाला नेहमी अभिमान वाटतो …,अगदी सद्या सुरू केलेल्या लिखाणाला दादाने स्वतः फोन करून कौतुक केले दादाच्या व्यस्त दिनक्रमात सुद्धा त्यांच्या बॅगेत कायम एखादं पुस्तक असतंच अश्या उत्तम वाचक दादांनी जे वाक्य बोलला ते कायम लक्षात राहील ...पुलं आणि वपु च्या स्टाईलसारख तुझं लिखाण आहे ...असचं निरीक्षण ठेवत जा म्हणजे आपोआप लिहीत राहशील ...मला तर मूठभर मांस चढलं … खरं म्हणजे मला दादाचा युट्यूबवर व्हीडिओ  करायचा आहे … बघूया कधी वेळ येते ती …



व्यस्त शेड्युल मध्ये सुदधा सब इन्स्पेक्टर व्हायचं म्हणून अभ्यास करायचा ...पण पुरेसा वेळ नमिळाल्यामुळे त्याला यशस्वी होता आलं नव्हतं … 2015 मध्ये दादाचा 50 वा वाढदिवस होता ..पण अजिबात साजरा नकरता अभ्यास करत राहिला कारण दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती … आणि शेवटी 2015 साली त्याच्या आयुष्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या ...एक स्वतः पोलीस सब इंस्पेक्टर झाला आणि...त्याच्या मोठ्या मुलीने निशाने लॉ पूर्ण करून हाय कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.

 दादाने केलेल्या कामाची सर्टिफिकेट आणि पेपर कात्रण यांच्या संचायाची दादाने कधीच प्रयत्न केला नाही.

एकदा एक पोलीस ऑफिसर वहिनीला म्हणाले विजयच इतकं पराकोटीच काम आहे तर एकत्र करा शेवटी निशा आणि वहिनीने जबाबदारी घेतली इतके वर्षे पॅशनने केलेल्या कामाबद्दल दादाला पहिल्याच प्रस्तावात 2017 ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला….आणि आम्हा आंबेकर फॅमिलीला अभिमान रहावा अशी आयुष्यभरासाठी भेट दिली.


मराठी विद्यालय घाटकोपरच्या शाळेच्या मित्रांनी सत्कार ठेवला दादा फक्त 12 मिनिटच बोलला त्यात आई बाबा...वहिनी …. निशा .. सोनिया यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणलं ... संपूर्ण आयुष्य त्यागाची भावना ठेऊन ...कायमच जीव धोक्यात घालून मुंबई पोलीसाचे कर्तव्य पार पाडत राहिला ...पण समाधानाचे उत्तुंग शिखर सुद्धा गाठलं होत ….ते समाधान फक्त दादाचं नव्हतं … घरातील सर्व माणसांच होतं...शाळेतील मित्रांना होतं ...सोमय्या कॉलेजच्या मित्राचं होतं… आमच्या सारख्या भावाचं होत ...आज त्याच्या सर्व्हिसला 37 वर्षे होत आहेत ..पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार ...पण त्याच्याकडे बघून वाटतच नाही की दादाची सर्व्हिस संपत आली आहे

दादा तुला मानाचा सलाम...





राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण

राजश्री - सगळीकडे पहिली असणारी मैत्रीण  लेखक -डॉ. आनंद आंबेकर             रत्नागिरी  ०४/०९/२०२६ —---------------------—---------...